Health Special: उन्हाळ्यामधील शरीराच्या आरोग्याची स्थिती बरी होती, असे म्हणावे एवढी वाईट देह-स्थिती पावसाळ्यामध्ये, त्यातही आरंभीच्या प्रावृट्‌ ऋतूमध्ये होते. त्यामधील सर्वात महत्त्वाचा शरीरबदल म्हणजे ‘अग्निमांद्य’. अग्नी म्हणजे शरीरामध्ये पेटणारी भूक वा पचनशक्ती असा मर्यादित अर्थ नसून शरीराची अन्नसेवन करण्याची इच्छा (भूक), अन्न पचवण्यास साहाय्यक विविध प्रक्रिया, त्या अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या व त्याज्य घटक उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियांना मिळून जी यंत्रणा आहे ती म्हणजे ‘अग्नी’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुर्वेदाला अपेक्षित अग्नी

अधिक नेमकेपणे सांगायचे तर सेवन केलेल्या अन्नाच्या प्रत्येक कणाकणाचे पचन, त्यापासून ऊर्जेची वा शरीरपेशींची निर्मिती व तयार होणार्‍या त्याज्य घटकांचे उत्सर्जन या तीनही पातळ्यांवर ज्या अनेक जैव- रासायनिक क्रिया- प्रक्रिया घडून येतात, त्या सर्वांना मिळून आयुर्वेदाला अपेक्षित असलेली ‘अग्नी’ ही संकल्पना आहे. अग्नीची ही तीनही कार्ये पावसाळ्यामध्ये विकृत होतात, रुग्णांनाही तसाच अनुभव येतो.

हेही वाचा – Health Special: व्यक्ती व्यसनाधीन कशी व का होते?

भूक मंदावते

उन्हाळ्यामध्ये अग्नी मंद असतोच, मात्र प्रावृट्‌ ऋतूमध्ये (आरंभीच्या पावसाळ्यामध्ये) तो अधिकच मंद होतो. त्यामुळे उन्हाळ्यापेक्षाही पावसाळ्यातल्या या दिवसांमध्ये भूक मंदावते. जेवणावरची वासना कमी होऊन अक्षरशः जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायचे अशी स्थिती होते. अन्नामध्ये रुची राहत नाही. बळेच जेवले तरी अग्निमांद्यामुळे अन्नाचे धड पचनही होत नाही. त्यामुळे या दिवसांमध्ये पचनाच्या विविध तक्रारींनी लोक बेजार होतात. जसे की, अन्नसेवन न करताही पोट भरलेले वाटणे, न जेवताही पोट भरल्याचे ढेकर, अन्नसेवन केले की अपचनाचे ढेकर, ढेकर आले की त्यासह आंबट-कडू पित्तही वर येणे, छातीत-पोटामध्ये जळजळ, थोडे खाल्ले तरी पोट डब्ब होणे, पोटामध्ये वारंवार गुबारा धरणे, तो गुबारा अधोमार्गाने वायू सरला तर बरं वाटेल असं वाटत असतानाच दुर्गंधीयुक्त वायू सुटणे, असे त्रास होतात.

हेही वाचा – Health Special: फणसाच्या बियांमध्ये दडलंय काय?

मलावरोध किंवा आव पडणे

कधी मलावरोधाचा त्रास तर कधी पातळ मलप्रवृत्तीचा. मलासह फेस आणि आव पडण्याची तक्रार तर अनेकांना या दिवसांमध्ये त्रस्त करते. तर दुसरीकडे अनेक जण मलावरोधामुळे त्रासलेले असतात. मल कडक झाल्यामुळे मलविसर्जन करताना कुंथावे लागल्यामुळे रक्तस्राव होण्याची तक्रारही अनेकांना त्रस्त करते. त्यात पुन्हा पावसाच्या आरंभीच्या दिवसांमध्ये हलका आहार घेणे अपेक्षित असतानाही लोक पावसाळी उत्साहामध्ये तिखट, मसालेदार, तेलकट-तूपकट, पचायला जड असा आहार घेतात. तो काहींना पचत नाही आणि अग्निमांद्य अधिकच गंभीर होते. अग्नी मंद झाल्याने सेवन केलेल्या अन्नाचे शरीरकोषांना सात्म्य होईल अशा सूक्ष्म रेणूंमध्ये रुपांतर होत नाही आणि शरीरकोषांना त्या अन्नरेणूंपासून अपेक्षित पोषण मिळत नाही. असे पोषण न मिळालेले शरीरकोष दुर्बल होतात. असे दुर्बल झालेले शरीरकोष व त्या शरीरकोषांपासून तयार झालेले अवयव दुर्बल होतात आणि मग त्या-त्या अंगांचे आजार बळावतात. एकुणात, हे सारे त्या अग्निमांद्यामुळेच होते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special why does the problem of indigestion increase during rainy season hldc ssb
First published on: 29-06-2024 at 19:19 IST