उत्तर भारतामध्ये पित्ताशय खड्यांचे आणि तत्सबंधित पित्ताशयाच्या कर्करोगाचे ( कॅन्सरचे) प्रमाण तुलनेने अधिक आहे. ज्यामागे पिण्याचे पाणी जड (अधिक क्षारयुक्त) असणे आणि चण्यांचे अतिसेवन ही कारणे आहेत, असे संशोधकांचे निरिक्षण आहे. चण्यांचा पित्ताशय खड्यांशी संबंध काय व कसा? असा प्रश्न वाचकांच्या मनात उभा राहिला असेल.
चणे हे शरीराला चांगले पोषण देतात, हे खरे असले तरी आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करता चणे अतिशय कोरडे (रुक्ष) आहेत. शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणे, हा चण्यांचा मोठा दोषच म्हणायला हवा. त्यामुळे जेव्हा चणे सेवन केले जातात, तेव्हा त्यांच्या पचनासाठी शरीराला अत्यधिक पाण्याची गरज पडते. चणे हे पचायला जड आहेत, हे आपण जाणतोच. चण्यांचे विघटन-पृथक्करण करण्यासाठी शरीराला इतर पदार्थांच्या तुलनेमध्ये अधिक ओलावा लागतो. जो शरीरामधूनच घेतला जातो. ज्यामुळे शरीरामधील पाणी कमी होते. साहजिकच शरीरामधील अत्यावश्यक स्त्रावांमधील पाणी सुद्धा कमी पडते. चणे खाल्ल्यानंतर मलाला कोरडेपणा येतो व अत्यधिक प्रमाणात अधोवायू सुटू लागतो, हा अनुभव सगळ्यांनी घेतला असेल. चणे खाल्ल्यानंतर भयंकर पोट फुगीचा त्रास झाल्यामुळे, वरचा श्वास वर आणि खालचा खाली अशी परिस्थिती झाल्यामुळे ,श्वसनास त्रास होऊ लागल्यामुळे उपचारासाठी इस्पितळात न्यावे लागल्याचे किस्से सुद्धा तुम्ही ऐकले असतील. हा सर्व चण्यांच्या कोरडेपणाचा प्रताप असतो.
वाहाणार्या सर्दीवरसुद्धा चणे उपयोगी पडतात, ते कारण चण्यांच्या कोरेडेपणामुळे शरीरातले स्त्राव शोषले जातात म्हणून. हे गुण चण्यांमध्ये असताना एक दोष सुद्धा आहे, तो म्हणजे चण्यांमध्ये चरबीचा अजिबात अंश नाही. पित्ताशयातले पित्त हे चरबीच्या पचनासाठी आतड्यात स्त्रवते. चण्यांमध्ये चरबी नसल्याने पित्ताशयातले पित्त न स्त्रवता तसेच साचत राहते. वारंवार-अधिक प्रमाणात व सातत्याने चणे खात राहिल्यास साहजिकच पित्ताशयामधील पित्त कोरडे पडते-साचत राहते व खड्यांमध्ये रुपांतरित होते. आपल्याकडे चणे एकटे न खाता गूळ-चणे वा चणे-शेंगदाणे खाल्ले जातात, ते गूळ व शेंगदाण्यामधील चरबीची जोड चण्यांना मिळावी म्हणून, हे सुद्धा या निमित्ताने आपल्या लक्षात येते. इतकंच नव्हे तर चैत्रामध्ये खाल्ल्या जाणार्या चण्याच्या डाळीमध्ये सुद्धा ओले खोबरे घातले जाते, ते का तेसुद्धा वाचकांच्या लक्षात आले असेल!