आपल्या शरीराच्या प्रत्येक शरीरकोषाला शुद्ध रक्ताचा अव्याहत पुरवठा होणे नितांत गरजेचे असते .रक्ताचा पुरवठा होण्यासाठी रक्त पंप करण्याचे काम करते हृदय आणि  शरीरभर रक्त खेळवण्यासाठी पसरलेली पाईपलाईन म्हणजे रक्तवाहिन्या. त्यातल्या शुद्ध रक्त वाहून नेण्याचे काम करतात धमन्या. या धमन्यांमध्ये वयपरत्वे आणि आपल्या आहारविहारातल्या चुकांमुळे आतल्या स्तरावर चरबीजन्य अडथळा तयार होऊन रक्तवाहिनी चिंचोळी होण्याचा धोका संभवतो. हृदयाच्या सूक्ष्म धमन्यांमध्ये निर्माण होणारा अडथळा (ब्लॉकेज) व त्यामुळे हृदयाला शुद्ध रक्ताच्या पुरवठ्यामध्ये होणारी कमी ही आधुनिक मानवाला ग्रासणारी एक प्राणघातक विकृती आहे, ही आता समाजासाठी नवीन गोष्ट नाही. मात्र शुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये तयार होणारा हा अडथळा लहान मुलांमध्ये सुद्धा संभवतो, हे काही तुम्हाला मान्य होणार नाही.

अमेरिकेमध्ये झालेल्या संशोधनामध्ये लहान (वयवर्षे १० ते १५) वयाच्या वजनदार-स्थूल शरीराच्या मुलांवर एक संशोधन करण्यात आले. या संशोधनामध्ये या लहान मुलांच्या शुद्ध रक्तवाहिन्यांच्या आतल्या स्तरावर चरबीजन्य थर जमून त्यांच्या रक्तवाहिन्या चिंचोळ्या होत आहेत का? यावर संशॊधन करण्यात आले. संशोधनाचे निकाल धक्कादायक आले. खरोखरच त्या मुलांच्या शुद्ध रक्तवाहिन्या आतून चरबीचे थर जमल्यामुळे चिंचोळ्या होऊ लागल्या होत्या. ज्यामागे कारणे होती अयोग्य आहार व व्यायामाचा अभाव. त्यानंतर तिथल्या शासनाने त्वरित पावले उचलून मुलांच्या आहाराबद्दल मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली व त्याची काटेकोर अंमलबजावणी होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू केले.

आज २१व्या शतकाच्या दुसर्‍या दशकामध्ये प्रवेश केलेल्या भारतामधील; विशेषतः शहरांमधील मुलामुलींना;तुम्ही पाहाल तर वजनदार-स्थूल-चरबीयुक्त शरीराची मुले-मुली आधिक्याने अवतीभवती दिसतील. शहरी मुलांचे अनुकरण करणार्‍या निमशहरी नगरांमध्ये आणि तालुकापातळीवरील गावांमध्येही वयाने लहान असणार्‍या मुलामुलींमध्ये स्थूलत्वाचे प्रमाण वाढत चालले आहे. साहजिकच आता स्थूलत्व हा प्रश्न शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यात या एक-दोन दशकांमध्ये तर असे निरिक्षण आहे की समाजामधील निम्न स्तरामध्ये स्थौल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या सर्व मुलामुलींच्या शरीरामधील शुद्ध रक्तवाहिन्या आतून चरबीचा स्तर वाढल्याने चिंचोळ्या होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात ही मुले व्यायाम-खेळापासून दूर असतील तर पुढे जा‌ऊन हार्ट अटॅकला बळी पडण्याची दाट शकयता आहे. पुढे जा‌ऊन म्हणजे त्यांच्या चाळीशीनंतर नव्हे, तर विशी-तिशीमध्येच त्यांना हृदयविकाराचा धोका संभवतो.

वाचकहो, शासन यावर काही कार्यवाही करेल याची वाट न बघता आपणच पावले उचलली पाहिजेत. तुमच्या मुलांच्या आहारावर नियंत्रण ठेवा. विशेषतः चरबीयुक्त, तळलेले पदार्थ, गोडधोड पदार्थ, साखर-मैदा(बेकरीचे पदार्थ), रिफाईन्ड अन्नपदार्थ आणि महत्त्वाचे म्हणजे जंक फूडचे सेवन त्यांच्याकडून होणार नाही, झालेच तरी मर्यादेमध्ये होईल याची काळजी घ्या. त्यांना परिश्रमाची, व्यायामाची, खेळण्याची आणि भाज्या-फळे खाण्याची सवय लावा. अन्यथा ते दिवस लांब नाहीत, जेव्हा इथे तरुण मुलामुलींची बायपास-ॲन्जि‌ओप्लास्टी नित्यनेमाने हो‌ऊ लागेल.