जर तुम्हाला उदास वाटत असेल, तर कदाचित तुमच्या शरीरातील ड जीवनसत्वाची पातळी कमी झालेली असू शकते. विशेषत: महिलांमध्ये ड जीवनसत्वाची पातळी कमी होणं आणि नैराश्य किंवा स्मृतिभ्रंश होण्यामध्ये एक संबंध असल्याचे अनेक अभ्यासात आढळून आलं आहे. आतापर्यंत ड जीवनसत्व हे नैराश्य किंवा स्मृतिभ्रंशाचे थेट कारण असल्याचे सिद्ध झालेले नसले तरी शरीरातील जीवनसत्वाची पातळी कमी झाल्यामुळे नैराश्य येण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याचा धोका जास्त असतो, असं आढळून आलं आहे.
ड जीवनसत्व शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे, जे कॅल्शियम शोषण्यास मदत करते आणि हाडे मजबूत करण्याचे काम करते. याशिवाय स्नायूंना काम करण्यासाठी ड जीवनसत्वाची गरज असते. तसेच ड जीवनसत्व आनंदाची भावना निर्माण करणाऱ्या सेरोटोनिन आणि डोपामाइनसारख्या हार्मोन्सना सक्रिय करण्यासाठीही ओळखले जाते. ड जीवनसत्वाची पातळी कमी झाल्यामुळे तुम्हाला नैराश्याचा सामना का करावा लागतो? त्यामागची नेमकी कारणं काय आहेत. याबाबतची सविस्तर माहिती डॉक्टर पल्लवी जोशी, सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ आणि डॉ. स्नेहा राजीव, सल्लागार, प्रसूती आणि स्त्रीरोग, मणिपाल हॉस्पिटल, बंगळुरू यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली आहे ती जाणून घेऊया.
हेही वाचा- शरीराची ठेवण योग्य नसेल तर तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
सध्या सुरू असणाऱ्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात ड जीवनसत्वाची कमी पातळी आणि नैराश्य यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, ड जीवनसत्व हा एक प्रकारचा न्यूरोएक्टिव स्टिरॉइड आहे. जे 5-HT, DA आणि NE मेंदू रिसेप्टर्सच्या नियमनासाठी आवश्यक आहे. अँटिऑक्सिडंट ( Anti-oxidant हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते) न्यूरोइम्युनोमोड्युलेशन आणि इतर अनेक न्यूरोट्रॉफिक घटकांचे उत्पादन यांसारख्या महत्त्वपूर्ण मेंदूच्या कार्यांमध्येदेखील समाविष्ट आहे. ड जीवनसत्व आनंदाची भावना निर्माण करणाऱ्या सेरोटोनिन आणि डोपामाइनसारख्या हार्मोन्सना सक्रिय करण्यात मदत करते. ड जीवनसत्वाची कमतरता न्यूरोलॉजिकल कार्यामध्ये अडथळा आणू शकते, मेंदूद्वारे सेरोटोनिन आणि डोपामाइनचा स्राव कमी करू शकते, ज्यामुळे नैराश्याची लक्षणांमध्ये बिघाड होऊ शकतो.
सध्या सुरू असलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, गर्भवती महिलांमध्ये ड जीवनसत्वाची पातळी कमी झाल्यामुळे प्रसूतीनंतर नैराश्याच्या समस्येमध्ये वाढ होते. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे नैराश्य वाढीला समर्थन देणारे आणखी एक उदाहरण म्हणजे, सूर्यप्रकाश न मिळणाऱ्या भौगोलिक भागातील महिलांमध्ये हिवाळ्याच्या दिवसांमध्ये नैराश्याच्या प्रमाणात वाढ होते. कारण ड ३ जीवनसत्व सूर्यापासून मोठ्या प्रमाणात मिळते.
हाडांचे आरोग्य, रोग प्रतिकारकशक्ती, जळजळ कमी करणे आणि पेशींच्या विकासास चालना देण्यासह आपले आरोग्य चांगले ठेवण्यात ड जीवनसत्व महत्वाची भूमिका बजावते. जळजळ नैराश्याच्या समस्येचा पाया मानला जातो, कारण त्याचा थेट परिणाम नैराश्याच्या स्थितीवर होतो. जळजळ कमी करण्यात मदत करणारे घटक नैराश्याची समस्या कमी करण्यास मदत करतात. ड जीवनसत्वाची पातळी कमी झाल्यास ते दाहकविरोधी क्रियांमध्ये अडचणी आणू शकतात, ज्यामुळे नैराश्य वाढण्याचा धोका उद्भवतो. ड जीवनसत्व शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे, जे कॅल्शियम शोषण्यास मदत करते आणि हाडे मजबूत करण्याचे काम करते. ते शरीरातील वेदना लक्षणीयरित्या कमी करतात, ज्यामुळे नैराश्याची लक्षणे कमी होतात.
हेही वाचा- उपवासाला साबुदाणा खावा का? वाचा आहारतज्ज्ञ काय सांगतायत….
जेव्हा गर्भधारणेचा विचार केला जातो, तेव्हा २०२० मध्ये केलेल्या अभ्यासांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता आणि प्रसूतीनंतरचे नैराश्य यांच्यातील संबंध आढळून आला आहे. अभ्यासकांच्या मते या नैराश्याच्या समस्या उद्भवण्यात खराब झोपेची गुणवत्ता महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. २०१९ मधील एका अभ्यासात असे आढळून आले की, ड जीवनसत्वाची कमतरता ही संधिरोगाने ग्रस्त प्रौढांमधील नैराश्येशी स्वतंत्रपणे संबंधित आहे. तसेच २०२१ मधील एका अभ्यासात ड जीवनसत्वाच्या कमतरतेचा आणि लोकांमधील नैराश्येचा संबंध आढळून आला आहे.
लोक नेहमी पुरेशा आहाराच्या शोधात असतात, परंतु नियमित सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहणं आणि संतुलित आहार घेणं हा शरीरात ड जीवनसत्वाची पातळीत समतोल राखण्याचा एकमेव मार्ग आहे. एंडोक्राइन सोसायटीने शिफारस केली आहे की, गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसह बहुतेक प्रौढांना दररोज १५०० ते २००० आंतरराष्ट्रीय युनिट्स ड जीवनसत्व मिळणं आवश्यक आहे. तर एक वर्षांखालील अर्भकांना आणि १८ वर्षांखालील मुलांना दररोज ४०० ते १००० आणि ६०० ते १००० युनिट्स ड जीवनसत्व मिळायला पाहिजे. ज्या लोकांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) ३० पेक्षा जास्त आहे – जे लठ्ठपणा दर्शवते त्यांना शिफारस केलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन पट जास्त जीवनसत्वाची आवश्यकता आहे.