रात्रपाळीचे काम पूर्वी फ़क्त सुरक्षारक्षकांना,वृत्तपत्राच्या छपाई विभागात काम करणार्यांना आणि क्वचित काही कारखान्यांमध्ये कामगारांना विशेष कामानिमित्त करावे लागत असे.हल्ली मात्र अशी अनेक कामे व व्यवसाय आहेत,ज्यांमध्ये लोकांना रात्री जागरण करावे लागते. त्यात आधुनिक संगणकयुगामधील कॉल सेन्टर्स, अमेरिका-युरोप मधील देशांबरोबर व्यवहार करत असल्याने, त्यांच्या वेळेनुसार काम करतात.साहजिकच तिथे दिवस असतो,तेव्हा आपल्या लोकांना काम करावे लागते,जेव्हा आपल्याकडॆ रात्र असते.
२१व्या शतकामधील अनेक जणांना रात्री जागरण करावे लागते आणि रात्री झोप मिळत नसल्याने दिवसा झोपावे लागते.मग या मंडळींनी नेमके कधी झोपावे,किती झोपावे याचे काही मार्गदर्शन करता येईल का? होय, २१व्या शतकातल्या या प्रश्नाचे उत्तर दिले आहे, निदान पाच हजार वर्षांपूर्वी रचलेल्या आयुर्वेद शास्त्राने. वेगवेगळ्या कारणांनी ज्यांना रात्री जागरण करावे लागते,त्यांनी झोप कशी घ्यावी- किती घ्यावी,याचेसुद्धा मार्गदर्शन आयुर्वेदशास्त्र करते.
रात्री कोणत्याही कारणास्तव तुम्हाला जागरण झाले तर रात्री जितका काळ तुम्हाला जागरण घडले असेल त्याच्या निम्म्या अवधी इतकेच दिवसा झोपावे.याचा अर्थ रात्री जर सहा तास जागरण झाले असेल तर दिवसा त्याच्या निम्मे म्हणजे तीन तास झोपावे.मात्र ही झोप कधीही घेणे अपेक्षित नाही,तर ती झोप अन्नग्रहणापूर्वी घेतली पाहिजे.
याचा अर्थ रात्रपाळी करुन आल्यानंतर घरी येऊन ,भरपेट जेवून झोपणे अयोग्य ,कारण ते रोगकारक होईल.
मानवाला ग्रस्त करणार्या आजकालच्या ऑटो-इम्युन डिसॉर्डर्स,ॲलर्जिक विकार व जीवनशैलीजन्य आजारामांगचे ‘दिवसा अन्नसेवनानंतर घेतलेली तासन्तास झोप’, हे एक महत्त्वाचे कारण आहे. जो दोष दुपारी जेवल्यानंतर झोपल्याने शरीराला संभवतो,तोच दोष सकाळी अन्नसेवन करुन झोपल्यामुळेसुद्धा बळावेल. किंबहुना सकाळच्या चार तासांमध्ये शरीर तुलनेने अधिक जड व शिथिल असल्याने सकाळी अन्नसेवन करुन घेतलेली झोप शरीराला अधिक सुस्त व जड बनवून आरोग्याला हानिकारक होईल,यात शंका नाही.
वाचा – Healthy Living: लठ्ठपणा कमी करा
रात्रपाळीनंतर घरी आल्यावर अगदीच भूक सहन होत नसेल, तर तांदळाची पेज वा मुगाचे कढण प्यावे किंवा एखादे फ़ळ खावे. ज्यांना अजिबात भूक सहन होत नाही अशा पित्तप्रकृतीचे असाल तर गार दूध पिऊन झोपावे, म्हणजे त्रास होणार नाही. अन्यथा कटाक्षाने अन्नसेवन टाळून झोपावे.रात्री झालेल्या जागरणाच्या निम्मी झोप पूर्ण झाल्यावर उठून,स्नान करुन, भूक लागली की जेवण जेवावे; जे आरोग्यास उपकारक होईल.
आयुर्वेदाने मानवी जीवनाशी संबंधित प्रत्येक लहानसहान पैलूचा किती साकल्याने विचार केला आहे आणि त्याला ’आयुष्याचा वेद’ का म्हणतात, हे इथे वाचकांच्या लक्षात येईल.