Heart Attack : गेल्या काही वर्षांपासून हार्ट अटॅकच्या प्रमाणात लक्षवेधी वाढ झाली आहे. चुकीच्या लाइफस्टाइमुळे अनेक लोक हार्ट अटॅकला बळी पडतात. बंगळूरु येथील कौवेरी हॉस्पिटल्सचे वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट (senior interventional cardiologist) डॉ. गणेश नल्लूर शिवू ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगतात, ” ह्रदयासंबंधित आजार भारतात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि हार्ट अटॅक हे अनेक लोकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. हल्ली तरुणाईसुद्धा हार्ट अटॅकला बळी पडत असल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत, ही चिंतेची बाब आहे. यामागे स्ट्रेस, चुकीची लाइफस्टाइल, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि धूम्रपान ही महत्त्वाची कारणे आहेत.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक्सपर्ट सांगतात, “नवनवीन आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असूनही हार्ट अटॅकमुळे मृत्यूंची संख्या मात्र वाढताना दिसत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हार्ट अटॅकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे होय. अनेकदा आकस्मित हार्ट अटॅकचा झटका येतो आणि तेव्हा काय करावे, हे सुचत नाही.”

हेही वाचा : सोमवारी हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात 

डॉ. शिवू सांगतात, ” छातीत दुखणे हे हार्ट अटॅकचे सर्वात सामान्य लक्षण आहे पण याशिवायही काही लक्षणे आहेत, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. जसे की श्वास घेताना त्रास होणे, वारंवार घाम फुटणे, खूप अशक्तपणा आणि थकवा जाणवणे आणि चक्कर येणे. मधुमेहाच्या रुग्णांमध्येही आणि विशेषत: महिलांमध्येही ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.”

“छातीत दुखताना हे सहसा उजव्या किंवा डाव्या बाजूला, जबड्यात, डावा हात किंवा पाठीत वेदना होतात. काही रुग्णांना वरच्या भागातील उदर(abdomen)च्या मध्यभागी सुद्धा वेदना जाणवतात. अनेकदा आपण या वेदना आणि ॲसिडिटीमधला फरक समजू शकत नाही. त्यामुळे केवळ दुखण्यावरून हार्ट अटॅकचे लक्षण जाणून घेणे खूप कठीण आहे. यासाठी ईसीजी (ECG), इकोकार्डिओग्राम (echocardiogram) आणि रक्तातील ट्रोपोनिन पातळी ( blood troponin levels) सारख्या टेस्ट करणे खूप जास्त गरजेचे आहे. हार्ट अटॅक हा आकस्मित येतो, त्यामुळे यावर लवकरात लवकर उपचार केल्यामुळे रुग्णाचा जीव वाचवू शकतो.” डॉ. शिवू यांनी सविस्तर सांगितले.

हेही वाचा : हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी वेळीच करा कॅल्शियम स्कोअर टेस्ट, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात… 

‘द गोल्डन अवर’ संकल्पनेनुसार हार्ट अटॅक आल्यानंतर १२ तासाच्या आत उपचार केल्याने रुग्णाचा जीव वाचवू शकतो. डॉ शिवू सांगतात, ” हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागताच सहा तासांच्या आत अँजिओप्लास्टी ( Angioplasty) केल्याने रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो, त्यासाठी वेळेत उपचार करणे गरजेचे आहे. हार्ट अटॅकची लक्षणे दिसताच १२ तासांनंतर उपचार केल्याने रुग्णावर उपचाराचा फायदा होत नाही. जर हार्ट अटॅक आलेला रुग्ण घरी किंवा कामावर असेल तर मृत्यूचा धोका ५० टक्के असतो पण हार्ट अटॅक आल्यानंतर रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत जिवंत असेल तर मृत्यूचा धोका १० टक्के कमी होतो. म्हणूनच हार्ट अटॅकची लक्षणे जाणून घेऊन त्वरित डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

डॉ. पुढे सांगतात, “दुर्दैवाने आजही अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि उशिरा डॉक्टरकडे जातात, ज्यामुळे उपचार घेऊनही काही फायदा होत नाही. लक्षणे जाणून घेऊन वेळीच सावध होणे, महत्त्वाचे आहे. “

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart attack does not mean just chest pain read another more symptoms of heart attack and take early treatments to save life healthy lifestyle ndj