वातप्रकोपास कारणीभूत होणारे रुक्ष म्हणजे शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणारे आहारीय पदार्थ नेमके कोणते, ते या लेखात जाणून घेवू. यातले जे पदार्थ थंड आहेत, त्यांचा तसा उल्लेख केलेला आहे, जे वात वाढवण्यास विशेषेकरून कारणीभूत होतात.
आणखी वाचा : Health Special: लोणची चवदार, पण प्रमाणातच, अन्यथा…
आता इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, या पदार्थांचे सेवन झाले म्हणजे शरीरामध्ये वातप्रकोप झाला (वात वाढला) असा अर्थ होत नाही. अनेक कारणे जेव्हा संयुक्तपणे एकत्र येतात तेव्हा; कोणतीही विकृती तयार होते, सहसा एकाच कारणामुळे असे होत नाही. उदाहरणार्थ- तुमची वातप्रकृती असेल, शिवाय तो काळ वातप्रकोपाचा म्हणजे वर्षा ऋतुचा असेल आणि त्याचवेळेस तुम्ही रात्री जागरण- अतिसंभाषण- अतिचालणे- अतिगायन- अतिमैथुन- अतिव्यायाम वा अतिपरिश्रम केलेले असतील किंवा तुमच्या शरीरक्षमतेपेक्षा अधिक असा कामाचा- परिश्रमाचा बोजा पडल्याने शरीराच्या त्या- त्या अवयवांवर खूप ताण असेल अथवा तुमच्या आहारामध्ये स्नेहाचा (तेल,तूप- लोणी वगैरेचा) अभाव असेल व तुम्ही शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणारा- एकंदरच वात वाढवणारा असा आहार अतिप्रमाणात- सातत्याने सेवन करत असाल; तर मात्र वातप्रकोप होण्याची शक्यता बळावते. शरीररुपी यंत्राच्या स्थूल- सूक्ष्म- अगम्य अशा विविध क्रियांमागील प्रेरक- संचालक- नियंत्रक अशा वाताचा प्रकोप होण्यामागे इतक्या सर्व कारणांची साखळी एकमेकांशी जुळून येते आणि तेव्हाच वातविकृती जन्माला येते.
आणखी वाचा : Health Special: आठवणीनेही वाटणारी हालचालींची वेदनादायी भीती कशी टाळता येईल?
कोरड्या पदार्थांमुळे वातविकृती होण्याचे कारण काय?
शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणारे रुक्ष पदार्थ हे शरीरामध्ये वातप्रकोपास व वातविकृतींस कारणीभूत होतात. म्हणजे नेमके काय? प्रत्यक्षात कोरड्या पदार्थांच्या पचनानंतर जे रेणू तयार होतात, ते सर्व शरीरभर रक्तामार्फ़त पसरतात. रक्तामध्ये फ़िरताना ज्या-ज्या अवयवांच्या संपर्कात हे कोरड्या पदार्थांचे रेणू येतात, त्या-त्या अवयवावर त्या कोरड्या रेणुंचा परिणाम होतो आणि ते त्या- त्या अवयवामधला स्नेह-ओलावा शोषून घेतात. शरीराच्या प्रत्येक कोषामध्ये आणि असंख्य कोषांपासून तयार झालेल्या विविध अवयवांमध्येसुद्धा ओलावा आणि स्नेह अत्यावश्य़क असतो; जो त्या अवयवाच्या सहज-सुलभ कार्यासाठी अत्यावश्यक असतो. नाकापासून फुप्फुसाच्या वायुकोषापर्यंतचा श्वसनमार्ग, मुखापासून गुदापर्यंतचे पचनसंस्थान, हृदय, यकृत, मूत्रपिंड, मस्तिष्क, मज्जारज्जू, सांधे आदी सर्व अवयवांमध्ये आणि नेत्र- कर्ण- नाक- त्वचा- जीभ या इंद्रियांमध्ये ओलावा- स्नेह अत्यावश्यक आहे. शरीराच्या कोषांमध्ये- अवयवांमध्ये होणार्या विविध जैवरासायनिक प्रक्रियांसाठी स्नेह आणि ओलावा अत्यावश्यक असतात. ज्याठिकाणी गति-हालचाल-घर्षण असते,तिथे तर अशा स्नेहाची- ओलाव्याची निसर्गानेच तजवीज करुन ठेवलेली आहे. तो स्नेह-ओलावा कमी करुन कसे चालेल? स्नेह आणि ओलावा घटल्यामुळे तिथे तयार होणारा कोरडेपणा त्या-त्या अवयवाचे आरोग्य बिघडवतो.
आणखी वाचा : मशरुम किती पौष्टिक असतात? ते खाणे किती फायदेशीर?
शरीरात वाढलेला कोरडेपणा त्वचेला कोरडा करु शकतो, हाडांना ठिसूळ- हलकं करु शकतो, सांध्यांमधील अत्यावश्यक श्लेषमल (बुळबुळीत) स्त्राव कमी करुन दोन हाडांमधील कूर्चा झिजवू शकतो, स्नायुंची आकुंचन-प्रसरण क्षमता कमी करु शकतो, रक्तवाहिन्यांच्या आतील श्लेष्मल (बुळबुळीत) स्तराचा बुळबुळीतपणा कमी करुन रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी करु शकतो. मूत्रपिंडांमधील (किडनी) सूक्ष्म मूत्रनिर्मिती केंद्रांचे (नेफ्रॉन्सचे) कार्य बिघडवू शकतो. मस्तिष्कामधील चेताकोषांना (न्युरॉन्स) सुकवू शकतो; चेताकोषांकडून होणारे चेतनेचे (इम्पल्सचे) वहन बिघडवू
शकतो. यकृत, स्वादुपिंड, प्लीहा आदी महत्त्वाच्या अवयवांमधील कोषांमधील स्नेह (लिपिड) कमी होऊन ते हलके- निकस होऊ शकतात; एकंदरच शरीरात वाढलेला कोरडेपणा विविध स्थूल वा सूक्ष्म अवयवांमध्ये कोरडेपणा वाढवू शकतो.
अर्थात हे एकाच वेळच्या कोरड्या आहारामुळे,एकाच रात्री जागरण केल्याने होते असे नाही, तर वारंवार त्याच-त्याच चुका
व्यक्ती दीर्घकाळ करत राहिली तर शरीरात कोरडेपणा वाढून अवयव कोरडे- हलके- निकस- अकार्यक्षम होण्याचा धोका संभवतो. हे बिघडणारे आरोग्य आयुर्वेदाने वातविकृती आणि वातविकारांच्या स्वरुपात मांडले आहे.