हळुहळु सगळीकडे थंडीचे प्रमाण वाढत आहे. जसजसे हवामान बदलते त्याप्रमाणे हिवाळ्यात होणाऱ्या आजारांची शक्यता वाढते. हिवाळ्यात धुक्याचे प्रमाण वाढते त्यामुळे प्रदूषणात आणखी भर पडते. अशात श्वसनाचा त्रास असणाऱ्यांची समस्या आणखी वाढू शकते. दम्याचा त्रास असणाऱ्यांना तर या दिवसांमध्ये घराबाहेर पडणे कठीण होते. श्वसनाचा त्रास नसऱ्यांना देखील या वातावरणामध्ये हा त्रास होऊ शकतो, त्यामुळे सर्वांनीच या दिवसांमध्ये तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. सर्दी, खोकला, ताप अशा आजरांमुळेही अनेकजण त्रस्त असतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी काही पदार्थ मदत करू शकतात. कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.
गूळ
हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे अनेकदा रक्ताभिसरणाचा वेग मंदावतो. यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. गुळात आढळणारे लोह रक्ताभिसरणाची गती वाढवते आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच गूळ छाती जड होण्याच्या समस्येपासून, सतत पोटात गॅस होत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी गूळ फायदेशीर ठरतो.
आवळा
आवळ्यामध्ये ‘विटामिन सी’ सारखे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आढळतात, ज्यामुळे हिवाळ्यात होणाऱ्या इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी मदत मिळते.
सुका मेवा
काजू, बदाम, अक्रोड अशा सुक्या मेव्यामध्ये निरोगी राहण्यासाठी मदत करणारे आवश्यक पोषकतत्व आढळतात. बदामामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन इ, अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आढळते तर अक्रोडमध्ये ‘ओमेगा 3’ आढळते. याच्या सेवनामुळे शरीरासाठी अयोग्य असणारा कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण ठेवण्यासही मदत मिळते. तसेच नियमित सुका मेवा खाल्ल्याने शरीरात उष्णता टिकून राहते.
कंदमुळं असणाऱ्या भाज्या
गाजर, रताळे, बीट, बटाटे यांसारख्या कंदमुळं असणाऱ्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यामुळे हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)