धूम्रपान हे आरोग्याला घातक आहे, हे वेगळे सांगायला नको. धूम्रपानाचा संबंध कॅन्सरशी असलेला सर्वसाधारण संबंध लोकांना माहीत आहे . मात्र धूम्रपान हे हायब्लडप्रेशरपासून हार्ट अटॅकपर्यंत आणि मधुमेहापासून नपुंसकत्वापर्यंत विविध आजारांना कारणीभूत होऊ शकत होते, हे समाजाला ज्ञात नाही. मानवी जीवनाचा अकाली शेवट करण्यास कारणीभूत सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे धूम्रपान. त्यामुळे सिगरेटचा पहिला झुरका मारताना हा आपल्याला अकाली स्मशानाकडे नेणार आहे, हे शहाण्या माणसाने ध्यानात घ्यावे. कारण एकदा धूम्रपानाच्या चक्रात माणूस अडकला की त्यातून बाहेर पडणे कठीण असते. धूम्रपानाचे हे व्यसन प्रत्यक्षात त्यामध्ये असलेल्या निकोटिनमुळे असते. तंबाखुमध्ये असलेल्या निकोटिनची शरीराला अशी काही चटक लागते की माणूस त्यापासून दूर राहू शकत नाही. वास्तवात धूम्रपानाला नादावलेले अनेक जण असे असतात, जे त्या व्यसनामधून बाहेर पडू इच्छितात. मात्र प्रयत्न करुनही काही जणांना ते शक्य होत नाही. अशा धूम्रपान सोडू इच्छिणार्यांसाठी एक खुशखबर आहे.
योगशास्त्रामध्ये प्राणायामाप्रमाणेच ध्यानाचेही महत्त्व आहे, ज्याला इंग्रजीमध्ये मेडीटेशन म्हणतात. या ध्यानाच्या साहाय्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या मानसिक दोषांपासून दूर राहता येते, हे तर सर्वज्ञात आहे. धूम्रपानाचे व्यसन हासुद्धा एक लोभच आहे. मग त्या लोभापासून माणसाला दूर करण्यासाठी योगशास्त्रामधील ध्यानाचा उपयोग होईल काय? निश्चीतपणे होईल.
धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्तींवर मॅसॅच्युएट्स युनिव्हर्सिटिमध्ये केलेल्या प्रयोगांमध्ये असे दिसून आले की धूम्रपानाने व्यसनाक्त असलेल्या ज्या व्यक्तींनी औषधी उपचाराला ध्यानाची जोड दिली, त्यांची धूम्रपानाची ओढ हळूहळू निश्चीतपणे कमी होत गेली. मॅसॅच्युएट्स युनिव्हर्सिटिमधील डॉक्टरांच्या मते दीर्घकालीन धूम्रपानामुळे मस्तिष्कामध्ये जे विपरित परिणाम झालेले असतात, ते बदल ध्यानामुळे कमी होत जाऊन मेंदुमध्ये सकारात्मक बदल होऊ लागतात आणि मनुष्याची धूम्रपानाप्रति असलेली ओढ कमी होत जाते. विशेष म्हणजे ध्यानाचा हा प्रभाव धूम्रपानाचा नाद कमी करण्यासाठी केवळ दोन आठवड्यांमध्येच परिणाम दाखवायला सुरुवात करतो, असा अनुभव आहे. सातत्याने दीर्घकाळ केलेले ध्यान तर निश्चीतपणे मनुष्यास धूम्रपानापासून परावृत्त करु शकते. ज्या योगशास्त्राचे मूळ भारतामध्ये आहे, ज्या ध्यानधारणेची परंपरा आपल्याकडे प्रदीर्घ काळापासून चालत आली आहे, त्या ध्यानाच्या सरावामुळे धूम्रपानासारखे प्राणघातक व्यसन दूर होणार असेल, तर दिवसातली काही मिनिटे ध्यानासाठी देण्यास काहीच हरकत नाही वाचकहो !