Health Special आयुर्वेदानुसार अग्नी हा पित्ताचेच रूप आहे. मात्र मुळात पित्त आणि अग्नी यांमध्ये फरक आहे. पित्त आणि अग्नी यांमधील फरक स्पष्ट करण्यासाठी ग्रंथकारांनी तुपाचे उदाहरण दिले आहे.तूप जेव्हा गरम असते तेव्हाच त्याचा स्पर्श गरम असतो, अन्यथा नाही. अर्थात तुपामध्ये जेव्हा उष्ण गुण वाढतो, तेव्हाच त्याचा चटका बसतो, त्याचप्रमाणे पित्तामधील उष्ण गुण उत्कर्षास येतो तेव्हाच त्याला अग्नी म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: Health Special : नूडल्स कशासोबत खाव्यात? त्यात पोषणमूल्ये किती असतात?

पित्तामधील द्रवत्व (पातळपणा) कमी झाल्यावर त्या पित्ताला अग्नीचे कार्य करता येते. प्रत्यक्षातही जठरामध्ये स्त्रवणार्‍या अम्ल स्त्रावामध्ये जेव्हा पाण्याचा अंश कमी होऊन त्याचा पीएच कमी होतो, तेव्हाच ते अम्ल अधिक संहत होऊन अन्नपचनास पूरक होते. याचा अर्थ जर पित्तामध्ये पाण्याचा अंश वाढला तर त्याची तीव्रता कमी होईल आणि अग्नीची भूक, पचन आदी कार्ये नीट होऊ शकणार नाहीत, जे शरद ऋतुमध्ये घडते.

आणखी वाचा: Health Special: डाएट कसं सुरू करायचं?

वर्षा ऋतुमध्ये शरीरामध्ये वाढलेला ओलावा (पाण्याचा अंश) शरद ऋतुमध्ये सुद्धा शरीरात काही प्रमाणात राहतो, त्या ओलाव्यामुळे पित्तामध्ये द्रवत्व सुद्धा वाढते. पित्त पातळ झाल्याने अग्नी मंद होतो. हे पटवण्यासाठी चरकसंहितेचे भाष्यकार आचार्य-चक्रपाणी उदाहरण देतात की पाणी जरी तापलेले असले तरी ते अग्नी (आग) विझवते, तसेच पाण्याचे प्रमाण वाढलेले पित्त अग्नी (भूक,पचनशक्ती व चयापचय) मंद करते.

ज्या व्यक्तींची (त्यातही कफप्रकृती व्यक्तींची) शरीरे ओलावा (पाण्याचा अंश) अधिक काळ शरीरात धरुन ठेवतात, त्यांच्याबाबत शरदात अग्नी मंद होण्याची शक्यता अधिक. शरदात वाढलेला जलांश (पाण्याचा अंश) एकीकडे पित्ताला अधिक द्रवरूप (पातळ) बनवून अग्नीला मंद करतो, तर दुसरीकडे पित्ताला अधिक पातळ करुन शरीरभर पसरवतो. आणि पित्तप्रकोपाला कारणीभूत होतो. त्यातही कफप्रकृती व्यक्ती ज्यांच्या शरीरामध्ये जलांश जात्याच अधिक असतो, त्यांना भूक मंदावण्याचा त्रास आधिक्याने होताना दिसतो,तर पित्तप्रकृती व्यक्तींमध्ये पित्तविकार वाढण्याचा त्रास अधिक प्रमाणात होताना दिसतो.

आणखी वाचा: Health Special: फिजिओथेरपी आणि गुडघ्याचा ऑस्टिओआर्थरायटिस

पित्तप्रकोप

शरद ऋतुमधील सर्वात महत्त्वाची विकृती म्हणजे पित्तप्रकोप! वर्षा ऋतूमध्ये (पावसाळ्यामध्ये) निसर्गात वाढलेल्या अम्लत्वामुळे (आंबट रसाच्या प्रभावामुळे) शरीरामध्ये पित्ताचा संचय झालेला असतो. शरीरामध्ये साठलेले ते पित्त शरद ऋतुमधील उष्णतेमुळे द्रवीभूत (पातळ) होऊन शरीरामध्ये वाढते- पसरते- उसळते म्हणजेच पित्ताचा प्रकोप होतो. हा पित्तप्रकोप विविध विकारांना कारणीभूत होतो. वास्तवात पित्तप्रकोप शरदात होत असला तरी त्याची सुरुवात काही वेळा, काही व्यक्तींमध्ये (विशेषतः वात- पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये) वर्षा ऋतुच्या शेवटीच होताना दिसते. पावसाळ्याच्या शेवटी जेव्हा पावसाचे प्रमाण कमी होत जाते आणि उन्हाचा जोर वाढू लागतो तेव्हाच शरीरात जमत चाललेल्या पित्ताचा प्रकोप सुरु होतो.

प्रत्यक्षातही शरद ऋतु सुरु होण्यापूर्वीच पावसाळ्याच्या अंती पित्तप्रकोपामुळे होणार्‍या वेगवेगळ्या पित्तविकृतींचे रुग्ण
उपचारासाठी वैद्य-डॉक्टरांकडे येऊ लागतात. जसे- छातीत- पोटामध्ये जळजळ, पोटामध्ये आग होणे, तोंडामध्ये आंबट पित्त येणे, रोजचेच जेवण तिखट लागणे, तोंड येणे, जीभ सोलणे, तोंडामध्ये व्रण येणे, फिशर्स- पाईल्स यांसारखे गुदविकार उफाळणे, गुदमार्गावाटे रक्त पडणे, नाकामधून रक्त वाहाणे, अंगावर खाज येणे, त्वचेवर पित्त उठणे, अंगावर पुळ्या- फोड उठणे, पिंपल्सचा त्रास सुरु होणे वा असल्यास उफाळणे,डोके चढणे, डोकं दुखणे, चक्कर, डोळ्यांसमोर अंधार, अर्धशिशी वगैरे…

पित्तप्रकोप का होतो?

पावसाळ्यानंतरचा शरद ऋतु हा पित्तप्रकोपाचा काळ. हा काळ मराठी महिन्यांनुसार अश्विन- कार्तिकमध्ये येणे अपेक्षित असते, म्हणजे साधारण दिवाळीच्या आसपास. मात्र सध्या पृथ्वीच्या कालचक्रामध्ये प्रदूषण आदी अनेक कारणांनी झालेल्या बदलांच्या परिणामी हा शरद ऋतुचा काळ ऑगस्टच्या शेवटी सुरु होतो. प्रत्यक्षात शरीरामध्ये उष्णता वाढून होणार्‍या पित्तप्रकोपाच्या विविध तक्रारींनी त्रस्त झालेल्या रुग्णांची सुरुवात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासुनच सुरू होते. पावसाळ्याच्या शेवटी वातावरणातला उष्मा जसजसा वाढत जातो, तसतसा शरीरामध्ये उष्णता वाढून पित्तप्रकोपाचा त्रास होताना दिसतो. त्यामुळे उष्णता वाढणारा काळ तो पित्तप्रकोपाचा काळ असे म्हणायला हवे.

वास्तवात वर्षा ऋतुमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये अम्ल (आंबट) रसाचा नैसर्गिकतः प्रभाव असतो, ज्याच्या परिणामी शरीरामध्येही आंबट रस वाढतो. सहा रसांमध्ये आंबट सर्वाधिक पित्तप्रकोपक असल्याने आंबट रसाच्या प्रभावामुळे पावसाळ्यातच शरीरामध्ये पित्ताचा संचय होऊ  लागतो म्हणजे शरीरामध्ये पित्त वाढू लागते. मात्र पावसाळ्यात वातावरणामध्ये असणारा ओलावा व गारवा शरीरामधील त्या पित्ताला प्रकुपित होऊ देत नाही. पावसाळ्यात शरीरामध्ये जमलेल्या पित्ताचा प्रकोप होतोशरद ऋतुमध्ये; ज्याचे महत्त्वाचे कारण असते या दिवसांमध्ये वातावरणात वाढणारी उष्णता आणि निसर्गतः प्रबळ होणारा खारट रस.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special why in autumn we dont get hungery that often heat temperatures rise indigestion pitta prakop hldc vp
Show comments