अल्झायमर अर्थात स्मृतिभ्रंश हा २१व्या शतकामध्ये वार्धक्यामध्ये संभवणारा एक घातक आजार. वाढत जाणारे वय हा या व्याधीमधला एक महत्त्वाचा कारणीभूत घटक असला आणि हा आजार ६५ व्या वयानंतर संभवत असला तरी स्मृतिभ्रंशाच्या एकूण रुग्णांपैकी साधारण ५ % रुग्ण हे चाळीशी-पन्नाशीतले असतात. या रोगामध्ये व्यक्तीच्या स्मृतीवर विपरित परिणाम होऊन हळूहळू पूर्ण स्मृतिभ्रंश होतो. या आजाराची नेमकी कारणे कोणती याबद्दल शास्त्रज्ञांचे संशोधन सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र शास्त्रज्ञांच्या हे लक्षात आले आहे की ‘अयोग्य जीवनशैली’ हे या आजारामागील एक महत्त्वाचे कारण आहे. एकंदरच औद्योगिकीकरणानंतर भांडवलशाहीवर आधारलेली जी शहरी-वेगवान जीवनशैली उदयाला आली, ती जीवनशैलीच या अल्झायमरसारख्या भयंकर आजारांना कारणीभूत आहे, असे दिसते. कारण ग्रामीण जीवनशैलीमध्ये स्मृतिभ्रंशाचे रुग्ण नव्हते वा असले तरी त्याचे प्रमाण फार नगण्य होते. शहरी जीवनशैलीमध्ये मात्र माणसाचे मन, त्याचे विचार-भावना यांना फारसा थारा नसतो. जीवनामध्ये द्वेष, मत्सर, ईर्ष्या, असूया, स्पर्धा, एकान्तिक प्रगती व भौतिक सुखांनाच फक्त महत्त्व असते. भौतिक सुखांच्या प्राप्तीमध्ये मनुष्य ‘सर्व काही मिळाले तरीही अतृप्त’ असा असतो. याचे कारणच मुळी जी कामे आपण करत असतो त्यांनी आपल्याला मानसिक सुख मिळत नाही, हे असते. हा मनःशांतिचा अभाव शहरी माणुस अनुभवत असला तरी तो त्याकडे दुर्लक्ष करत राहातो. मात्र त्या मानसिक उद्वेगाचा शरीरावर (स्मृतिभ्रंशाबाबत विशेषतः मस्तिष्कावर) परिणाम होतोच होतो. आपण जेव्हा म्हणतो की अशी-अशी घटना घडली, असा-असा प्रसंग पाहिला तेव्हा माझा जीव तुटला, तेव्हा त्या दुःखदायक कारणामुळे तुमचा केवळ शाब्दिक जीव तुटत नसतो, तर प्रत्यक्षात मस्तिष्कामधील सूक्ष्म रचनेवर त्या दुःखद घटनेचा विपरित परिणाम होत असतो. आधुनिक धावत्या जगात कळत नकळत तुम्हाला जीव तुटणार्‍या अशा अनेक प्रसंगांना-घटनांना तोंड द्यावे लागत असते. वास्तवात एकमेकांशी स्पर्धा करण्याच्या नादात भौतिक सुखांच्या मागे धावता-धावता माणूस स्वतःच या क्लेशदायक घटना आणि प्रसंगांना आमंत्रण देतो. आयुष्यात सातत्याने असेच दुःखदायक घटनांना व क्लेशदायक प्रसंगांना तोंड द्यावे लागले तर ते अल्झायमरला आमंत्रण देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाचकहो, खोट्या सुखांच्या मागे न धावता जे काम केल्यावर मनाला शांति मिळेल, आत्मिक समाधान मिळेल असे उद्दिष्ट ठेवा आणि असे काम सफल करण्यासाठी प्रयत्न करा. अन्यथा फसव्या जगातल्या खोट्या स्पर्धेमध्ये धावत सुटाल तर काय होईल, ते वेगळे सांगायला नको.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips in marathi to know about signs of alzheimers disease symptoms