Health Special: तांदूळ खाऊन डायबिटीस होतो, वाढतो आणि त्यामुळे तांदूळ खाणे वाईट याबद्दल असे विविध प्रकारचे गैरसमज विविध माध्यमातून एका पिढीवर लादले गेले. दाक्षिणात्य आहाराचा मुख्य भाग असणारा भात हळूहळू घराघरांत वजा होऊ लागला. या सगळ्यात आहारतज्ज्ञ मात्र भात किंवा तांदूळ आहारात समाविष्ट करायला हवेत याबाबत आग्रही होते.
वेळ महत्त्वाची
मात्र, भाताचा आहारातील समावेश हा वेळ, प्रकार या गोष्टी लक्षात ठेवू करणे आरोग्यदायी असते; त्याचबद्दल थोडेसे !
“मी गेले महिनाभर आंबील आणि भात खातेय आणि मला सगळे इतके हसत होते. पण आता सगळ्यांनीच भात खायला सुरुवात केलीये. माझी अॅसिडिटी कमी झाली आणि आश्चर्याची गोष्ट ही, की माझं स्टबर्न वेट कमी झालंय!”
सावी आनंदाने सांगत होती. तिच्या चेहऱ्यावर अर्थात आश्चर्य आणि आनंद दिसत होता.
हेही वाचा >>>Hina Khan : अभिनेत्री हिना खानला स्टेज-३ स्तनाचा कर्करोग; स्टेज-३ कर्करोग नेमका काय असतो? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
ऊर्जा व पोषणमूल्ये
अनेक खेळाडूंच्या आहारात भात आणि त्यापासून तयार केले जाणारे पदार्थ आवर्जून समाविष्ट केले जातात. केवळ ऊर्जाच नव्हे तर आवश्यक पोषणमूल्ये असणारे तांदूळ हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पिकवला जाणाऱ्या धान्यांमधलं महत्त्वाचं धान्य आहे! दक्षिणात्य आहारात रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेल्या भाताचं विशेष महत्व आहे. अशा प्रकारे भात खाल्ल्यास शारीरिक व्याधी दूर होतात आणि उत्तम ऊर्जा मिळते.
भाताचे विविध प्रकार
भाताचे विविध प्रकार भारतात आढळून येतात. तांदळाच्या ग्लासेमिक इंडेक्स वरून त्याची गुणवत्ता जाणली जाते. ती जाणण्याचा सोपा प्रकार म्हणजे तांदळाचा रंग. जितका तांदूळ कमी प्रक्रिया केलेला असेल तितका तो पोषक असतो. भिजवलेल्या भातामध्ये जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ तसेच अनेक पोषण घटकांचे प्रमाण उत्तम असते. संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, या भातामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते आणि प्रथिने तसेच तंतूमय पदार्थांचे प्रमाण वाढलेले असते.
हेही वाचा >>>थंड आणि गरम पाणी मिसळून का पिऊ नये? त्यामागची पाच कारणे अन् आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की वाचा…
महत्त्वाची जीवनसत्त्वं असलेला भात
भात शिजवून त्यात पाण्याचं प्रमाण भाताएवढंच ठेवलं जातं. अनेकदा या भाताला दही आणि मिरचीची फोडणी देऊन चविष्ट करून नाश्त्यासाठी आहारात समाविष्ट केलं जातं. किंबहुना डोसा किंवा आंबोळीच्या पिठामध्ये हे भाताचं मिश्रण एकत्र करून त्याचे उत्तम डोसे, उत्तपे, आंबोळी यासारखे पदार्थ केले जाऊ शकतात. ज्यांना पोटाच्या तक्रारी आहेत त्यांनाही थोडंसं मीठ एकत्र करून हा भात न्याहारीसाठी आहारात समाविष्ट केल्यास त्वरित आराम पडतो. केवळ महत्वाच्या पोषणघटकांचंच नव्हे तर अनेक खनिजांच प्रमाणही या भातात जास्त असतं. जीवनसत्त्व बी ६, बी १२ यांचं मुबलक प्रमाण या भातात आढळून येतं.
भिजवलेला भात आणि रोगप्रतिकारक शक्ती
भिजवलेल्या भातामध्ये लॅक्टिक आम्लाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे भातातील अनावश्यक घटकांचे प्रमाण कमी होते. हा भात आतड्यातील विविध सूक्ष्माणूंसाठी उपयुक्त असतो. अशा भातात लोहाचे प्रमाण नेहमीच्या भातापेक्षा कैक पटींनी जास्त असते. शिवाय सोबत कॅल्शिअम, पोटॅशिअम यांचे प्रमाण उत्तम असते. असा विविध पोषणघटक, खनिजे, मूलद्रव्ये यांनी युक्त असलेला हा भात केवळ पचनक्रियाच नव्हे तर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास देखील कारणीभूत ठरतो.
मधुमेहींसाठी भात
मधुमेहींसाठी देखील अशा प्रकारचा भात ज्याला आंबील किंवा खिमटी असे देखील म्हटले जाते तो अत्यंत उपयुक्त आहे. मॅग्नेशिअम आणि तंतूमय पदार्थ यांचे उत्तम प्रमाण असलेला तसेच ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारा हा भात रक्तातील साखरेवर अनावश्यक परिणाम करत नाही. शरीरातील हाडांना मजबुती देणे, सांधेदुखी कमी करणे तसेच स्नायूंना बळकटी देण्यासाठी या प्रकारचं भाताचं स्वरूप उपयुक्त ठरतं . रात्रभर भिजवून ठेवलेला भात डोसा, इडली, आंबोळी, घावण यासारख्या विविध प्रकारच्या आहारात समाविष्ट केला जाऊ शकतो.
रात्रभर भिजवलेला भात
विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात भारतीय थंडगार नाश्ता म्हणून भाताचे आंबील, दूध आणि घावन , दही -भात या स्वरूपात आपण रात्रभर भिजवलेला भात आवर्जून समाविष्ट करू शकतो. रात्रभर भिजवून ठेवण्याच्या भाताच्या प्रकारात बासमती, इंद्रायणी, उकडा तांदूळ यासारखे तांदळाचे प्रकार आवर्जून वापरावेत. तुम्ही तुमच्या आहारात अशा प्रकारचं आंबील नक्की समाविष्ट करा आणि त्याचे उत्तम परिणाम आम्हाला नक्की कळवा!