भारतामध्ये एक काळ होता जेव्हा स्वतः ची कार असणे ही दुरापास्त गोष्ट होती आणि एसी कार तर त्याहुनही दुर्मिळ. त्या दिवसांमध्ये क्वचितप्रसंगी एखाद्याला अतिश्रीमंत माणसाच्या एसी कारमध्ये बसण्याचा योग आलाच तर त्याला इंद्राच्या ऐरावतस्वारीसारखा आनंद व्हायचा. प्रिमिअर पद्मिनी आणि ॲम्बेसेडरच्या राज्यामध्ये तर कार घेणे हे सामान्य वर्गासाठी तर सोडाच ,पण मध्यमवर्गासाठी सुद्धा जिथे अप्राप्य स्वप्न होते, तिथे एसी कार घेण्याचा तर विचारही सामान्य जनांच्या मनात येणे कठीण!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९०च्या आसपास लहानशी मारुती कार आली आणि लोकांना एसी कारचा आनंद म्हणजे काय,ते माहीत झाले. लोक एसी कारमध्ये बसण्याची स्वप्ने तरी बघू लागले. मारुतीमागोमाग आली झेन आणि मग त्यानंतर एकामागून एक आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड्सच्या कार्सची रांगच लागली. सध्या परिस्थिती अशी आहे की उत्तम दर्जाच्या सेकंड हॅन्ड कार्स सहज आणि परवडणार्‍या किमतीमध्ये उपलब्ध आहेत. लहान आकाराच्या नवीन कार सुद्धा मध्यम वर्गियांच्या सहज आवाक्यात आल्या आहेत. (ते चालवण्यासाठी रस्ते तेवढेसे चांगले नाहीत, हा विषय वेगळा). आज घराघरातून लोकांकडे एसी कार आहेत. त्यामुळे लोक आता कारमधून गारेगार प्रवास करण्याचा आनंद लुटत आहेत. बाहेर उष्मा असतानाही आपल्या स्वतःच्या एसीकारमधून थंडाव्याचा आनंद घेत बाहेरच्या उन्हाळ्याला पाहाण्याचा आनंद काही औरच!अशा वेळी ” आम्ही भाग्यवान म्हणून आम्हांला हे सुख लाभले हो”असे वाटते लोकांना. पण कारचा हा एसी तुमचे आणि तुमच्या लाडक्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आणू शकतो, याची माहिती या नवकारमालकांना आहे का??

कारची सर्विसिंग न करणे, कारच्या एसीची सर्विसिंग न करणे, कारमध्ये व एसीमध्ये ओलसरपणा तयार होणे, (जो सहसा होतोच), कार ओलसर-दमट वातावरणामध्ये राहणे वगैरे कारणांमुळे कारमध्ये रोगजंतुंची वाढ होते. त्यामध्येही श्वसनविकारांना कारणीभूत अशा विशिष्ट प्रकारच्या बुरशीची वाढ एसीच्या यंत्रणेमध्ये होते. कारमध्ये खाली पसरलेल्या मॅटला आलेला ओलसरपणा सुद्धा बुरशीला जन्म देतो. कारमध्ये खाताना निष्काळजीपणे त्या अन्नाचा अंश कारमध्ये सांडल्याने त्यावर पोसल्या जाणार्‍या किटक, झुरळ आदींची वाढ कारमध्ये होते , जे रोगजंतुंचे वाहक होऊ शकतात. साहजिकच जेव्हा तुम्ही कारमध्ये बसून थंडगार एसीचा आनंद घेत असता, तेव्हा श्वसनामार्फत हे रोगजंतू तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात. कारमध्ये बसल्यावर किंवा थोड्या वेळाने तुम्हांला जर श्वास घेण्यास त्रास होणे, डोळे चुरचुरणे, डोकं जड होणे, शिंका, नाक खाजणे, घसा दुखणे, खोकला अशा तक्रारींचा त्रास होत असेल तर त्यामागे तुमच्या कारच्या एसीमधील व इतरत्र असलेले रोगजंतु हे कारण असू शकते. अनेकदा घरातल्या लहान मुलांच्या खोकल्या-दम्यामागे कारचा एसी हे कारण असते.

बरं, हा काही तर्क नाही .जगभरातील अनेक संशोधकांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे, की कारचा एसी हे श्वसनविकाराचे प्रमुख कारण आहे. त्यात तुम्ही-आम्ही स्वच्छतेचे किती भोक्ते आहोत, हे तर आपल्याला चांगलेच माहीत आहे. कार घेतल्यानंतर कारची नियमित स्वच्छता, एसीची सर्विसिंग आपण कशी करतो हे आपले आपल्यालाच माहित. तात्पर्य हेच की “कार घेतली” या आनंदात डुंबत न राहता कारच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips in marathi what are the disadvantage and cause of air conditioning ac car