सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कामाच्या वाढत्या ताणासोबतच आजारापणाकडेही दुर्लक्ष होत आहे. खरे तर आपल्याला अनेक प्रकारचे विकार होत असतात; पण आपण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे आजार वाढत जातात. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा झटका हीदेखील एक सामान्य गोष्ट झाली आहे. आपल्या देशातील नागरिक हे हृदयविकाराबद्दल अधिक संवेदनशील आहेत. भारतात नागरिकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ५० ते १०० टक्के जास्त आहे. हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण किती आहे हे हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गमवावा लागलेल्या तरुणांच्या येणाऱ्या बातम्यांमधून दिसून येते. हृदयाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून किती व्यायाम करावा, आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असावा, आपले वजन किती असावे अशा सर्व गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही किती व्यायाम करता?

तुम्ही रोज किती व्यायाम करता हेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. तुम्ही आठवड्याला कमीत कमी १५० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. तुम्ही तुमच्या स्टेप काउंटवरही लक्ष दिले पाहिजे; जे हल्ली स्मार्टफोन आणि स्मार्टवॉचच्या मदतीने सहजपणे मोजता येतात. तुम्ही तुमच्या कामामुळे दिवसभरात ८ ते १० हजार पावले चालत असता. शारीरिक हालचाल असल्यास त्याचा हृदयावर चांगला परिणाम होतो. कारण- त्यामुळे रक्तदाब, रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉल वाढले असल्यास ते नियंत्रणात राहण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित तपासणी करणे गरजेचे असते, असे नवी दिल्ली येथील AIMS मधील कार्डिओथोरॅसिक सायसेन्स सेंटरचे डॉ. अंबुज रॉय व डॉ. बलराम भार्गव यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना सांगितले.

हेही वाचा : राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस: रक्तदानात महाराष्ट्र देशात अव्वल…महाराष्ट्रात मुंबई नंबर वन!

योग्य पदार्थांचे सेवन करावे

हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तुम्ही जर का दररोज ४०० ग्रॅम फळे आणि भाज्यांचे सेवन केले, तर ते फायदेशीर ठरते. रोजच्या खाण्यामध्ये बाजरी, मासे, मटण, प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. तसेच साखर व मीठ या पदार्थांचा वापर मर्यादितपणे करावा. प्रक्रिया केलेले म्हणजे प्रिझर्वेटिव्ह असलेले अन्न, गोड पेये जेवढे शक्य होईल तेवढे टाळा.

कंबरेचा घेर आणि वजन योग्य प्रमाणात असावे

हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तुमच्या कंबरेचा घेर आणि वजन योग्य असणे आवश्यक असते. निरोगी हृदयासाठी पुरुषांच्या कंबरेचा घेर हा ९० सेंमी व स्त्रियांच्या कंबरेचा घेर हा ८० सेंमीपेक्षा कमी असावा. तसेच कंबरेच्या घेराशिवाय तुमच्या वजनावरही नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.

तुम्ही किती वेळा धूम्रपान करता?

तंबाखूचे सेवन करणे किंवा धूम्रपान करणे अशा सवयींमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता दोन ते तीन पटींनी वाढते. दोन्हींचे सेवन करीत असल्यास ती शक्यता अधिक वाढते. मात्र जर का तुम्ही धूम्रपान सोडले असेल, तर पाच वर्षांनंतर हृदयविकाराचा धोका कमी म्हणजेच सामान्य होतो. संयमी आणि तणावमुक्त असणे हे हृदयासाठी चांगले मानले जाते. मात्र, अलीकडच्या अभ्यासांमध्ये असे दिसून आलेय की, जे दारूचे सेवन करीत नाहीत अशा लोकांनी नंतरही दारूपासून दूर राहावे. तसेच जे दारूचे सेवन करतात, त्यांनी दारूचे मर्यादित स्वरूपात सेवन केले पाहिजे.

रक्तदाब नियंत्रणात असावा

चारमधील एका वयस्कर भारतीय नागरिकाला उच्च रक्तदाब आहे; ज्याचे प्रमाण १४०/९० mmHg च्या वर आहे. उच्च रक्तदाब हा १२० mg पेक्षा कमी आणि कमी रक्तदाब 80 mmHg पर्यंत असणे आवश्यक असते. १२० mg आणि 80 mmHg हे योग्य रक्तदाबाचे प्रमाण आहे. १४०/९० mmHg पेक्षा जास्त रक्तदाब असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उपचारांची आवश्यकता असते.

हेही वाचा : सडपातळ लोकांच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त का असते? तुमचा आहार असू शकतो कारणीभूत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

तुमच्या रक्तातील साखरेची पातळी किती आहे?

पंचवीस वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे. २३६ दशलक्ष भारतीयांना मधुमेह किंवा प्री-मधुमेह असण्याचा अंदाज आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास मूत्रपिंड निकामी होणे, कमी दिसायला लागणे, असे विकार होऊ शकतात. त्यामुळे या विकारांसह अन्य आजार टाळण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण हे १०० mg/dl पेक्षा कमी आणि जेवणानंतर १४० mg/dl पेक्षा कमी असायला हवे. मधुमेह नसलेल्यांमध्ये हे प्रमाण ५.७ टक्क्यांपेक्षा कमी आणि मधुमेहावर उपचार घेत असलेल्यांमध्ये सात टक्क्यांपेक्षा कमी असावे.

नियमितपणे कोलेस्ट्रॉलची तपासणी करावी

तुम्ही तुमच्या शरीरातील वाईट आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे. एकूण कोलेस्ट्रॉल आणि चांगले कोलेस्ट्रॉल हे कायम ४.५ या पातळीच्या खाली असणे आवश्यक आहे. ज्यांना मेंदू आणि हृदयविकाराचा झटका आलेला असेल त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. तसेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी ही ७०-१०० mg/dl पेक्षा कमी असली पाहिजे.

आताच्या काळामध्ये मेडिकल टेक्नॉलॉजी आणि डायग्नोस्टिक्समध्ये झालेल्या डेव्हलपमेंटमुळे अनेक नवीन चाचण्या करतात; ज्यांच्या मदतीने हृदयविकाराबद्दल जाणून घेता येते. यामधील एक चाचणी आहे ती म्हणजे सीटी अँजिओग्राफी (CT angiography). या चाचणीच्या मदतीने हृदयाकडे होणाऱ्या रक्तप्रवाहामधील ब्लॉकेजेस शोधता येतात.

डॉ. बलराम भार्गव हे नवी दिल्ली येथील AIMS मधील कार्डियोथोरॅसिक सेंटरचे प्रमुख, आरोग्य संशोधन विभागा (आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय)चे माजी सचिव व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)चे महासंचालक आहेत. तर, डॉ. अंबुज रॉय हे नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIMS)मध्ये कार्डिओलॉजीचे प्राध्यापक आणि स्किल, ई-लर्निंग व टेलिमेडिसिन सुविधेचे प्रमुख आहेत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart health exercise blood pressure sugar smoke alcohol cholesterol heart attack diet exercise tmb 01
Show comments