अंगाची काहिली करणारा उन्हाळा सुरु झाला आहे..भर दुपारच्या वेळेत तर घराबाहेर पडूच नये अशा ऊन्हाच्या झळा मारत असतात. कालपासून तर सूर्य विषुववृत्तावर पृथ्वीच्या माथ्यावर असल्याने थेट सरळ किरणे पडत आहेत, ज्यामुळे कधी नव्हे असे ४० अंशाहून अधिक तापमान मुंबईमध्ये आहे.या ऊष्ण व दमट वातावरणामध्ये उष्णतेचे विकार बळावणे, हे निसर्गाच्या नियमाला धरुनच म्हटले पाहिजे. त्यातही ज्यांना उन्हाचा प्रत्यक्ष सामना करावा लागतो अशा मंडळींना, ज्यांना ऊन बाधते, अशा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना आणि कडक उन्हाळा असूनही उष्ण गुणांचा आहार घेणार्यांना उन्हाळा फार बाधतो. त्यामुळे विविध उष्णताजन्य तक्रारी या दिवसांमध्ये त्रस्त करतात. जसे- मूत्रविसर्जन वा मलविसर्जन करताना दाह वा वेदना होणेअंगावर पित्त उठणे, तोंड येणे, त्वचेवर उष्णतेच्या पिटीका येणे, नाकातून वा गुदावाटे रक्त पडणे वगैरे. या सर्व तक्रारींना प्रतिबंध म्हणून आणि तक्रारी फार गंभीर नसताना घरच्याघरी करण्याजोगा सुरक्षित उपचार म्हणजे ’सब्जा’.
सब्जा हे तुळशीसारखेच एक लहानसे क्षुप असते, जे सर्वत्र उगवते. त्यातही पंजाब राज्यामध्ये सब्जाची रोपटी अधिक पाहायला मिळतात. या सब्जाच्या झाडाचे बी हे तुळशीच्या बीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचे व काळसर-करड्या रंगाचे असते. हे बी पाण्यामध्ये भिजवल्यावर ते फुगते व पाणी शोषून पांढरट रंगाचे व बुळबुळीत बनते. भिजून फुगल्यानंतर हे बी पाण्यामधून, दुधातून वा सरबतातून घेतल्यास ते उष्णताजन्य वरील विकारांवर अतिशय गुणकारी ठरते.
सब्जाचे बी हे चवीला गोड असून शरीरातला थंडावा वाढवून ऊष्मा कमी करण्याचा अलौकिक गुण त्यांमध्ये आहे. सब्जा बीमुळे मूत्र सहज सुटते व मूत्रविसर्जन करताना होणारा दाह व वेदना दूर होते. या दिवसांमध्ये काही जणांना वारंवार मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाचा (युरिन इन्फेक्शनचा) त्रास होतो. अशा लोकांनी सब्जाचे बी सकाळ-सायंकाळ घेतल्यास चांगला आराम पडतो. विशेष म्हणजे वरील आजार झाल्यानंतर औषध घेतात, तसे न घेता त्या तक्रारी होऊच नयेत म्हणून घेण्यासारखे सब्जा हे सुरक्षित औषध आहे. सब्जाचा शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्याचा गुण तर इतका प्रभावी आहे की, दिवसातून तीन-चार वेळा सब्जा घेतल्यास शरीरामध्ये एसी ठेवल्यासारखा परिणाम होतो. या तळपत्या उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे येणार्या पाहुण्याचे स्वागत सब्जा बी देऊनच केले पाहिजे…म्हणजे येणार्या-जाणार्या प्रत्येकाला सरबतही मिळेल आणि औषधही !