मुंबईसारख्या शहरांमध्ये नोकरी, शिक्षण, व्यवसाय आदी निमित्ताने दिवसभर घराबाहेर राहणार्‍यांना भूक लागली की जेव्हा बाहेर खावे लागते, तेव्हा चौकाचौकात असलेला उडप्याच्या हॉटेल्ससारखा सहज उपलब्ध दुसरा पर्याय नसतो. खरं तर केवळ मुंबई नव्हे तर सर्वच शहरांमध्ये दिवसभर घराबाहेर राहणार्‍यांना आपली भूक शमवण्यासाठी या उडप्यांच्या हॉटेलचाच आसरा घ्यावा लागतो. अशा वेळी त्या हॉटेल्समध्ये गेल्यावर जे मेन्युकार्ड आपल्यासमोर येते; त्यामध्ये सात-आठ डोशाचे प्रकार, सात-आठ उत्तप्याचे प्रकार आणि चार-पाच इडली वड्याचे प्रकार असतात. एकंदरच आपण जिथे नित्य खायला जातो, त्या हॉटेल्सच्या मेन्युकार्डमधील अर्ध्याहून अधिक पदार्थ हे उडदापासून बनवलेले असतात. चवीला साधारण सारखेच लागणारे असले तरी ’पटकन खाता येतात व पोट भरतात’ हा त्यांचा एक गुण म्हटला पाहिजे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे पदार्थ तुम्हाला त्रासदायक ठरु शकतात, ते त्यांच्यामध्ये असलेल्या एका दोषामुळे. कसे विचारताय?

आयुर्वेदाने उडीद हे स्वेदोपग सांगितले आहेत. स्वेद म्हणजे घाम आणि स्वेदोपग म्हणजे घाम आणणारे, शरीराचा घाम वाढवणारे. उडदाचे सेवन केल्यावर शरीरामधून येणार्‍या घामाचे प्रमाण वाढते. आता जरा विचार करा या सध्याच्या रेकॉर्डब्रेकिंग उष्म्याच्या दिवसांमध्ये सकाळी घराबाहेर पडतानाच जिथे घाम यायला सुरुवात होते, कामावर पोहोचता-पोहोचता शरीर घामाने निथळत असते त्या अंगाची काहिली करणार्‍या या उन्हाळ्यामध्ये घाम वाढवणारा अन्नपदार्थ खाणे योग्य होईल काय? अनारोग्याच्या विशिष्ट अवस्थांमध्ये, विशिष्ट आजारांमध्ये, विशिष्ट ऋतुमध्ये उडदाच्या या घाम निर्माण करण्याच्या गुणाचा उपयोग करुन घेणे अपेक्षित असते. मात्र शरीर घामाने थबथबत असताना, त्यात पुन्हा उडीद खाऊन घाम वाढवण्यात काय हशील?

खरं सांगायचं तर वर सांगितलेले खाद्यपदार्थ एकदा पीठ आंबवून ठेवले की पटकन तयार होतात व ग्राहकाच्या समोर त्वरित आणून देता येतात, अशी हॉटेलवाल्यांनी त्यांची सोय बघितली, पण आपल्या आरोग्याचे काय? कोणी म्हणेल उडीद घाम वाढवून शरीरातला उष्मा कमी करत असतील तर ते आरोग्याला लाभदायक होईल. मात्र उडिद जसे घाम वाढवणारे आहेत, तसेच ते पचायला अतिशय जड आहेत. नित्य नेमाने व्यायाम करणार्‍यांनी उडीद खावे, तेसुद्धा हिवाळ्यामध्ये. अन्यथा उन्हाळ्यामध्ये भूक व पचनशक्ती मंदावलेली असताना उडीद खाणे योग्य नाही. एकंदर काय तर उडीद आपल्या दमट वातावरणाला अनुकूल नाहीतच. ज्या मुंबईच्या हवेमध्ये बारा महिने दमटपणा असतो. उन्हाळ्यात तर दमटपणा आणि उष्णता यांचा असा काही संगम होतो की बाहेर वावरताना लोकांना घामाची आंघोळ घडत असते. अशा शहरातल्या लोकांनी उडीद खाऊन अजून घाम कशाला वाढवायचा? (वाईट वाटतंय का आता तरी, रुचकर आरोग्यदायी खाद्यपदार्थ देणारी मराठी हॉटेल्स बंद पडल्याचा?)

Story img Loader