Heart Tests : जगभरातील हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. भारतातही हे प्रमाण सर्वाधिक आहे. ह्रदयविकारामुळे महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जाते. पण हल्ली महिलांच्या मृत्यूमागेही ह्रदयविकार हे प्रमुख कारण ठरत आहे, पण महिलांमध्ये या आजाराची लक्षणं सहज दिसून येत नसल्याने ती ओळखण्यास अनेकदा अवघड जात आहे.

महिलांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार वेळीच ओळखून त्याच्या परिणामांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करता येऊ शकतात. यासाठी महिलांनी हृदयविकाराची तपासणी लवकरात लवकर करणे अधिक गरजेचे आहे. याच विषयावर इंडियन एक्स्प्रेसने ह्रदयविकारासंबंधित तज्ज्ञ डॉक्टरांचे मत जाणून घेतले आहे, तेच आपण पाहू.

हृदयविकाराची चाचणी केव्हा करावी?

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे कार्डिओथोरॅसिक, हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांट सर्जरीचे वरिष्ठ कंसल्टंट डॉ. मुकेश गोयल यांच्या मते, महिलांनी हृदयविकाराची चाचणी वयाच्या २० व्या वर्षी सुरू केली पाहिजे. विशेषत: ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकारासंबंधित फॅमिली हिस्ट्री असल्यास लवकरच हृदयविकाराची चाचणी केली पाहिजे, कारण तुम्ही जेवढ्या लवकर हृदयविकाराची चाचणी करता, त्यावरून डॉक्टरांना संभाव्य जोखीम घटकांचा मागोवा घेता येतो आणि आवश्यक असल्यास वेळीच उपचारही सुरू करता येतात.

यथार्थ हॉस्पिटल्समधील कार्डिओलॉजीचे सिनिअर कन्सल्टंट, डॉ. दीपंकर वत्स यांनीही हृदयविकाराची चाचणी लवकरात लवकर करण्याच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, विशेषत: लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा अकाली हृदयविकाराची फॅमिली हिस्ट्री असलेल्या महिलांनी हृदयविकाराची चाचणी लवकर करणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले की, वयाची चाळिसी ओलांडल्यानंतर महिलांना ह्रदयविकराची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो, कारण तरुण स्त्रियांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांची लक्षणे सहज दिसून येत नाहीत, ज्यामुळे आजाराचे निदान उशिरा होते आणि उपचारही उशिरा सुरू होतात.

तुम्ही वयाच्या २० व्या वर्षी हृदयरोग तपासणी सुरू केल्यास अधिक फायदा होऊ शकतो, कारण यामुळे लक्षण दिसत नसली तरी विविध आजारांचा धोका पटकन ओळखता येतो. जसे की उच्च रक्तदाब, डिस्लिपिडेमिया (असामान्य कोलेस्ट्रॉल पातळी), आणि इन्सुलिन रेझिस्टन्स आजाराची लक्षणे सहज दिसू शकतात.

डॉ. गोयल असे अधोरेखित करतात की, सुरुवातीलाच म्हणजे लहान वयात दिसणारी लक्षणे कायम राहू शकतात आणि त्यानंतर ती वाढून पुढे हृदयविकारासाठी कारणीभूत ठरू शकतात. परंतु, जीवनशैलीतील बदल किंवा औषधांसह लवकर चाचणी करत ती जोखीम तुम्ही कमी करू शकता.

डॉ. वत्स यावर जोर देतात की, लवकर चाचणी करणे का महत्त्वाचे आहे. तर याचे कारण म्हणजे, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचे परिणाम पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांसाठी अधिक गंभीर असतात. हृदयविकाराची अनेक प्रारंभिक लक्षणे ही सहज ओळखता येत नाहीत. परंतु, चाचणी करून वेळीच ओळखणे आणि त्यावर औषधोपचार सुरू करणे शक्य होते.

वयाच्या २० व्या वर्षापासून हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी चाचण्या सुरू केल्याने उच्च रक्तदाब किंवा हाय कोलेस्ट्रॉल यांसारखे आजार ओळखणे सोपे होते, ज्यामुळे स्त्रियांना कमी वयात हृदयविकार टाळता येतो. नियमित निरीक्षण, जीवनशैलीतील बदल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत तु्म्ही आयुष्यभर हृदयाचे निरोगी आरोग्य राखू शकता.