अंडी केवळ खायलाच रुचकर नसतात; तर शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटकही त्यामधून आपणाला मिळतात. अंडी ही भारतातील अनेक घरांतील प्रमुख अन्न बनले असून, नाश्त्यासह जेवणातही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु, आजकाल अनेक लोक जीवनशैलीची निवड म्हणून शाकाहारी होणे पसंत करीत आहेत. त्यामध्ये अंड्यांसह कोणत्याही प्रकारचे मांस किंवा दुग्धजन्य पदार्थ खायचे नाही, असा निर्णय ते घेतात. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारातून अंडी पूर्णपणे वगळल्यास शरीराचे काय होऊ शकते? हे जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही महिनाभर अंडी न खाल्ल्याने तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होईल? हे आज आपण तज्ज्ञांकडून समजून घेणार आहोत.
“आहारातून अंडी काढून टाकल्याने शरीरावर त्याचा उल्लेखनीय परिणाम होऊ शकतो. सर्वप्रथम लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे यामुळे पोषक तत्त्वांची कमतरता भासू शकते. कारण- अंडी ही प्रथिने, अत्यावश्यक ॲमिनो ॲसिड, जीवनसत्त्वे, खनिजे (सेलेनियम व फॉस्फरस) यांचा समृद्ध स्रोत आहेत. ती स्नायूंची देखभाल, आकलनशक्ती, स्मरणशक्ती व रोगप्रतिकार शक्ती यांच्यावर परिणाम करतात. अंडी त्यांच्यामधील प्रथिनांमुळे परिपूर्णतेची भावना निर्माण करतात. त्या भावनेचा अनुभव वा आनंद त्यांना मिळू शकत नाही. साहजिकच त्यामुळे स्नॅकिंग किंवा सतत खाण्याच्या प्रमाणात वाढ होते; ज्याचा कोलेस्टेरॉलच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो, कारण- अंड्यांमध्ये आहारातील कोलेस्ट्रॉल असते, अशी माहिती हैदराबादमधील कामिनेनी हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ, लक्ष्मी यांनी, ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली.
हेही वाचा- तुम्ही स्वत:ला गुदगुदल्या का करू शकत नाही? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर
तर मुंबईतील भाटिया हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार व फिजिशियन डॉ. रितेश शाह म्हणाले, “जर तुम्ही अंडी खात नसाल तरीही तुम्ही मांस, मासे, बीन्स, मसूर, टोफू व सुका मेवा यांसारख्या इतर स्रोतांमधूनही प्रथिने मिळवू शकता. संतुलित आणि निरोगी आहार राखण्यासाठी तुम्हाला हे पोषक तत्त्व इतर स्रोतांकडून मिळत असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ- व्हिटॅमिन डी फोर्टिफाइड दूध आणि सॅल्मन यांसारख्या फॅटी माशांमध्ये आढळते. व्हिटॅमिन बी-१२ हे मांस, मासे व दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते. लोह हे मांस, पोल्ट्री, फिश, बीन्स व फोर्टिफाइड तृणधान्यांमध्ये आढळते.”
हेही वाचा- खोकल्यावर कफ सिरप घेताना फक्त एक्सपायरी डेट नव्हे तर ‘या’ गोष्टी तपासा; DCGI चा सावधानतेचा इशारा
आहारात अंड्यांचा समावेश करण्याचे फायदे खालीलप्रमाणे :
अंडी पोषक तत्त्वांचा उत्कृष्ट स्रोत-
अंडी पृथ्वीवरील सर्वांत पौष्टिक अन्नांपैकी ती एक आहेत. अंड्यांमध्ये आपल्याला आवश्यक असलेल्या जवळजवळ प्रत्येक पोषक तत्त्वाचा काही प्रमाणात समावेश असतो. त्यात फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, बी, डी व ईसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
प्रथिने –
एक मोठे अंडे सहा ग्रॅम प्रथिने देते आणि ती उच्च गुणवत्तेची प्रथिने मानली जातात. कारण- त्यामध्ये तुमच्या शरीराला दररोज आवश्यक असलेली सर्व ॲमिनो ॲसिडस् असतात.
डोळ्यांसाठी उपयुक्त –
अंड्यांमधील ल्युटिन व झेक्सॅन्थिन ही अँटिऑक्सिडंट्स मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजनरेशनचा धोका कमी करण्यास मदत करतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम –
अंडी खाल्ल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. कारण- त्यात ओमेगा ३ हे फॅटी ॲसिड असते; जे हृदयासाठी फायदेशीर असते.
वजन कमी करण्यात मदत –
अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. परिणामी भूक कमी लागते आणि एकूणच कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
लक्ष्मी यांनी नमूद केले की, महिनाभर अंडी न खाण्याचा निर्णय वैयक्तिक परिस्थिती आणि आहाराच्या गरजांवर आधारित असावा. “बहुतेक लोकांसाठी अंडी ही संतुलित आहाराचा एक भाग आहेत. परंतु काही परिस्थितींमुळे अंडी तात्पुरत्या स्वरूपात आहारातून काढून टाकणे उचित ठरते. शाकाहारी आहारात अंडी वगळली जातात. अशा वेळी पर्यायी पोषक स्रोतांची आवश्यकता असते. तसेच धार्मिक कारणामुळेही काही व्यक्ती अंडी खाणे टाळू शकतात. अशा वेळी शरीराच्या पौष्टिकतेसंबंधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहाराचे काळजीपूर्वक
नियोजन करणे आवश्यक आहे.
जर तुम्ही तुमच्या आहारातून अंडी काढून टाकण्याचा विचार करीत असाल, तर डॉ. शाह यांनी काही पर्याय सुचवले आहेत ते पुढीलप्रमाणे :
- मसूर : मसूर हे प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. मसूर शिजवलेल्या प्रत्येक कपमध्ये सुमारे १८ ग्रॅम प्रथिने असतात.
- चणे : प्रथिने व फायबर यांचा समृद्ध स्रोत म्हणजे चणे. चणे शिजवलेल्या प्रत्येक कपमध्ये सुमारे १५ ग्रॅम प्रथिने असतात.
- टोफू : हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे आणि त्यात सर्व नऊ अत्यावश्यक ॲमिनो ॲसिड्स असतात.
- क्विनोआ : हे एक संपूर्ण प्रथिन आहे. म्हणजे त्यात सर्व नऊ अत्यावश्यक ॲमिनो ॲसिड्स असतात. क्विनोआ शिजवलेल्या प्रत्येक कपमध्ये सुमारे आठ ग्रॅम प्रथिने असतात. तसेच उच्च प्रथिने असलेले शाकाहारी पदार्थ जसे की, बीन्स, नट, बिया आणि संपूर्ण धान्याचा समावेश करा. डॉ. रितेश शाह पुढे म्हणाले की, तुमच्या वैयक्तिक आहाराशी संबंधित निर्णय घेताना आहार तज्ज्ञांकडूनही सल्ला घेऊ शकता.