थंडीनंतर उष्णतेचे दिवस सुरु झाले की लगेच लोकांना दही खाण्याचे वेध लागतात. गरमीचे दिवस सुरु झाले आहेत, म्हणून पोटाला थंडावा मिळण्यासाठी लोक दही खायला सुरवात करतात. स्पर्शाला थंड असणारे दही शरीरात गेल्यानंतर मात्र उष्णता वाढवते. “दधिः उष्णः” असा स्पष्ट संकेत आयुर्वेदाने दिलेला आहे.

संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या ऋतुमध्ये दही अगदी निषिद्ध समजले पाहिजे, असा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे थंडीनंतर येणारा उन्हाळा, सध्या सुरु असलेले दिवस. वसंत ऋतुमधील कफप्रकोपाचा विचार करता पाळावयाचा नियम म्हणजे दही वर्ज्य करणे. शरीरामध्ये कफ वाढवणारे दही वसंत ऋतुमध्ये सेवन करण्याचा निषेध शास्त्राने केला हे स्वाभाविकच आहे. वसंत ऋतुमधील दह्याचे काही विशिष्ट गुणदोष असतात. ते दही गोड व आंबट चवीचे असते. गोड व आंबट हे दोन्ही रस वसंतामध्ये टाळणे अपेक्षित आहे. ते शरीरामध्ये स्निग्धत्व वाढवणारे असते. वसंत ऋतुमध्ये स्निग्धत्व वाढवणारा आहार टाळायचा असतो. याशिवाय वसंतातल्या दह्याचा अजून एक दोष म्हणजे ते वातल (वात वाढवणारे) असते .त्यामुळे वात प्रकृतीच्या व्यक्तींना, वातविकाराने त्रस्त लोकांना ते योग्य नाहीच.

याशिवाय दही हे अभिष्यन्दी आहे, म्हणजे स्त्राव वाढवणारे आहे, ज्या दोषामुळे शरीरामध्ये पाणी वाढते. वसंत ऋतुमध्ये आधीच कफ पातळ झाल्यामुळे शरीरामध्ये स्त्राव, पाणी वाढलेले असताना दह्याचा शास्त्राने निषेध केलेला आहे. दही हे सूज सुद्धा वाढवते, अर्थात अतिप्रमाणात व अवेळी सेवन केले तर. दह्याबाबत वसंत ऋतू ही अवेळ आहे. वसंतामध्ये कफाचा जोर असताना सांधे हे कफाचे स्थान असल्याने सांध्यामधल्या श्लेष्मल त्वचेला सूज येण्याची व त्या श्लेष्मल त्वचेमधून स्त्राव वाढण्याची शक्यता बळावते. म्हणूनच सूज व स्त्राव वाढवणार्‍या दह्याचा त्याग या दिवसांमध्ये करायचा आहे. अर्थात जिथे -जिथे स्त्राव स्त्रवतात, ते स्त्राव वाढवण्याचा,जिथे-जिथे सूज आहे तिथे सूज वाढवण्याचा धोका वसंतामध्ये दही खाल्ल्याने बळावतो.

या दिवसांमध्ये उन्हाळा सुरु झाला म्हणून दह्याचे सेवन सुरु केल्यानंतर विविध कफविकार, उष्णतेचे विविध रोग आणि सूजसंबंधित विकृती झाल्याचे रुग्णअनुभव दर वर्षी अनुभवायला मिळतात. उपचाराला दही न खाण्याची जोड दिली तरच हे आजार बरे होतात. केवळ औषधिउपचारानंतर आजाराची लक्षणे कमी होतात; पण तात्पुरती; दही खाणे थांबवल्यानंतर मात्र या रुग्णांना आराम मिळालेला दिसतो.