व्यायाम हा कंबरदुखीवरील ‘सस्टेनेबल’ म्हणजेच शाश्वत उपाय आहे. सध्या कंबरदुखीच्या रुग्णांमध्ये व्यायामाबद्दल बऱ्यापैकी जागरूकता आली आहे आणि विशेष म्हणजे रुग्ण व्यायामाकडे आशावादी दृष्टिकोनातून बघत आहेत. असं असलं तरीही व्यायामाबद्दलच्या काही संकल्पना अजूनही रुग्णांसाठी स्पष्ट नाहीत. अशा काही संकल्पना आपण आज बघणार आहोत.
- काही वेळा नियमितपणे व्यायाम करणाऱ्या व्यक्तीना जेव्हा कंबरदुखीचा त्रास होतो, आणि काही काळापुरती विश्रांती सुचवली जाते, अशावेळी विश्रांतीनंतर पुन्हा व्यायाम सुरू करताना नक्की कशी सुरुवात करावी असा प्रश्न पडतो, अशावेळी रोजच्या दैनंदिन कामांपासून सुरुवात करणं फायदेशीर ठरतं. हळूहळू आपल्या दैनंदिन क्रिया सुरू करून, संथ गतीने व्यायामाला सुरुवात करणं आणि टप्प्याटप्प्याने व्यायामाची तीव्रता वाढवणं हा अतिशय सोपा आणि सुरक्षित मार्ग ठरू शकतो.
- बऱ्याच वेळा कंबरदुखीसाठी बेड रेस्टचं प्रमाण अनावश्यकरीत्या लांबवलं जातं. अशावेळी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण करत असलेल्या आणि करत नसलेल्या अशा दोन्हीही गोष्टींची शरीराला सवय लागत असते. कोणत्याही प्रकारच्या कंबरदुखीसाठी खूप जास्त काळ बेड रेस्ट घेणं हे फायदेशीर ठरत नाही. (याला अपवाद फक्त अपघातामुळे होणारी मणक्याची इजा, ऑपरेशन नंतरची विश्रांती आणि काही आजार). खूप काळापर्यंत क्रियाहीन राहिल्याने स्नायूंना तशी सवय होऊ लागते आणि बरं होण्याची प्रक्रिया लांबत जाते. स्नायू अधिकच क्रियाहीन होत जातात. शिवाय दीर्घकाळ हालचाल न केल्याने श्वसन संस्थेची क्रियाशीलताही कमी होत जाते.
हेही वाचा – हवेतील जंतू पसरवत आहेत का साथीचे रोग?
- खूपदा हे बघायला किंवा ऐकायला मिळतं की एखादी विशिष्ट हालचाल करताना कंबरेत वेदना सुरू झाली, किंवा कंबरेवर ताण आला. या प्रकारची वेदना ही अचानक आणि अनियोजित हालचालीमुळे होते. बहुतेक वेळा कंबरेतून खाली वाकून वजन उचलताना अशी वेदना सुरू होते. जलद आणि अनियोजित क्रिया केल्याने हा त्रास होतो. आपण हालचाल इतकी जलद आणि अचानक करतो की स्नायू त्या हालचालीसाठी पूर्णपणे तयार नसतात परिणामी मणक्यांवर अतिरिक्त भार येतो. कोणतीही हालचाल करताना विशेषतः कंबरेतून वजन उचलताना नियोजित आणि सुसूत्र हालचाल करावी. व्यायाम आणि दैनंदिन क्रिया या दोन्हीतील हालचाली या सुसूत्रित, नियोजित असाव्यात.
- ज्या व्यक्तींना व्यायामाची सवय नसते त्यांनी व्यायाम सुरू केल्यावर स्नायू दुखणं, ही सामान्य गोष्ट आहे, याला मसल सोरनेस असं म्हणतात. नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्येही काही नवीन व्यायाम केल्यानंतर असा सोरनेस येऊ शकतो. याचा अर्थ स्नायूंना दुखापत झाली आहे असा होत नाही.
- व्यायामात नियमितता आणल्याशिवाय, व्यायामाचा उपयोग होत नाही. एकाच दिवशी खूप व्यायाम करण्यापेक्षा रोज ठराविक वेळेसाठी व्यायाम करणं जास्त फायदेशीर ठरतं. शक्यतो दिवसाला ३०-४० मिनिटे व्यायाम पुरेसा असतो. कोणत्याही एका प्रकारचा व्यायाम करण्यापेक्षा वेगळे वेगळे व्यायाम आठवड्यातून ठराविक दिवशी करणं जास्त उपयुक्त आहे.
- कंबरदुखी साठी चालणं, पोहणं, पळणं, सायकल चालवणं, वजन उचलणं, एरोबिक व्यायाम यापैकी कोणताही व्यायाम फायदेशीर आहे. व्यायाम हा शिक्षा म्हणून नव्हे तर आनंद म्हणून करायचा आहे. आपल्या जीवनशैलीनुसार, गरजेनुसार आणि वेदनेच्या प्रकारानुसार फिजिओथेरपिस्ट डॉक्टरने ठरवून दिलेला व्यायाम नियमितपणे केला तर कंबरदुखीचा त्रास कमी होण्याबरोबरच, आपला आत्मविश्वास वाढून आपण स्वयंपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण आयुष्य जगू शकू.