Avoid These Food with Tea: भारतीयांचं आवडतं पेय म्हणजे चहा. चहा प्यायला सर्वांनाच आवडतो. अनेकदा आपण चहा दिवसातून सहा वेळा तरी पितोच. आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. दिवसभर सतत चहा पित राहणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला असतात. भारतात या पेयावर कोट्यवधी लोकांचे प्रेम आहे. आपल्या देशात पाण्यानंतर हे सर्वांत जास्त प्यायले जाणारे पेय आहे. दिवसाची सुरुवात चहाने केली तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असाही काहींचा समज असतो; पण तंदुरुस्त राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा चहा आपण नुसता पित नाही तर त्यासोबत काही पदार्थही खातो. परंतु, काही पदार्थ हे चहासोबत खाणे अत्यंत हानिकारक असते. चहासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये हे आपल्याला जाणून घेणे फारच महत्त्वाचे आहे. @balancedbitesbygauri च्या संस्थापक आहारतज्ज्ञ गौरी आनंद यांनी याविषयी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे, त्याबाबत जाणून घेऊ या…
चहा पिताना ‘हे’ पदार्थ चुकूनही खाऊ नका!
लिंबूवर्गीय फळे
चहामध्ये लिंबाचा तुकडा घालणे फायदेशीर ठरू शकते, परंतु चहाबरोबर मोठ्या प्रमाणात लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने पचन समस्या उद्भवू शकतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये जास्त प्रमाणात आम्लता असल्याने चहातील टॅनिनसोबत मिसळल्यास छातीत जळजळ किंवा अपचन होऊ शकते. पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो.
लोहयुक्त पदार्थ
चहा पिताना हिरव्या पालेभाज्या, मसूर, धान्ये यांसारखे लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला या पदार्थांमधून लोह शोषण्यापासून रोखतात.
मसालेदार पदार्थ
चहासह मसालेदार पदार्थ खाणं टाळावं. चहासोबत मसालेदार पदार्थ मिसळल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अस्वस्थता वाढू शकते. चहामधील टॅनिन पोटाच्या अस्तरांना त्रास देऊ शकतात आणि मसालेदार पदार्थांमध्ये कॅप्सेसिनसोबत मिसळल्यास पोटातील आम्लता, अपचन आणि छातीत जळजळ वाढू शकते. लसूण, कांदा, कढीपत्ता आणि मिरची यांचा वापर करून तयार करण्यात आलेले पदार्थ चहासोबत खाणे टाळा.
तळलेले पदार्थ
चहासोबत तळलेले पदार्थ खाणं टाळावं. हे पदार्थ पचायला जड असतात. हे खाल्ल्याने तुम्हाला सुस्तपणा जाणवू शकतो. चहाचे सेवन केल्यानं पचन क्रिया चांगल्या पद्धतीनं होते, परंतु त्याच्यासोबत तळलेले पदार्थांचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते.
प्रक्रिया केलेल्या साखरेचे पदार्थ
प्रक्रिया केलेल्या पदार्थांमुळे किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांमुळे ग्लायसेमिक भार वाढतो, परिणामी रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होऊ शकते. चहामध्येसुद्धा साखर असते, अशावेळी चहा आणि वर स्नॅक्समधील साखर असे प्रमाण जास्त झाल्यास मेटाबॉलिक सिंड्रोम आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो.
थंड पदार्थ
गरम चहाबरोबर थंड पदार्थ अजिबातच खाऊ नयेत, कारण विरोधाभासी तापमान पचनक्रियेत व्यत्यय आणू शकते. एकाच वेळी वेगवेगळ्या तापमानाचे अन्न खाल्ल्याने तुमची पचनक्रिया विस्कळीत होऊ शकते आणि मळमळ होऊ शकते.