अमेरिका, ब्रिटनसारखे विकसित देश मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर अशा जीवनशैलीजन्य आजारांचा सामना करत आहेत, तर सोमालिया -टान्झानिया यांसारखे अविकसित देश संसर्गजन्य क्षय(टीबी), एड्स, मलेरिया अशा आजारांशी लढत आहेत. मात्र आपला भारत हा जगातला एक असा देश आहे, जो संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य अशा आजारांच्या दुहेरी कचाट्यात सापडला आहे.

दुर्दैवाने आपल्या समाजाची विभागणी जी ‘इंडीया व भारत’ अशी झाली आहे, समाजामध्ये आर्थिक विषमतेमुळे जे दोन सर्वस्वी भिन्न असे स्तर तयार झाले आहेत, त्या भिन्न-भिन्न समाजाला ग्रस्त करणार्‍या आजारांमध्येसुद्धा विषमता आहे. ‘इंडिया’मध्ये राहाणार्‍या भारतीयांना बाहुल्याने असंसर्गजन्य (जीवनशैलीजन्य) आजार होतात, तर भारतामध्ये राहाणार्‍यांना आधिक्याने संसर्गजन्य आजार होतात. अर्थात इथे बाहुल्याने व आधिक्याने हे शब्द महत्त्वाचे आहेत. कारण आरोग्यासंबंधित सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणार्‍या उच्च स्तरामधील लोकांनासुद्धा टीबी, मलेरिया वा एड्ससारखे आजार होतात. दुसरीकडे जीवनशैलीजन्य आजारांबाबत तर चित्र असे आहे की समाजाच्या सर्वात वरच्या स्तरामधील लोकंनी आपल्या आहारामध्ये, जीवनशैलीमध्ये बदल करुन या आजारांपासून हळुहळू दूर जाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यापुढे मध्यम वर्गामधील आणि निम्न स्तरामधील लोकांनाच मधुमेह, हृदयरोग यांसारखे लोक त्रस्त करतील, नव्हे तशी सुरुवातच झाली आहे. ज्यामुळे भारतामधील संसर्गजन्य व इतर आजारांमुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण १५ टक्क्यांनी कमी झालेले असताना जीवनशैलीजन्य आजारांमुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतामधील एकूण मृत्यूपैकी ५३ % मृत्यू हे जीर्ण आजारांमुळे होतात, जे प्रामुख्याने जीवनशैलीजन्य आजार आहेत.

या जीवनशैलीजन्य जीर्ण आजारांमुळे देशाचे अतोनात आर्थिक नुकसान होते, जे टाळणे शक्य आहे. नेमक्या आकड्यांमध्ये सांगायचे तर २००५ ते २०१५ या दहा वर्षांमध्ये जीवनशैलीजन्य जीर्ण आजारांमुळे होणार्‍या मृत्युंमध्ये केवळ दोन टक्क्यांची जरी घट झाली असती तरी देशाचे १५०० करोड रुपये वाचले असते. मात्र आजारांना प्रतिबंध करणे तर सोडा, ऊलटपक्षी मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांचे प्रमाण भयावहरित्या वाढत चालले आहे आणि पुढे अजूनच वाढणार आहे. जोवर समाज आपल्याकडून होणार्‍या आहारविहारातल्या चुका सुधारणार नाही, तोवर या आजारांना चाप लावता येणार नाही.

Story img Loader