बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन यांमुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. त्यात कामाचा वाढता ताण, अपुरी झोप, कौटुंबिक समस्या यांचे विपरित परिणाम तुमच्या हृदयावर होत असतात. अशाने बहुतेकांना मानसिक आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागतो. ताण, नैराश्य व चिंता ही प्रमुख लक्षणे तुमच्या हृदयावर गंभीर परिणाम करीत असतात. पण, या परिस्थितीचा सामना कशा प्रकारे करायचा आणि आपले हृदय निरोगी कसे ठेवायचे याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नोएडामधील फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक व एचओडी डॉ. संजीव गेरा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यासाठी डॉ. गेरा यांनी हृदयविकाराच्या झटक्यातून वाचलेल्या अनुराज सिंह नामक एक रुग्णासंदर्भात माहिती दिली आहे.
डॉ. गेरा यांनी सांगितले की, अनुराज सिंग सध्या स्वत:ची खूप काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडत थोडेसे रिलॅक्स होण्यासाठी तो स्वत:ची गिटार वाजवण्याची कला जोपासत आहे. घरी बनवलेले जेवण खातोय. पण, काही महिन्यांपूर्वी या २१ वर्षीय बीबीए विद्यार्थ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. अनुराज त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी जात असताना त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो खाली कोसळला. पाठदुखी आणि छातीत दुखणे किंवा भरुन येणे ही असामान्य लक्षणे दिसू लागल्याने त्याने तातडीने रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या मित्रांनी रुग्णालय गाठले; पण तोपर्यंत अनुराजची अँजिओप्लास्टी झाली होती.
अनुराजला मद्यपान किंवा धूम्रपान असे कोणतेही व्यसन नव्हते किंवा त्याचा असा कोणता कौटुंबिक इतिहासही नव्हता. तरीही त्याला हृदयविकाराने घेरले. अजूनही त्याच्या हृदयात एक ब्लॉकेज आहे; जो लवकरच औषधोपचाराने बरा होईल, अशी आशा आहे. डॉ. गेरा म्हणाले की, आता त्याच्या हृदयात सुधारणा होत असून, हळूहळू तो शारीरिक हालचाली वाढवू शकेल. यातून लवकर बरे होण्यासाठी तो योगा आणि इतर काही अॅक्टिव्हिटी करीत हृदय पुन्हा निरोगी व सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत तो आता एमबीए कोर्ससाठी त्याच्या CAT (सामान्य प्रवेश परीक्षा) परीक्षेची तयारी करण्यासाठीही मेहनत घेत आहे. पण, प्रत्येकाने हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत. त्यासाठी BMI (बॉडी मास इंडेक्स), कोलेस्ट्रॉल व रक्तातील साखरेचा तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर काय परिणाम होतोय हे तपासले पाहिजे. कारण- आपण याच सर्व गोष्टींना क्षुल्लक समजून दुर्लक्ष करतो आणि स्वत:चा जीव धोक्यात घालत असतो.
आईच्या मृत्यूनंतर आलेला तणाव हृदयविकाराच्या झटक्यासाठी ठरला कारणीभूत?
एका अभ्यासानुसार, कॉर्टिसॉलसारख्या तणाव संप्रेरकांच्या उच्च पातळीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, रक्तातील साखर व रक्तदाब वाढू शकतो. ही सर्व लक्षणे हृदयविकाराच्या झटक्यासाठी सर्वसामान्य जोखीम घटक मानले जातात. तणावामुळे कोरोनरी धमनीच्या रक्तवाहिन्यांचे स्वरूप बदलते आणि प्लेक जमा होण्यास प्रोत्साहन मिळते. यावर डॉ. संजीव गेरा म्हणाले की, अनुराजबाबत असे झाले की, त्याला जाणवणारी लक्षणे ही हृदयविकाराच्या झटक्याची आहेत हे त्याला समजलेच नाही आणि नेमक्या याच तणावामुळे अनुराजला हृदयविकाराचा झटका आला होता.
यकृत प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेनंतर अनुराजच्या आईचा मृत्यू झाला आणि त्यात तो आईसाठी यकृतदाता होता. पण, असे करूनही आईला वाचवता न आल्याने त्याला खूप अपराधी असल्यासारखे वाटत होते. त्यामुळे तो खूप तणावाखाली गेला आणि त्याला जीवन नकोसे वाटत होते. अशा परिस्थितीत तो कधीही जेवायचा, काही वेळा भरपूर खायचा, त्याला नीट झोप लागत नव्हती, तो क्वचितच घराबाहेर पडायचा. या सर्व कारणांमुळे त्याचे वजन वाढले आणि त्याला स्थूलतेचा सामना करावा लागला. तरुण असल्याने त्याने कधीही कोलेस्ट्रॉलची चाचणी केली नाही; ज्यामुळे त्याचे अधिक नुकसान झाले. कारण- त्याच्या शरीरात काय बदल होत आहेत याचा अंदाजही त्याला येत नव्हता,.अशा परिस्थितीत अचानक त्याला हृदयविकाराने घेरले.
पण, एवढ्या लहान वयात अनुराजच्या शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण पाहून डॉ. गेरा यांनी अजिबात आश्चर्य वाटले नाही. कारण- गेल्या सहा महिन्यांत हृदयविकारासंबंधित १०० हून अधिक रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. त्यापैकी ५० टक्के रुग्ण हे ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यातही अर्ध्या रुग्णांचे वय ३५ वर्षांपेक्षाही कमी आहे. पुन्हा यातही २५-३० वयोगटातील जवळपास ३० रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत, अशी माहिती डॉ. गेरा यांनीच दिली.
डॉ. गेरा यांनी पुढे म्हटलेय की, इतर लोकसंख्येच्या तुलनेत हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांमध्ये किमान एक दशक आधी हृदयविकाराची लक्षणे विकसित होण्यास सुरुवात होते. एखाद्या आजाराचा कौटुंबिक इतिहास, बैठी जीवनशैली, हाय कोलेस्ट्रॉल, बीपी आणि प्री-डायबेटिस यांसारख्या काही बाबी तुम्हाला कोणत्याही वयात हदयविकाराचा झटका येण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे २० व्या वर्षात हृदयाची प्राथमिक तपासणी केली पाहिजे. विशेषत: धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांनी तर ही चाचणी केलीच पाहिजे. डॉ. गेरा म्हणाले की, त्यांच्याकडे बहुतेक रुग्ण असे येतात की, जे आयटी प्रोफेशनल्स आहेत, जे सतत तणावाखाली काम करीत असतात. त्यामुळे झोपेचे कोणतेही निश्चित तास नसतात, बाहेर जेवतात आणि त्यांचे अस्तित्व पलंग किंवा खुर्चीपर्यंत मर्यादित झालेले असते.
हृदयविकाराची लक्षणे कशी ओळखायची?
बहुतेक जण हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी जाणवणाऱ्या काही लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. डॉ. गेरा म्हणाले की, कधी कधी एक आठवड्याहून अधिक दिवस तुम्हाला गॅसचा तीव्र त्रास होऊ शकतो; पण लोक त्याकडेही दुर्लक्ष करतात.
अनुराजच्या केससंदर्भात बोलताना डॉ. गेरा म्हणाले की, ४ सप्टेंबर रोजी अनुराजला अशीच काही लक्षणे जाणवत होती, त्याला छातीत अधेमधे वेदना होत होत्या. या वेदना कमी होत नसल्याने त्याने फोर्टिस हॉस्पिटलमधील डॉक्टरांना भेट दिली. त्यावेळी डॉक्टरांनी २४ तासांत काही अँटासिड्स आणि ईसीजी लिहून दिली. पण ५ सप्टेंबर रोजी वेदनांची तीव्रता इतकी वाढली की, तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि खाली कोसळला. यावेळी ईसीजी अहवालात त्याच्या हृदयात डाव्या आणि उजव्या व्हेंट्रिकलमध्ये दोन ब्लॉकेज असल्याचे दिसून आले. त्याला स्टेंटची गरज नव्हती; तर त्याच्या बंद झालेल्या धमन्या उघडणाऱ्या फुग्याची गरज होती.
अनुराज नैराश्याचा बळी कशामुळे ठरला?
गेल्या एप्रिलमध्ये त्याच्या आईच्या मृत्यूनंतर वर्षभराहून अधिक काळ तो एकटाच राहत होता. नोकरीचे ठिकाण बदलत असल्याने त्याच्याबरोबर भाऊ-बहीण आणि वडील कोणीही नव्हते. २१ वर्षांत तो एकाकी जीवन जगत होता. आईच्या यकृत प्रत्यारोपणासाठी त्याने दाता होण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आईच्या शस्त्रक्रियेपूर्वी त्याने तंदुरुस्त होण्यासाठी वजन कमी केले; पण तिच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या शरीर, तब्येतीकडे लक्ष देणे थांबवले.
अशा परिस्थितीत त्याने नोएडाच्या एका फर्ममध्ये वर्क फ्रॉम-होम इंटर्नशिपसाठी साइन अप केले. त्यामुळे तो इतरांपासून अधिकच दुरावला. कोणाशी बोलणे-चालणे नाही, कुठे जाणे नाही; ज्यामुळे तो नैराश्याच्या वाटेवर जाऊ लागला. या परिस्थितीत तो रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करुन खाऊ लागला. त्यात ऑफिस टाइममध्ये टेबलवर बसून काम आणि नंतर बेडवर जाऊन झोपणे यापलीकडे दुसरे तो काही करीत नव्हता; ज्यामुळे त्याचे वजन खूप वाढले.
अनुराजने या सर्व अनुभवावरून सर्वांना एकच गोष्ट सांगितली की, तुम्ही मानसिक आरोग्याची काळजी घ्या. या परिस्थितीनंतर आता त्याच्या वडिलांनीही त्याच्यासोबत राहण्यासाठी कामावर बदली करून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. या सर्व मानसिक तणावावरून तो सांगतो की, तुमचे शरीर आणि मन तंदुरुस्त नसेल, तर तुम्ही कुठेही वाहत जाऊ शकता. या परिस्थितीत तो जीवनाचा धडा लवकर शिकला. आता त्याने तंदुरुस्त व आनंदी जीवन जगण्याचा निर्धार केला आहे.