“केसांना आंघोळीनंतर घराबाहेर पडण्यापूर्वी तेल लावावे का?” या प्रश्नाचे उत्तर “नाही” असे देणार्यांकडून सर्वसाधारणपणे हा मुद्दा मांडला जातो की,केसांना तेल लावून घराबाहेर पडल्यानंतर बाहेरच्या वातावरणातील धूळ-धूर-प्रदूषक घटक,वगैरे कचरा केसांना चिकटण्याचा धोका असतो.ज्यामुळे केसांच्या मुळांशी कचरा जमून मुळं सैल होऊन केसांचे आरोग्य खराब होऊ शकते. मात्र हा मुद्दा एकांगी वाटतो.
याची दुसरी बाजू बघू. केसांना लावले जाणारे तेल हे एक प्रकारचे आच्छादक आवरण तयार करते,जे वातावरणातील धूळ-धूर,कचरा वगैरे घटकांना केसांच्या मुळांशी जाण्यापासुन रोखते.एकंदरच केसांना लावले जाणारे तेल हे एकीकडे केसांना आवश्यक असणारे पोषण देऊन, मुळांना अधिक घट्ट करुन,तिथल्या त्वचेला कोरडी पडू न देता, कोंड्याला प्रतिबंध करुन आणि दुसरीकडे बाह्य घटकांपासून संरक्षण करुन केसांना निरोगी राहण्यास साहाय्य करते.
आपल्या परंपरेने केसांना तेल लावण्याचे महत्त्व इतक्या ठाम शब्दांमध्ये पटवून दिले आहे,की केसांना तेल लावणे हा दिनचर्येचा एक भाग बनवला गेला, ज्याचे अनुसरण शतकानुशतके आपण करत होतो आणि तोवर आपले केस ना कधी कोरडे पडत होते,ना अकाली पांढरे होत होते, ना गळत होते.मात्र आजच्या शाम्पू आणि कंडीशनरच्या जमान्यात केसांना तेल लावण्याची प्रथा बंद पडत चालली आहे.
आधुनिक सौंदर्य-विशारद तर आपल्या आरोग्य-परंपरा कशा चुकीच्या आहेत,हेच पटवून देण्याच्या प्रयत्नात असतात.शाम्पू आणि कंडीशनर्सचे निर्माते आमची उत्पादने वापरा, मग केस कसे सुंदर-मुलायम-चमकदार दिसतील ,हे लोकांना नानाप्रकारे पटवून देत असतात.वास्तवात शाम्पू-कंडिशनर्सचा हा परिणाम तात्पुरता असतो व तो परिणाम नेहमी दिसायचा तर त्यांचा नियमित उपयोग करावा लागतो.यांमध्ये वेगवेगळी केमिकल्स वापरली जातात आणि केमिकल्सच्या नित्य वापराने केसांचे आरोग्य सुधारेल का बिघडेल हे वाचकांना वेगळे सांगायला नको.मात्र या शाम्पूजचा असा काही प्रचार केला जातो की त्यामुळे तेल लावण्यासारख्या केसांना सुदृढ करणार्या परंपरेची गरजच काय?असे लोकांना हळूहळू वाटू लागते. शाम्पूजच्या तात्पुरत्या प्रदर्शनीय परिणामाच्या प्रभावाखाली येऊन समाज केसांना तेल लावण्याबाबत अगदी नकारात्मक होऊन जातो.
या पार्श्वभूमीवर एक गोष्ट निश्चितपणे सांगता येईल की, परंपरागत पद्धतीने केसांची काळजी घेणार्यांचे केस चाळीशी-पन्नाशीनंतरही लांबसडक व काळेभोर असतात.याऊलट आधुनिक सौंदर्य-विशारदांच्या सांगण्यानुसार केसांची काळजी घेणाऱ्यांच्या डोक्यावर कालांतराने केसांचे कसे घरटे तयार होते, ते तर आपण आजुबाजुला पाहात असतो. एकवेळ ’केसांना तेल कधी लावावे’ हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो, परंतु केसांना तेल लावायचेच नाही आणि वेगवेगळ्या शाम्पू-कंडिशनर्सचा मात्र नित्यनेमाने केसांवर मारा करायचा, हे अजिबात योग्य नाही. हा मार्ग तुम्ही अनुसरत असाल तर एक ना एक दिवस तुमच्या डोक्यावरसुद्धा घरटं तयार होईल हे नक्की! आता तुमच्या केसांची काळजी घेताना कोणता मार्ग अनुसरायचा ते तुम्हीच ठरवा.