उन्हाळ्यामध्ये ज्या तक्रारींनी रुग्ण बेजार होतात, त्यातली एक महत्त्वाची तक्रार म्हणजे “मलावरोध किंवा शौचाला साफ न होणे”. काही रुग्णांना मलावरोधाचा एवढा त्रास होतो की कुंथल्याशिवाय त्यांना शौचास होतच नाही किंवा कडक मलप्रवृत्ती हो‌ऊन मलविसर्जनाच्या वेळी वेदना होतात या दोन्ही कारणांमुळे अनेकांना पाईल्स, फिशर्स अशा गुदविकारांचा त्रास सुद्धा होतो. उपचारासाठी येणार्‍या अनेक लहान मुलांनासुद्धा या उन्हाळ्यात तीन-तीन, चार-चार दिवसांनी शौचास होते व जेव्हा होते तेव्हा खड्याच्या स्वरुपात होते. वास्तवात मलावरोधाचा त्रास हिवाळ्यात अधिक त्रास देतो (वातावरणामध्ये व शरीरामध्ये वाढलेला कोरडेपणा, चलनवलनाचा अभाव व कमी जलप्राशन ही त्यामागची कारणे); मात्र उन्हाळ्यात तर वातावरण कोरडे नसते, उलट दमट व उष्ण असते आणि आपण पाणीसुद्धा भरपूर प्रमाणात पितो (अगदी वारंवार, ते इतके की पाण्यानेच पोट टम्म फ़ुगते); मग तरीही उन्हाळ्यामध्ये मलावरोधाचा त्रास का व्हावा?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलावरोध होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मलाला मृदुता-नरमपणा येत नाही. पण भरपूर पाणी पि‌ऊनही मल मॄदु का होत नाही? याचाच अर्थ प्राशन केलेले पाणी मलापर्यंत पोहोचत नाही. मग आपण पितो ते पाणी जाते कुठे? ते जाते उष्म्याच्या काहिलीने शरीरामधून कमी झालेल्या पाण्याची भरपा‌ई करण्यामध्ये. इतर ऋतुंच्या तुलनेमध्ये उन्हाळ्यामध्ये शरीराची पाण्याची गरज दुपटीने वाढते, त्यात सध्या जी अंगाची काहिली होत आहे त्या उष्म्यामध्ये तर अधिकच. अंगातला हा उष्मा कमी व्हावा म्हणून लोक थंड पेये पित असतात, परंतू ही थंड पेये मलावरोध कमी करण्यासाठी उपयोगी पडत नाहीत असे दिसते. तुम्ही जेवढे थंड पाणी पिता त्यातला बराचसा भाग लहान आतड्यांमार्फत शोषला जातो, शरीराची द्रवहानी भरुन काढण्यास उपयोगी पडतो व नंतर मूत्रविसर्जनावाटे शरीराबाहेर फेकला जातो. ते पाणी जितक्या मात्रेमध्ये आवश्यक असते तितक्या मात्रेमध्ये मोठ्या आतड्यांपर्यंत पोहोचत नाही. पाणी मोठ्या आतड्यापर्यंत पर्याप्त प्रमाणात पोहोचले तर तिथल्या मलाची कठिणता कमी हो‌ऊन तो मृदु होणार् ना! थंड पाण्याचा हा दोष म्हणायला हवा की ते मूत्रविसर्जन वाढवते मात्र मलविसर्जनास साहाय्यक होत नाही.

त्यातही ज्या वातप्रकृतीच्या व्यक्ती असतात, ज्यांच्या शरीरामध्ये स्वाभाविकरित्या कोरडेपणा असतो, त्यांच्या आतड्यामध्ये स्त्रवणारे नैसर्गिक स्त्राव इतरांच्या तुलनेमध्ये कमी असल्याने मलाला जात्याच कोरडेपणा असतो, जो उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या अभावी अधिकच वाढतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्यांना हा मलावरोधाचा त्रास जाणवतो, त्यांच्यासाठी सोपा उपाय म्हणजे कोमट पाणी पिणे. उन्हाळ्यात कोमट पाणी पिण्याचा हा सल्ला कोणाला अगोचर वाटेल, पण ज्यांना कठिण मल होतो व त्यामुळे मलविसर्जन करताना त्रास होतो, त्यांच्यासाठी हा सहजसाध्य असा उपाय आहे. अर्थात मलावरोधाला कारणीभूत तंतुयुक्त आहाराचा अभाव, आहारामध्ये स्नेह म्हणजे चरबीची कमी, चलनवलनाचा-व्यायामाचा अभाव या इतर कारणांचाही विचार करायला हवा. सांगण्याचा मथितार्थ हाच की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी प्यायलात , मात्र ते थंड असेल, तर मलावरोधाची तक्रार दूर होणार नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips in marathi disadvantages of drinking too much cold water