Health Special: आयुर्वेदानुसार पावसाळ्यात पाण्यामध्ये एक दोष निर्माण होतो, तो म्हणजे पिच्छिलता अर्थात बुळबुळीतपणा. वर्षा ऋतूमध्ये पावसाच्या पाण्याचा मातीशी संबंध आल्यानंतर त्यामध्ये पिच्छिलता म्हणजे बुळबुळीतपणाचा दोष निर्माण होतो, असे चरकसंहितेचे भाष्यकार चक्रपाणी सांगतात. हा दोष शरद ऋतूमध्ये मात्र नष्ट होतो. पावसाळ्यानंतर काही दिवस उलटून गेल्यामुळे शरद ऋतूमध्ये काळाच्या परिणामाने (आणि शरदातल्या उष्णतेने) पाणी पक्व होते म्हणजेच दोषरहित व शरीरामध्ये दोष न वाढवणारे आणि स्वच्छ होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संसर्गजन्य रोगांची भीती

साहजिकच पावसाळ्यामध्ये पाणी प्यायल्यावर वेगवेगळे रोग होण्याची जी भीती असते, ती शरद ऋतूमध्ये बर्‍याच अंशी कमी होते. अर्थात पाणी उकळवून पिणे हे विविध संसर्गजन्य रोग होऊ नयेत म्हणून आणि एकंदरच आरोग्यासाठी हितकर हे विसरु नये. पावसाळ्यातील या पाण्याचा आपल्या शरीरावर काही परिणाम होतो का, ते समजून घेऊ! ज्या प्रदेशांमध्ये पाऊस उशीराने सुरु होतो अशा ठिकाणी पाऊस शरद ऋतूमध्ये अर्थात अश्विन व कार्तिक या महिन्यांमध्येसुद्धा पडतो. आपल्या महाराष्ट्रामध्येसुद्धा दसर्‍याच्या आसपास अनेकदा पाऊस पडतो. यंदाही असा पाऊस सुरूच आहे. तर अश्विन व कार्तिक या महिन्यांमध्ये पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे गुण- दोष काय हेसुद्धा आयुर्वेदाने सांगितले आहेत, ते जाणून घेऊ.

हेही वाचा – तुम्ही दररोज किती वेळा मिठी मारता? जाणून घ्या, मिठी मारणे हे आरोग्यासाठी कसे फायदेशीर?

अश्विन महिन्यातील पावसाचे पाणी: (हारीतसंहिता १.७.२०)

अश्विन म्हणजे साधारण ऑक्टोबरच्या दुसर्‍या- तिसर्‍या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या दुसर्‍या- तिसर्‍या आठवड्यापर्यंतचे दिवस. या दिवसांमध्ये पडणार्‍या पावसाचे पाणी हे कोरडे (शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणारे), चवीला खारट व पित्तकारक असते. शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप करुन विविध पित्त व रक्तविकारांना कारणीभूत होते. विशेष म्हणजे अश्विन महिन्यात चित्रा नक्षत्राचा उदय ज्यादिवशी होतो, त्यादिवशी पडणारे पाणी हे तीक्ष्ण गुणांचे असते. तीक्ष्ण याचा अर्थ कापणारे, जो पित्ताचा विशेष गुण (वा दोष) आहे. साहजिकच शरद ऋतूमध्ये म्हणजे ऑक्टोबर हिटच्या दिवसांमध्ये ज्यांना पित्ताचे विविध रोग त्रस्त करतात जसे की छातीमध्ये-पोटामध्ये जळजळ, पित्ताचे स्रवण अधिक प्रमाणात झाल्याने आणि उपाशी राहिल्याने जठराच्या जागी दुखणे, पित्त वाढल्याने डोकं चढणे- दुखणे, सूर्यप्रकाश- तीव्र प्रकाश सहन न होणे, मळमळ, उलट्या, तिखट झोंबणे, तोंड येणे, अंगाची-हातापायांची आग, अंगावर लालसर रंगाच्या पुळ्या-पुरळ उठणे व सोबत दाह (आग) होणे, मूत्रविसर्जन करताना व गुदमार्गी आग, डोळ्यांची आग, डोळे लाल होणे वगैरे. अशा शरीरामध्ये उष्णता वाढून होणार्‍या विविध पित्त- समस्यांचा त्रास ज्यांना होतो त्यांच्यासाठी या अश्विन महिन्यातील पावसाचे पाणी हितकर नाही. अशा मंडळींनी एक लीटर पाण्यामध्ये नागरमोथा, चंदन, धने, जिरे, बडीशेप, वाळा अंदाजे प्रत्येकी २.५ ते ५ ग्रॅम इतक्या प्रमाणात घालून ते पाणी झाकण ठेवून उकळवावे आणि निम्मे होईपर्यंत आटवावे (कढवावे). गाळून थंड झाल्यावर पिण्यासाठी वापरावे, निश्चित उपयोगी होईल. सुश्रुतसंहितेनुसार उकळवून (कढवून) थंड झालेले पाणी हे पित्तशामक असते. अश्विन महिन्यात चित्रा नक्षत्राचा उदय होतो, त्या दिवसाचे पाणी शेतीसाठी हानिकारक असते. आयुर्वेदाचे हे मार्गदर्शन शेतकर्‍यांना उपकारक आहे.

हेही वाचा – श्वेता बच्चनने सांगितले अमिताभ आणि जया बच्चन यांच्या सौंदर्याचे रहस्य! जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

कार्तिक महिन्यातील पावसाचे पाणी : (हारीतसंहिता १.७.२१)

कार्तिक म्हणजे साधारण नोव्हेंबरच्या दुसर्‍या- तिसर्‍या आठवड्यापासून ते डिसेंबरच्या दुसर्‍या- तिसर्‍या आठवड्यापर्यंतचा काळ. या दिवसांमध्ये पडणार्‍या पावसाचे पाणी हे शीत गुणांचे (शरीरामध्ये थंडावा वाढवणारे), उष्णताशामक, शरीराचा दाह व पित्तज्वर कमी करणारे, वात- पित्त व कफ या तीनही दोषांना उपकारक व शक्तीवर्धक असते. एकंदर पाहता अश्विन महिन्याच्या अगदी विरुद्ध गुणाचे असे हे पाणी असते, जे ऑक्टोबर हिटच्या दिवसांमधील उष्णतेसाठी, उष्णतेमुळे होणाऱ्या पित्तप्रकोपासाठी आणि वर उल्लेखिलेल्या विविध पित्त-समस्यांनी त्रस्त असणार्‍यांना गुणकारी ठरते. त्यातही कार्तिक महिन्यात स्वाति नक्षत्राचा उदय झाल्यानंतर पडणार्‍या पावसाचे पाणी हे आरोग्याला अधिक हितकारक व विशेषकरुन शेतीसाठी (सर्वच पिकांसाठी) उपकारक असते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special which water to drink in monsoon which one should not drink hldc ssb