बडीशेप हे एक उत्तम औषध आहे हे फारच थोड्यांना माहीत आहे. बडीशेपेचे बरेच प्रकार आहेत. नेहमी बाजारात मिळणाऱ्या जाड बडीशेपेपेक्षा मध्य प्रदेशातील इंदोरकडची बारीक बडीशेप गोड चवीची असते. बडीशेप रुचकर आहे. तोंडाला स्वाद आणते. जेवणानंतर नुसती चिमूटभर बडीशेप खाल्लेले अन्न पचवू लागते. कितीही जडान्न खाल्ले असले तरी ते पचविण्याचे सामर्थ्य बडीशेपेत आहे. बडीशेप दोन प्रकारे काम करते. पोटात वायू धरू देत नाही. तसेच आमांश किंवा चिकटपणा दूर करते. जेवणानंतर विड्याबरोबर किंवा नुसती बडीशेप खाण्याचा प्रघात हा अतिशय चांगला आहे. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, वारंवार संडासची भावना होणे, पोटात खुटखुटणे यांसारख्या अपचनाच्या सर्व तक्रारींत बडीशेप, बडीशेपेचा काढा किंवा अर्क उत्तम काम करतो.
काहींना सोनामुखी, एरंडेल किंवा जुलाबाची स्ट्राँग औषधे घेण्याची सवय असते. ही औषधे घेतली की पोटात कळ येऊन पोट दुखू लागते. अशा वेळी बडीशेप व चिमूटभर सुंठ घेतले की लगेच आराम पडतो. थोडक्यात, जिभेपासून पक्वाशयापर्यंतच्या अन्नवह महास्रोतसांचे आरोग्य राखण्याचे कार्य बडीशेपेसारखी लहान वस्तू करू शकते. पोट दुखून जुलाब होत असल्यास बडीशेप व खसखशीचा काढा प्यावा. जुलाब थांबतात.
लहान बालकांना दात येताना जुलाबाचा त्रास होतो. त्याकरिता त्यांना चुन्याच्या निवळीबरोबर बडीशेप चूर्ण द्यावे.
मानसविकारात, बुद्धिमांद्या, फिट्स येणे, उन्माद या तक्रारींकरिता बडीशेप काही प्रमाणात उपयोगी पडते. बडीशेप ही वीर्यवृद्धी करते, जिभेचा चिकटा दूर करते. त्यामुळे बुद्धी ज्यांना नेहमी तरतरीत ठेवायची आहे त्यांनी बडीशेप खावी. फिट्स विकारात गार्डिनाल, डिलान्टिन, मेझाटोल अशा नाना औषधांची जन्मभर सवय लागून माणसाचा मेंदू काम करेनासा होतो तेव्हा बडीशेप चूर्ण तुपाबरोबर घ्यावे. स्मरणशक्ती सुधारते.
तापामध्ये शोष पडतो. अंगाची लाही लाही होते. आग आग होते. अशा वेळेस बडीशेपेचे उकळलेले पाणी खडीसाखर घालून थोडे थोडे प्यावे. उन्हाळ्यातील उलट्या, तोंडाला पाणी सुटणे, मळमळणे, छातीतील जळजळ या तक्रारींकरिता बडीशेपेचा काढा थोडा थोडा घ्यावा. पोटात अन्न कुजत असेल तर निरनिराळे क्षार, पादेलोण, शिरका, व्हिनेगर अशा औषधांची सवय लागलेल्यांनी थोडी बडीशेप खावी. आतड्यांची हानी टळते.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

धने

ताज्या कोथिंबिरीच्या अभावी धने वापरावे. मात्र ते किडके नसावेत. धने अतिथंड आहेत. पण रुची उत्पन्न करतात. लघवीची आग, खूप घाम येणे, लघवी कमी होणे, खूप तहान लागणे, विषारी पदार्थांची अ‍ॅलर्जी, अंगाला खाज सुटणे, डोळ्यांची व हातापायांची आग अशा नाना विकारांत धनेचूर्ण पोटात घ्यावे. जेथे आवश्यक तेथे धने वाटून लेप लावावा किंवा डोळ्यासारख्या नाजूक अवयवावर चूर्णाची पुरचुंडी ठेवावी. गोवर, कांजिण्या, तीव्र ताप, कडकी या विकारांत धने ठेचून पाण्यात कुस्करुन त्याचे पाणी गाळून घ्यावे. डोळे येण्याच्या साथीत धन्याचे पाणी गाळून डोळ्यात टाकावे. लाली, चिकटा, स्राव कमी होतो. तापामध्ये खूप स्ट्राँग औषधे घेऊन, खूप घाम आला असेल तर धनेपाणी प्यावे. म्हणजे थकवा कमी होतो. मूतखडा विकारग्रस्त रुग्णांनी एक चमचा धने रात्रौ ठेचून एक कप पाण्यात भिजत टाकावेत. सकाळी ते धने चावून खावे व वर तेच पाणी द्यावे. लघवीचे प्रमाण तात्काळ वाढते.

मिरची : खावी न खावी

मीठ-मिरची या जोडशब्दांनी आपल्याला रोजच्या व्यवहारात इतकी सवय झाली आहे की, स्वयंपाकघरात त्याशिवाय आपले काहीच चालत नाही. क्वचित काही प्रांतांत किंवा काही प्रदेशांत स्वयंपाकात मिरचीऐवजी मिरी वापरतात. पण मिरची नाही असा स्वयंपाक सहसा होत नाही. दक्षिण भारतात विशेषत: आंध्र प्रदेशात मिरचीचा वापर फार. मिरचीमुळे भोजनास चव येते, स्वादिष्ट होते, तोंड स्वच्छ राहते, भूक राहते, लागते. मिरची आपल्या तीक्ष्ण, उष्ण व पित्तवर्धक गुणांमुळे रक्तवर्धक आहे. काही प्रमाणात कफ, आमांश, कृमी आमांशाची पोटदुखी, उदरवात या विकारांत उपयोग होतो. कॉलरा विकारात माफक प्रमाणातच खाल्ल्यास उपयोग होतो. सुकलेली मिरची वातनाशक आहे. ज्याचे शरीर गार पडते, ज्यांना उष्णतेचा    किंवा रक्त पडण्याचा काही त्रास नाही त्यांना सर्दी झाली असल्यास मिरचीच्या बियांच्या चूर्णाचा उपयोग होईल. सर्दी, कफ यामुळे ज्यांना पोटाचा त्रास आहे, पोट दुखते, त्यांनी मिरचीच्या बियांचे उकळलेले गरम पाणी किंवा मिरच्यांचा अर्क घ्यावा. ज्यांना उष्ण पदार्थ चालत नाहीत त्यांनी हा प्रयोग करू नये. भाजलेल्या जागेवर तिखटाचे चूर्ण व गोडेतेल असे मिश्रण लावावे. त्वचा लवकर भरून येते. त्वचेत जखम होत नाही.
काहींना खूप मिरच्या खायची सवय असते. ती सवय सोडण्याकरिता मिरच्यांचा वापर चढउतार पद्धतीने म्हणजे तीन, चार, दोन, अडीच, दीड, दोन, एक, दीड, अर्धी अशा पद्धतीने करावा. पंधरा दिवसांत मिरची जास्त खाण्याची सवय सुटते.
मिरच्यांमधील बी हे शरीराचा दाह करणारे आहे. मिरच्यांचे बी काढून टाकावे. नुसत्या टरफलांचे चूर्ण करावे. हे चूर्ण कॉलरा, हगवण, आमांश या पोटाच्या तक्रारींत विविध अनुपानाबरोबर वापरावे. कांदा रस, हिंग, कापूर, डाळिंबाचे दाणे, चिंच, गूळ, आले, जिरे, पुदिना, लिंबू अशा विविध पदार्थांबरोबर आवडीनुसार मिरची चूर्ण वापरता येते. पूर्णपणे बंद झालेला अग्नी मिरचीच्या माफक वापराने पूर्ववत कामात आणता येतो. मिरच्यांमध्ये काही जीवनसत्त्वे आहेत. त्यामुळे त्वचेत किडा-मुंगी किंवा कुत्रा, कोळी यांची विषबाधा झाली तर जखमेत मिरची बी चूर्ण भरून लावावे. विषबाधा होत नाही. दारुड्या माणसाला भूक लागत नसल्यास मिरचीच्या तिखटाचा उपयोग होतो. मिरचीने पोटात आग पडत असल्यास मिरचीच्या तिखटाबरोबर थोडा चुना मिसळावा.
मिरचीने जेवढे रोग बरे होऊ शकतील त्यापेक्षा अनेकपट रोग मिरचीच्या कमी-अधिक वापराने होतात. असलेले रोग वाढतात. वाढलेले रोग बळावतात. मिरची तीक्ष्ण, उष्ण व अतिशय रूक्ष आहे. रक्तातील दाहकता मिरचीच्या वापराने वाढते. त्यामुळे रसधातूंतील स्निग्धपणा, सौम्यपणा, मिरचीच्या अधिक वापराने नाहीसा होतो. शरीरातील मृदू, कोमल, सौम्य अवयवांचा नाश मिरचीमुळे होतो. केस, डोळे, नाक, ओठ, जीभ, घसा, गळा, सर्व आशय उदाहरणार्थ अमाशय, ग्रहणी, लहान व मोठे आतडे, गर्भाशय, स्तन, किडनी, मूत्रेंद्रिय, त्वचा, गुद इत्यादी अवयवांचे स्वास्थ्य मिरचीच्या कमी-अधिक वापराने बिघडते.
अजीर्ण, आम्लपित्त, अल्सर, अ‍ॅलर्जी, डोळे, त्वचा, मूत्रेंद्रिय, गुद यांची आग होते. पोटात आग पडणे, आमांश, अंग बाहेर येणे, रक्तप्रदर, अत्यार्तव, उलट्या, कंडू, सांधेदुखी, कंबर, गुडघे व पाठदुखी, कान वाहणे, कावीळ, केस गळणे, पिकणे, कृशता, गरमी, परमा, गोवर, कांजिण्या, गांधी उठणे, डोळ्यांची लाली, तोंड येणे, त्वचाविकार, दंतविकार, नागीण, अनिद्रा, पांडू, भगंदर, मूळव्याध, पोटदुखी, फिटस् येणे, रक्तक्षय, मुखरोग, हाडांचे विकार इत्यादी विकारांत मिरची चूर्ण वज्र्य करावे. तिखटपणा व पचनाकरिता आले किंवा मिरी यांचा वापर करावा. ज्यांना जेवणात तिखट हवे पण मिरचीचे दोष नकोत त्यांनी ढोबळी मिरची वापरून पाहावी. ‘ढोबळ्या मिरचीचे पंचामृत’ ही वैद्या खडीवाल्यांची खास खास रेसिपी प्रसिद्धच आहे. त्याकरिता ‘नैवेद्याम’ पुस्तकाची मदत जरूर घ्यावी.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy benefits of fennel good for digestion psp