Can cashews make you gain weight: काजू हा सुक्या मेव्यातील सर्वांना आवडणारा घटक आहे. काजूची भाजी, मिठाई, भाजलेले किंवा कच्चे काजू अशा वेगवेगळ्या प्रकारे काजू खायला आपल्याला आवडते. काजूमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि प्रथिने आढळतात. त्यासह मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी असे पोषक घटकदेखील आढळतात. म्हणजेच बहुतांश सर्वांना आवडणारे काजू आरोग्यासाठी भरपूर गुणकारी आहेत. तसेच काही आजारांसाठीदेखील काजू खाणे फायदेशीर मानले जाते. परंतु, काजूचे सेवन केल्याने तुमचे वजन वाढू शकते काय, याविषयी हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्सचे आहारतज्ज्ञ नामपल्ली यांनी याविषयी माहिती दिली असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबाबत जाणून घेऊ…

काजूमध्ये (Cashew ) व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर, झिंक, लोह, मँगनीज व सेलेनियम यांसारखे पोषक घटक आढळतात. त्यामुळे काजू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. काजू हा अत्यंत पौष्टिक असून, त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काजूचे सेवन केल्याने आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला मिळतात; जे मेंदूच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. त्याशिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, हाडे व स्नायू मजबूत करणे आणि अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास काजू मदत करतात.

काजू खाण्याचे फायदे

हृदय निरोगी ठेवते

काजूमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात आढळते. तसेच काजूच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे काजू खाल्ल्याने हृदय निरोगी राहते.

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

काजूमध्ये अँटिऑक्सिडंट्सह झिंक मिनरल आणि व्हिटॅमिन्स यांसारखे आवश्यक पोषक घटक आढळतात. त्यामुळे काजू खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते.

स्मरणशक्ती वाढते

रोज काजू खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. यामध्ये आढळणारे फॅटी ॲसिड मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे रोज काजू खाण्याचा सल्ला दिला जातो.

साखर नियंत्रणात राहते

तज्ज्ञांच्या मते काजूमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आर्जिनिन आढळतात. हे पोषक घटक साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. परंतु काजूमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे काजूचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

काजू खाल्ल्यामुळे खरंच वजन वाढते का?

काजूचे जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते. अशा स्थितीत, तुमचे वजन वाढू नये, असे वाटत असेल तर आणि त्याचे पौष्टिक फायदे मिळविण्यासाठी दररोज थोड्या प्रमाणात काजूचे सेवन करा. संतुलित आहाराचा भाग म्हणून एका ठरावीक प्रमाणात काजूचे सेवन केल्याने वजन वाढत नाही. तज्ज्ञ किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच काजूचे सेवन करणे कधीही चांगले.