मद्यपान करणार्‍यांना मद्यासोबत तोंडी लावायला जे अनेक रुचकर पदार्थ खायला लागतात, त्यांना ‘चकणा’ म्हणतात. हा चकणा शब्द मुळात चखणा असा आहे आणि त्याचा अर्थ चाखण्याजोगा पदार्थ असा आहे. मद्याचा आस्वाद घेता-घेता तोंडात टाकायचे खाद्यपदार्थ म्हणजे चकणा.
हा चकणा देण्यामागे काय कारण असेल बरं? तुम्ही म्हणाल मद्य पिताना तोंडाला चव यावी किंवा भूक लागते ती भागावी हाच हेतू, अजुन काय? पण हा चकणा देण्यामागे हॉटेलवाल्यांचा फार मोठा फायदा असतो, असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही !चकणा देण्यामध्ये हॉटेलवाल्यांचा कसला आलाय स्वार्थ, असं वाटत असेल ना तुम्हाला. मग समजून घ्या चखणा देऊन मद्य विकणार्‍यांचा कसा फायदा होतो ते!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चकणा म्हणून सहसा कोणते खाद्यपदार्थ देतात, ते आठवा बरं. खारवलेले शेंगदाणे, पापड वा वेफर्स, खारे काजू, मीठ घालून उकडलेले चणे, तिखट-खारट चवीची चण्याची वा मुगाची डाळ, मसालेदार तळलेले मासे वा झिंगा, वगैरे-वगैरे. (ही यादी तुम्हीं बरीच लांबवू शकता, हे माहीत आहे मला) चकणा म्हणून दिले जाणारे हे सर्व पदार्थ प्रामुख्याने खारट व तिखट असतात. मद्याबरोबर तुम्ही जेव्हा या पदार्थांचे सेवन करता तेव्हा हळूहळू शरीरामधील मीठाचे प्रमाण वाढत जाते. हे मीठ शरीरकोषांमध्ये शिरले की शरीरकोषांमधील द्रवांश कमी होतो व शरीर-कोष द्रवाची मागणी करतात. हे पदार्थ खाताना मीठाबरोबरच् शरीरामध्ये तिखटाचेही प्रमाण वाढत जाते, तसतशी शरीराची पाण्याची गरज अधिकाधिक वाढत जाते. या कारणांमुळे शरीर पाण्याची मागणी करते. या अवस्थेमध्ये मद्यपान करणार्‍याला शोष पडतो आणि त्याला पाणी प्यावेसे वाटू लागते. पण मद्यपान करताना तहान लागली म्हणून तुम्ही काही पाणी पित नाही. ‘तहान भागवण्यासाठी द्रवपदार्थच प्यायचाय ना’, या विचाराने तुम्ही मद्यच पिता. जेवढा चकणा जास्त तेवढे मद्यपान जास्त, असे सरळ समीकरण असल्याने चकणा खाता-खाता अधिकाधिक मद्यपान केले जाते. आहे की नाही मद्यविक्री करणार्‍याचा फायदा. याचसाठी तर मद्याबरोबर चकणा मोफत दिला जातो.

मात्र तुमचा-तुमच्या आरोग्याचा मात्र यामध्ये तोटा आहे हे विसरु नका. तुमच्या आरोग्याची काळजी असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मद्यपानापासून दूर राहा. पण मद्यपान् करणारच असाल तर मद्यपानाबरोबर चखणा म्हणून खारट-तिखट पदार्थ टाळून सॅलड घ्या ; पण त्यावर मीठ् टाकू नका आणि हो, तहान लागेल तेव्हा पाणी प्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy tips in marathi what is ideal snack chakna to have with alcohol