रक्तामधील साखरेची सात्म्यता-विकृती हा शब्द वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल. आपल्या रक्तामधील साखर ही आपल्या शरीराला, आपल्या शरीरकोषांना अनुकूल असते, असली पाहिजेच. मग तिची विकृती कशी काय होईल? होते असे की, सेवन केलेल्या अन्नापासून तयार होणारी साखर ही शरीरकोषांना उर्जा म्हणून सातत्याने एका सम प्रमाणात मिळत राहायला हवी. तेव्हाच शरीरकोष अर्थात शरीर त्याची विविध जैवरासायनिक कार्ये विनासायास पार पडू शकेल. दुर्दैवाने आजच्या आधुनिक जगामध्ये दहापैकी तीन जणांच्या शरीरात रक्तामध्ये साखरेची सम पातळी राहात नाही. त्यांच्या रक्तामध्ये साखर खूप जास्त वाढते आणि मग एकदम कमी होते. साखरेचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने शरीरकोषांना उर्जासुद्धा कमी जास्त मिळत राहते आणि त्यानुसार त्यांना विशिष्ट लक्षणे त्रस्त करत राहतात. या अवस्थेमध्ये त्या मंडळींना आपल्या रक्तामध्ये साखर सम पातळीत राहत नाही आहे, हे लक्षात आले तर पुढच्या विकृती टाळता येतील. कारण हेच लोक पुढे जाऊन वजनदार शरीराचे व आळशी बनतात. आपल्या शरीरामध्ये असे काही घडत आहे, हे कसे ओळखता येईल? ते ओळखण्यासाठी खालील प्रश्न वाचा:

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजेतवाने वाटत नाही?
२. झोपेतून उठल्यावरसुद्धा आळसावल्यासारखे वा पुन्हा झोपावेसे वाटते?
३. काय सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चहा-कॉफी प्यायल्याशिवाय उत्साह वाटत नाही?
४. तुम्हाला दिवसभरातून अनेकदा आळसावल्यासारखे वा झोपावेसे वाटते, विशेषतः जेवल्यानंतर?
५. अंगात उर्जा नाही म्हणून तुम्हाला व्यायाम करावासा वाटत नाही?
६. काय तुम्हाला मन एकाग्र करताना नेहमीच त्रास होतो?
७. तुम्हाला डोकेदुखीचा त्रास वारंवार होतो?
८. वेळेवर जेवण मिळाले नाही की तुम्हाला चीडचीड होते?
९. काय सहा तास अन्न मिळाले नाही तर तुम्हाला गळून गेल्यासारखे वाटते?

यामधील अर्ध्याहून अधिक प्रश्नांची उत्तरे “होय” असतील तर तुमच्या रक्तामध्ये साखरेची पातळी सम पातळीत राहत नाही, अशी शंका घेता येते. कदाचित तुम्हाला रक्तशर्करा असात्म्यता विकृतीचा त्रास असण्याची शक्यता आहे. अर्थात ‘आळस’ या एका कारणामुळे सुद्धा वरील लक्षणे दिसू शकतात, हे विसरु नका. कसेही असले तरी स्वयंनिदान करण्याची चूक करु नका.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips in marathi how to find glucose intolerance level in blood
Show comments