स्नायुबद्ध शरीराच्या ज्या विविध शरीरसौष्ठव-स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांची शरीरे कशी पिळदार व स्नायुबद्ध असतात. मुलुंडश्री-मुंबईश्री-महाराष्ट्रश्री या चढत्या क्रमाच्या अधिकाधिक स्नायुबद्ध शरीराच्या स्पर्धा असतात. त्याहीपुढे जाऊन भारत श्री-आशियाश्री व शेवटी परमोच्च स्पर्धा म्हणजे विश्वश्री. मग महाराष्ट्रश्री, भारतश्री किंवा त्याहीपेक्षा विश्वश्री स्पर्धेचा जो विजेता असतो, त्याचे शरीर हे सर्वाधिक पिळदार-प्रमाणशीर-स्नायुबद्ध व सौष्ठवपूर्ण असते, मग त्याला ‘आदर्श निरोगी शरीर’ म्हणता येईल का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असाधारण पद्धतीने दिवसाचे आठ-दहा तास व्यायाम करून सांध्यांवर व हाडांवर प्रचंड ताण देऊन स्नायुंना सुजवून तयार झालेल्या या शरीरांना निरोगी कसे म्हणता येईल? अनेकांना माहीत नसेल पण वैद्यकशास्त्रानुसार अतिव्यायाम करुन, असंख्य वेळा विशिष्ट स्नायुचे आकुंचन-प्रसरण करुन बनलेले हे शरीर स्नायु सुजल्याने तयार झालेले असते. प्रसंगी स्टेरॉईड्स व हार्मोन्सचेही सेवन करुन शरीराचा नैसर्गिक चयापचय बिघडवून शरीराचा घात करणाऱ्या ,अतिप्रथिनयुक्त आहाराचे अतिप्रमाणात सेवन करुन मूत्रपिंडावर ताण निर्माण करणाऱ्या, आपल्या शरीराची चपळ हालचाल करु न शकणाऱ्या, या शरीरसौष्ठवपटूंच्या शरीरांना निरोगी कसे म्हणता येईल? कारण शरीर निरोगी-स्वस्थ होण्यासाठी करावयाचा व्यायाम हा अशाप्रकारे करणे अपेक्षित नाही. यातल्या बऱ्याचशा व्यायामपटूंना पुढे अस्थी-स्नायु-सांधे-कंडरांसंबंधित वेगवेगळ्या विकृतींना तोंड द्यावे लागते. पाठीच्या कण्याची दुखणी तर जवळजवळ अनेकांना लागतात. हे असे शरीर सुअष्ठवपूर्ण करण्यासाठी करावा लागणारा आहाराचा अतिरेक तर लोकांना सांगूनही खरा वाटणार नाही. दिवसभरातून दहा-बारा अंड्यांचे सेवन, किलो- किलो मांस, दोनचार लीटर दूध, वगैरे अतिरेक) केल्या कारणाने त्यांच्या पचनशक्तीवर खूप ताण पडलेला असतो. प्रदर्शनीय शरीर निर्माण करण्याच्या नादामध्ये केलेल्या या आहाराच्या अतिरेकाचा पचनशक्तीवर ताण पडून त्यामुळे पुढे जाऊन अशा मंडळींना पचनासंबंधित विकार झाल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. काहींना तर सर्वसाधारण अन्नसुद्धा पचत नाही, असा अनुभव येतो.

मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने विचार केल्यासही व्यायाममध्येच रमलेले हे शरीरसौष्ठवपटू जर लहानसहान कारणांवरुन चिडत असतील, चिडले की मारपीट-भांडाभांडी करत असतील, थोडक्यात त्यांचा स्वतःच्या मनावर-रागावर ताबा नसेल, तर ते निरोगी कसे?व्यायामामुळे मिळालेल्या आपल्या सामर्थ्याचा गर्व होऊन ते इतरांना त्रस्त करत असतील तर त्यांचे शरीर सौष्ठवपूर्ण असले तरीही त्यांचे मन स्वस्थ नसल्याने त्यांना स्वस्थ-निरोगी म्हणता येणार नाही. थोडक्यात ज्याला आयुर्वेदाला अपेक्षित असलेले स्वास्थ्य यांच्याकडे नाही. मथितार्थ हाच की केवळ प्रदर्शनीय शरीर मिळवण्याच्या हेतुने व्यायामाचा अतिरेक करु नका. अतिरेकी व्यायामाने शरीर सौष्ठवपूर्ण झाले तरी निरोगी होईलच याची शाश्वती नाही.