अनेक लोकांच्या आहारात दुधाला महत्त्वाचे स्थान आहे. विशेषत: भारतीय संस्कृतीत दूध विविध पदार्थांमध्ये प्रमुख भूमिका बजावते. त्याच्या अष्टपैलुत्वामुळे ते अनेक पाककृतींमध्ये वापरले जाते. दूध जसं शरीरासाठी चांगलं आहे, तसेच ते जास्त प्रमाणात प्यायल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे दुधाचे सेवन करताना काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी तुमच्या आहारातून दूध पूर्णपणे काढून टाकायचे का? आणि जर तुम्ही सुरुवातीला महिनाभर दूध घेणं टाळलं, तर तुमच्या शरीरात काय बदल होऊ शकतात? याबाबतची माहिती डॉ. संदीप भटनागर, डायरेक्टर ऑफ इंटरनल मेडिसिन, पारस हेल्थ, उदयपूर यांच्याकडून जाणून घेऊया.
डॉ. संदीप भटनागर यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही एका महिन्यासाठी दूध घेणं बंद केलं तर तुमच्या शरीरात अनेक बदल होऊ शकतात. ते म्हणाले, “सुरुवातीला सूज आणि गॅस कमी होऊ शकतो, कारण काही लोक लॅक्टोज असहिष्णू असतात. कॅल्शियमचे सेवन कमी होऊ शकते, ज्यामुळे हाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दुग्धजन्य संवेदनशीलतेशी संबंधित त्वचेची स्थिती सुधारू शकते.”
डॉ. भटनागर म्हणाले, “दूध हे प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांचा स्रोत असल्याने पोषक आहारात बदल करणे आवश्यक आहे. एकंदरीतच प्रत्येकाच्या शरीरातील प्रतिसाद भिन्न असतात, त्यामुळे आहारात महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.” तर पोषणतज्ज्ञ नुपूर पाटील यांनी सांगितले की, जर तुम्ही नियमितपणे दूध घेत असाल, तर तुम्हाला तुमच्या कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या सेवनात घट दिसून येईल; कारण हे पोषक तत्व सामान्यतः दुधात आढळतात.
हेही वाचा- Blood pressure: हाय बीपीच्या लोकांनी रोज सकाळी फक्त ‘हा’ एक प्राणायाम करा, औषधाची गरज होईल कमी
पण, दूध पूर्णपणे सोडून देण्याचा सल्ला दिला आहे का?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एका महिन्यासाठी पूर्णपणे दूध सोडण्याची शिफारस केली जाते की नाही हे तुमच्या वैयक्तिक आरोग्याच्या गरजा, आहारातील प्राधान्ये आणि विद्यमान आरोग्य परिस्थितीवर अवलंबून असते. “तुम्ही लॅक्टोज असहिष्णू असल्यास, दूध टाळल्याने पचनाचा त्रास कमी होऊ शकतो. जे लोक नैतिक, पर्यावरणीय किंवा आरोग्याच्या कारणास्तव दुग्धमुक्त आहार शोधत आहेत ते या पर्यायांचा विचार करू शकतात. परंतु, जर दूध हा प्रथिने आणि कॅल्शियमचा एक महत्त्वाचा स्रोत असेल, तर पर्यायी किंवा पूरक आहाराद्वारे संतुलित पोषण सुनिश्चित करा. आहारात मोठे बदल करण्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा, असंही डॉ. भटनागर म्हणाले.
जर तुम्ही दूध सोडण्याचा किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर कमी करण्याचा निर्णय घेतला, तर अनेक आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत, जे नुपूर पाटील यांनी सुचवले आहेत.
वनस्पती आधारित दूध : बदाम दूध, सोया दूध, ओट दूध, नारळाचे दूध किंवा तांदूळ दूध यांसारखे वनस्पती आधारित दूध पर्याय निवडा. हे पर्याय अनेकदा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात.
पालेभाज्या : तुमच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. जसे की पालक, कोलार्ड हिरव्या भाज्या, ब्रोकोली आणि फोर्टिफाइड पदार्थ.
नट आणि बिया : नाश्त्यामध्ये बदाम, चिया बिया आणि तीळ यांसारखे नट आणि बिया खा, जे कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत.
मासे : सॅल्मन आणि सार्डिनसारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध असतातच, शिवाय ते व्हिटॅमिन डीदेखील चांगल्या प्रमाणात देतात.
फोर्टिफाइड फूड्स : कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीने मजबूत असलेले खाद्यपदार्थ, जसे की फोर्टिफाइड संत्र्याचा रस, फोर्टिफाइड वनस्पती आधारित दूध आणि फोर्टिफाइड तृणधान्ये यांचा समावेश आहारात करू शकता.
लक्षात ठेवा, तुम्हाला दूध सोडायचे असले तरीही तुम्ही तुमच्या पौष्टिक गरजा, विशेषतः कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी पूर्ण करत आहात, याची खात्री करणे ही महत्वाची गोष्ट आहे. आरोग्य सेवा व्यावसायिक किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला संतुलित आणि योग्य आहार प्लॅन तयार करण्यात मदत होऊ शकते, असा निष्कर्ष पोषणतज्ज्ञांनी काढला आहे.