घाम येणे ही तशी नैसर्गिक क्रिया असली तरी काही जणांना इतका घाम येतो की ते घामाने अगदी थबथबून जातात. घामाने थबथबणे ही विकृती आहे का? नाही ती विकृती असेलच असे नाही. वास्तवात शरीराला घाम येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ज्याचा मुख्य हेतू शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवणे, हा आहे. शरीरामधील चेतनेच्या विद्युतवहनाद्वारे वा शरीराचे तापमान खूप वाढल्यामुळे मस्तिष्कामधील हायपोथलॅमसच्या पुढील भागाचे उद्दिपन होते, तेव्हा त्याच्याकडून स्वेदग्रंथींना घाम निर्माण करण्याचा आदेश मिळतो. थोडक्यात जेव्हा जेव्हा शरीराचे अंतर्गत तापमान वाढते, तेव्हा तेव्हा त्वचेखालील स्वेदग्रंथींकडून अधिक प्रमाणात घाम स्त्रवला जातो. त्वचेवरील या घामाचे बाष्पीभवन होण्यासाठी शरीरामधील उष्णता वापरली जाते आणि शरीरान्तर्गत थंडावा तयार होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अति उष्णतेबरोबरच मानसिक उद्दिपनामुळे सुद्धा स्वेदग्रंथी उद्दिपित होतात. जेव्हा केव्हा तुम्ही खूप घाबरता तेव्हा आणि कामभावनांमुळे सुद्धा याचप्रकारे शरीर गरम होऊन स्वेदग्रंथी उद्दिपित होतात. त्याचप्रमाणे शरीराच्या मांसपेशींच्या आकुंचन-प्रसरणामुळे (अर्थात शरीराला होणार्‍या व्यायामामुळे) सुद्धा स्वेदग्रंथी अधिक प्रमाणात घाम निर्माण करतात, जो शरीरामध्ये तयार झालेली अधिकची उष्णता बाहेर फेकण्याचा प्रयत्न असतो. एकंदर काय तर घाम येणे ही शरीराला आवश्यक अशी क्रिया आहे.

परंतू सभोवतालची परिस्थिती सर्वांसाठी सारखीच असतानाही तुम्हाला इतरांपेक्षा खूप घाम येत असेल, तर त्याचा विचार करायला हवा. समजा तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर मजेत चित्रपट बघत आहात. सभोवतालचे तापमान सौम्य आहे आणि तुम्ही स्वतःसुद्धा अगदी शांतपणे समोरच्या चित्रपटाचा आनंद घेत आहात. अशावेळी कुटुंबातल्या इतर कोणालाच घाम येत नाही आणि तुम्हाला एकट्यालाच तेवढा खूप घाम येत असेल, तर नक्की काहीतरी गडबड आहे, अशी शंका घेता येते. जे आजार अति घाम येण्यास कारणीभूत होतात, ते म्हणजे थायरॉईड ग्रंथीची अकार्यक्षमता, मधुमेह, जंतुसंसर्ग आणि सर्वात महत्त्वाचे व आधिक्याने लागू होणारे कारण म्हणजे चरबीयुक्त-वजनदार शरीर. जाडजूड चरबीयुक्त शरीराच्या लोकांना अधिक प्रमाणात घाम येतो, हे तर सर्वज्ञात आहे. आयुर्वेदानुसार पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना इतरांपेक्षा अधिक प्रमाणात घाम येतो. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना मुळातच उष्णता जास्त असते, त्यामुळे इतरांच्या तिलनेमध्ये त्यांना अधिक घाम येतो. शरीरामधील अधिकची उष्णता शरीराबाहेर फेकण्याचा शरीराचा तो प्रयत्न असतो.

अन्यथा आरोग्य सुस्थितीमध्ये असलेल्या प्रत्येकाला घाम कधी व किती प्रमाणात येईल, याचे निश्चित उत्तर देता येणार नाही. ज्याप्रमाणे मलमूत्राचे प्रमाण किती असणे, विसर्जन कितीवेळा होणे हे व्यक्तीव्यक्तीनुसार बदलते. त्याचप्रमाणे घाम येणे व त्याचे प्रमाण हे सुद्धा माणसामाणसानुसार बदलते. उन्हामध्ये फिरल्यानंतर, व्यायाम केल्यावर , खूप चिडल्यामुळे किंवा कामोद्दिपित झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीला दुसर्‍या व्यक्तीपेक्षा अधिक प्रमाणात घाम येत असेल तर तो काही आजार समजला जात नाही. त्याच्या स्वेदग्रंथी अधिक प्रमाणात उद्दिपित होतात व अधिक घाम बाहेर फेकतात इतकेच म्हणता येईल. त्यामुळे त्याचा खरं तर फार बाऊ करु नये. ती आपल्या शरीराची एक नैसर्गिक घटना म्हणून स्वीकारावी.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips in marathi what is cause of excessive sweating