ॲल्युमिनियमपासून तयार केलेल्या चंदेरी रंगाच्या वेष्टनांचा अन्नपदार्थ शिजवताना उपयोग करणे वा अन्नपदार्थ त्यामध्ये बांधून देणे हे दोन, तीन दशकांपूर्वी उच्चभ्रू-श्रीमंत वर्गामध्ये सर्रास होते. कारण ते पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानतात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मग उच्च मध्यम वर्ग, पुढे मध्यम आणि कनिष्ठ वर्गातले लोक सुद्धा आजकाल या ॲल्युमिनियम फॉईल्सचा नित्य उपयोग उपयोग करु लागले आहेत. कोण आनंद होतो, घरातल्या स्त्रियांना, त्या आपल्या नवर्‍याला वा मुलामुलीला त्यांच्या डब्यातले जेवण गरम राहावे म्हणून ॲल्युमिनियमच्या चकचकीत-चंदेरी वेष्टनामध्ये बांधून देतात तेव्हा. मात्र याचा आरोग्याला धोका संभवतो, याची यांना कल्पना असते काय?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ॲल्युमिनियमच्या संपर्कात येणार्‍यांना कॅन्सर, दमा, हाडांवर विपरित परिणाम होऊन हाडे कमजोर होणे व चेताकोषांवर विपरित परिणाम होऊन स्मृतिभ्रंशाचा धोका, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड, या विकृती संभवतात. मेंदुमधील चेताकोषांमध्ये ॲल्युमिनियमचे सूक्ष्म कण अडकल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे, ज्याचा संबंध स्मृतिभ्रंशाशी( अल्झायमर्सशी) असण्याची शक्यता आहे. एकंदरच मेंदुमधील चेताकोषांच्या वाढीमध्ये व कार्यामध्ये ॲल्युमिनियमच्या कणांमुळे अडथळा येण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करतात. याशिवाय हाडांना सुदृढ ठेवणार्‍या कॅल्शियमच्या कणांना हाडांपर्यंत पोहोचण्यात ॲल्युमिनियमचे कण अडथळा आणतात, ज्यामुळे एकीकडे रक्तामध्ये नको तितके कॅल्शियम आणि हाडांमध्ये मात्र कॅल्शियमची कमी, परिणामी हाडे कमजोर अशी विचित्र परिस्थिती ओढवते.

या सर्व संशोधनाला विरोध करणारे शास्त्रज्ञ सुद्धा आहेत, ज्यांच्या मते ‘अल्प मात्रेमध्ये शरीरात जाणारे ॲल्युमिनियम बाहेर फेकणे शरीराला शक्य आहे व अत्याधिक मात्रेमध्येच वरील धोके संभवतात’. त्यामुळे आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो.
हे तर नक्की आहे की ॲल्युमिनियम फॉईल्स कधीकाळी महाग होत्या आणि आता स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत. सहज उपलब्धी आणि स्वच्छतेसाठी अनुकूल या निकषावर समाजाला ॲल्युमिनियम फॉईल्स उपयुक्त वाटत असले तरी पाश्चात्त्यांच्या या गोष्टी स्वस्त आणि मुबलक उपलब्ध झाल्या की मनात शंका उभी राहते. महत्त्वाचं म्हणजे त्याविषयी प्रतिकूल मत व्यक्त करणार्‍या संशोधकांच्या मतांकडेसुद्धा दुर्लक्ष करता येत नाही. अशा वेळी तारतम्याने नेमकी काय काळजी घ्यायची ते बघू.

* अधिक तापमानामध्ये ॲल्युमिनियम अन्नामध्ये झिरपण्याचा धोका अधिक.
* गरम अन्नपदार्थ ॲल्युमिनियम फॉईलमध्ये बांधून देणे सुद्धा कटाक्षाने टाळावे.
* मसाले, सॉस, टॉमेटॉ केचप, आंबट फळांचे रस, आंबट फळे, वा आंबट पदार्थ शिजवताना तर ॲल्युमिनियम फॉईल मुळीच वापरु नये, असे संशॊधक सांगतात. आपले जेवण तर मसाल्याशिवाय तयार होत नाही.
* रस्सायुक्त भाज्या, कालवण, सांबार, तळलेले पदार्थ, लोणचं, पापड तसेच अन्य तेलतूपयुक्त अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी यांचा वापर करु नये.
* अम्लीय( ॲसिडीक) पदार्थ ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून देण्याची चूक कधीही करु नये.
* बिर्याणी वगैरे तयार करताना ॲल्युमिनियम फॉईलचे आवरण त्यावर बांधणे धोक्याचे होऊ शकते.
* मायक्रोवेव्ह, ओव्हनमध्ये अन्नपदार्थ तयार करताना त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल्सचा उपयोग करु नये. त्यासाठी अधिक जाडीच्या वेगळ्या शीट्स वापरण्याचा सल्ला दिला जातो, तरीही अधिक तापमानामध्ये ॲल्युमिनियम झिरपण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
* सॅन्डविचसारखे गार पदार्थ गुंडाळायला हरकत नाही असे म्हणतात, पण विषाची परिक्षा घ्यायचीच कशाला?

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips in marathi what are the disadvantages of aluminum foil health risk