डॉ. शशांक सामक आणि डॉ. जेसिका सामक

जोडीदारात असणारा इंटरेस्ट पुन्हा निर्माण करण्यासाठी जोडीदाराकडे पहिल्यांदा लक्ष द्यायला शिकले पाहिजे. मी जोडीदारासाठी ‘लक्ष देणे, गुणग्राहकता आणि कौतुक तंत्र’ (अटेंशन, अ‍ॅप्रिसिएशन अ‍ॅण्ड प्रेजिंग टेक्निक) अमलात आणायला सांगतो. अगदी पत्नीने केलेल्या चहा, ब्रेकफास्टच्या कौतुकापासून पतीच्या पेहरावाचे कौतुक हे खरे म्हणजे अवघडही नसते आणि खोटेही नसते. पण ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ हे जाणून कष्टपूर्वक हे तंत्र आत्मसात करता येते.

कामावर जाताना जोडीदाराला एक ‘जादूकी झप्पी’ व हलके चुंबन देणे अंगवळणी पाडणे जमले तर जोडीदाराला ‘आपण एकमेकांचे आहोत’ हा दाम्पत्यस्वास्थ्याचा बहुमूल्य संदेश काही क्षणातच दिला जातो. त्यासाठी काही सेकंद लागत असतात आणि तेवढा एकांत (प्रायव्हसी) दाम्पत्य कुठल्याही बहाण्याने मिळवू शकते. फक्त तिथे दाम्पत्याने उद्युक्त होणे, मोटिव्हेट होणे आवश्यक असते. म्हणून मी नेहमीच सांगतो की जोडीदाराला ‘मुठीत’ नव्हे तर ‘मिठीत’ ठेवायला शिका. कामसूत्रामध्ये तर चुंबनाचे २४ प्रकार उल्लेखलेले आहेत. चुंबनाचा उपयोग त्या क्षणी स्वल्पविराम म्हणून, उद्गारवाचक चिन्ह म्हणून, प्रश्नचिन्ह म्हणून किंवा पूर्णविराम म्हणून, असे विविध संदेश देण्यासाठी होत असतो.

बेडरूमबाहेरचा शृंगार तर शृंगारकलेचा कळस असतो. याचाच उपयोग बेड रोमान्ससाठी होत असतो हे पती-पत्नींनी लक्षात ठेवणे गरजेचे असते. म्हणून तो जाणीवपूर्वक विकसित केला पाहिजे. याचा उद्देश आपला जोडीदार केवळ एक व्यक्ती नसून एक व्यक्तिमत्त्व आहे हे लक्षात घेऊन ते जाणून घेणे हा असतो. संवाद हे त्याचे प्राणतत्त्व असते. निवांत ठिकाणी असा संवाद जर झाला तर आपल्या जोडीदाराच्या आवडी-नावडी, कला (टॅलेंट) याचे ज्ञान होते. म्हणून कधी कधी ‘कँडल लाइट डिनर’साठी म्हणजे निवांत ठिकाणी केलेले सुसंवादी खाद्य-पेयपानासाठी वेळ काढला पाहिजे. यासाठी अगदी फाईव्ह-स्टार वातावरण किंवा मेणबत्ती पाहिजेच असे नाही. (पाहिजे तर स्वत:च्या खिशातून घेऊन जा.) ‘नाइट आउट’ अर्थात एखादी जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी दाम्पत्याने घालवलेली शृंगारिक रात्र ही दैनंदिन आयुष्यातील ताण घालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. यासाठी कुठेही लांबवर ‘ट्रिप’ केली पाहिजे असे नाही. मधूनमधून अशा जवळपासच्या ठिकाणच्या ‘नाइट आउट’ दाम्पत्य जीवनासाठी चैतन्यमय ठरते, शृंगारिकतेचे पुनरुज्जीवन करते.

आपल्या दैनंदिन करिअरच्या व्यापातही शृंगार जपता येतो हे भान दोघांनीही ठेवले पाहिजे. यासाठी मी ‘दूरस्पर्शी संवाद’तंत्र (डिस्टंट टच कम्युनिकेशन टेक्निक) वापरायला सांगतो. दिवसभरात जोडीदाराशी फोनवर संवाद साधणे व रोमँटिक एसेमेसची देवाण-घेवाण करणे हे सहजशक्य असते. कामात व्यग्र असल्याने इच्छा असूनही हे जमत नाही म्हणणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, न करण्यासाठी शंभर कारणे सांगता येतात, पण करण्यासाठी एकच कारण आवश्यक असते ते म्हणजे त्यासाठी प्रवृत्त होणे, मोटिव्हेट होणे. संवादासाठी काही मिनिटांचा वेळ पुरेसा असतो.

बहुतांशी संवाद जेव्हा फोनवर केले जातात, ते चौकशांचे असतात (इन्क्वायरी फोन). रोमँटिकपणा क्वचितच असतो. अगदी ‘आय लव यू’ नाही म्हणता आले (मुख्यत अ‍ॅरेंज्ड मॅरेजवाल्यांना) तरी ‘मला तुझी आठवण झाली म्हणून फोन केला’ अशी वाक्येसुद्धा रोमँटिकच असतात. ती उच्चारण्यासाठी काही सेकंदांचा वेळ लागतो आणि तेवढा वेळ व एकांत कामाच्या व्यापातून आपण रोज निश्चितच काढू शकतो. जोडीदाराला ‘आय लव यू’ म्हणणे हे केवळ त्याच्या मनाच्या प्रसन्नतेसाठी नसून आपण आपल्याही मनाला त्या प्रत्येक वेळी त्याची जाणीव (सेल्फ टॉक) करून देत असतो. हे आपण आपले केलेले पॉझिटिव्ह ब्रेन वॉश असते. यामुळे दाम्पत्यस्वास्थ्य सुदृढ होत असते.

मधूनमधून छोट्या छोट्या रोमँटिक गिफ्ट, बक्षीस देणे याने दाम्पत्यजीवनाचे स्वास्थ्य सुधारत असते. जोडीदाराला कारणाशिवाय कधी तरी गुलाब देणे हे खरे तर अत्यल्प खर्चाचे असूनही डेटिंग काळातच करायचे असते असे मानून मधुचंद्र काळानंतरही ते चालू ठेवायचे असते याचे भान कित्येकांना नसते. काही वेळा नवरा कारणाशिवाय गुलाब देतोय म्हणजे ‘काही तरी’ कारण मुरतंय असंही बायकोला वाटू शकते. एकाने सांगितले की, त्याच्या बायकोला फुलांची अ‍ॅलर्जी आहे. अशांनी ‘लाल गुलाबा’चे ‘ग्रीटिंग कार्ड’ द्यायला हरकत नाही. एक लाल गुलाब तुमच्या हृदयाचे हजार शब्द बोलून दाखवतो हे ध्यानात ठेवा. याची सवय करा. त्याच्या लालपणात शृंगाराची ठिणगी दडलेली असते. तिने दाम्पत्यजीवनातील ‘कामज्वाला’ पेटू द्या आणि दिवसभरात तुमच्या कामाच्या रगाड्यातही अशा ठिणग्या वारंवार पडू द्यात.

रोमँटिकपणाला वय नसते. दुर्लक्षित रोमँटिकपणामुळे विस्कळीत दाम्पत्यजीवन, दाम्पत्यांमधील ताणतणाव, करिअरवर होणारा दुष्परिणाम व जोडीदाराचे दुसरीकडे भरकटणे या गोष्टींना निश्चितच आळा बसेल. दाम्पत्यांमध्ये त्याला समाजमान्यता असल्याने रोमँटिकपणाला चुकीची गोष्ट किंवा गुन्हाही मानू नये. उलट वाढत्या वयात दाम्पत्यातील एकोपा वाढवायला, टिकवायला या जवळीकतेची जास्तच गरज असते. ज्यांना मनातून अशी इच्छा असते पण वास्तवात असे जमणे कठीण वाटते अशा काहींना वाढत्या वयातील इतर कोणाचा ‘रोमँटिकपणा’ हा ‘आंबटशौकीनपणा’ वाटू शकतो, कारण ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबटच’. साठी-सत्तरीनंतरही दाम्पत्यांमध्ये ही इंटिमसीची ज्वाला जीवन सुखकरच करेल. अजूनही वय गेलं नाही, अजूनही वेळ गेली नाही. शुभस्य शीघ्रम्.

(लोकसत्ता चतुरंग पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.)

Story img Loader