आयुर्वेदाने दूध व दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे अतिसेवन व त्याला अव्यायामाची जोड स्थौल्यास व मधुमेहाला कारणीभूत होते, असे सांगितले आहे, ते चीजला सर्वाधिक लागू होईल कारण चीज हा आपल्या जनुकांसाठी अपरिचित पदार्थ आहे.

आजच्या आधुनिक जगामध्ये जगामधील सर्व संस्कृती एकमेकांच्या जवळ आल्यामुळे खाद्यसंस्कृतींचाही मिलाप होऊ लागला आहे. त्यामुळे आजच्या नवीन पिढीला पाश्चात्यांचे विविध खाद्यप्रकार सेवन करायला मिळू लागले आहेत. त्यातलाच एक आहारीय पदार्थ म्हणजे ‘चीज’. पिझ्झा-बर्गर वगैरे पाश्चात्य खाद्यप्रकारांमध्ये चीजचा मुबलक वापर केलेला दिसतो आणि नवीन पिढी या चीजला चटावलेली दिसते. मात्र भारतीयांसाठी चीज हा अपरिचित आहार आहे. दूधाचे दही-दह्याचे ताक-ताकाचे लोणी व लोण्याचे तूप बनवण्याची आपली परंपरा आपल्या देशामध्ये हजारो वर्षांपासून सुरु आहे.. या आहार-परंपरेमध्ये चीज कसे बनवायचे तेसुद्धा आपल्याला माहीत नाही. त्यामुळे चीज कसे पचवायचे ते आपल्या शरीराला(अग्नीला) माहीत असणार कसे? अनुवंशिकता-शास्त्रानुसार हे सत्य आहे की जो खाद्यपदार्थ खाण्याची हजारो वर्षांपासून आपल्याला सवय नाही तो आपण पचवू शकत नाही.

चीज खाल्ल्यानंतर तुम्हां-आम्हांला अम्लपित्तापासून मलावरोधापर्यंत आणि पोटफुगी-अपचनापासून सर्दी-खोकल्यापर्यंत विविध त्रास होतात, ते त्याचेच निदर्शक आहे. चीज खाल्ल्यानंतर होणा-या या आरोग्याच्या तक्रारी होण्यामागे शरीराचाही एक दूरदृष्टीकोनही असतो. तो असा की चीज खाल्यामुळे पुढे जाऊन होऊ शकणारे दीर्घकालीन गंभीर आजार हे चीज खाताना तुमच्या लक्षात येत नसले तरी शरीर-आत्म्याला ते निश्चीतपणे दिसतात. चीज खाल्ल्यानंतर होणारे लहानसहान आजार म्हणजे वास्तवात तुम्हांला भविष्यात होऊ शकणा-या आजारांसाठी सावध करणारी शरीराने वाजवलेली धोक्याची घंटा असते. ती धोक्याची घंटा ओळखायला शिका व होता होई तो चीजपासून दूर रहा. मथितार्थ हाच की रोजच्या चवीमध्ये फेरबदल, रोजच्या आहारामध्ये वेगळेपणा म्हणून एखादवेळेस चीजचा आस्वाद घेण्यास हरकत नाही, मात्र तो आपल्या नित्य सेवनाचा पदार्थ बनू नये.