ऑफिस, शाळा, कॉलेजमधून घरी जाताना अनेकदा काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. पाणीपुरी, शेवपुरी, दही चाट, भेळ, रगडा पॅटिस आदी चाटचा कोणताही प्रकार समोर ठेवला तरी तो खाण्याची इच्छा प्रत्येकाला होते. चाट एक चवदार, स्वादिष्ट भारतीय स्ट्रीट फूड आहे आणि हा अनेकांच्या पसंतीचा आहे. पण, बरेच लोक आरोग्य आणि फिटनेस नियंत्रित ठेवण्यासाठी चाट खाणे सोडतात. कारण आहारात संतुलित आणि निरोगी दृष्टिकोन राखणे आवश्यक असते.
तुम्हाला फिटसुद्धा राहायचं आहे आणि चाटसुद्धा खायचे असेल तर पुढीलप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलेल्या काही गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर चाट खाण्याची योग्य वेळ, त्याचे फायदे आणि तोटे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पोषणतज्ज्ञ मुनमुन गणेरीवाल आणि हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ फिजिशियन सल्लागार डॉक्टर दिलीप गुडे म्हणाले की, फिटनेस जपत तुम्ही चाट खाऊ शकता. पण, त्याचा आरोग्यावर परिणाम होता कामा नये. तर यासाठी डॉक्टरांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या पाहू.
पोषणतज्ज्ञ मुनमुन गणेरीवाल यांच्या म्हणण्यानुसार भारतीय चाट हे दही, स्प्राउट्स, जिरे, हिंगसारखे पाचक मसाले, चिंच इत्यादी आरोग्यदायी घटकांपासून बनवलेले असतात. पण, बहुतेक चाट हे तळलेले असतात आणि त्यात मैदासुद्धा असू शकतो. त्यामुळे चाट खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ ही योग्य आहे ; असे त्यांनी एका इन्स्टाग्राम व्हिडीओत सांगितले.
पोषणतज्ज्ञ मुनमुन गणेरीवाल यांच्या म्हणण्यानुसार…
१. राज कचोरी, रगडा पॅटीस, छोले किंवा आलू टिक्की आदी पौष्टिक चाट पर्याय तुम्ही दुपारच्या जेवणात खाऊ शकता.
२. संध्याकाळी ५ नंतर चाट खाणे टाळा.
३. सात ते पंधरा दिवसांमधून एकदा चाट खा.
तर हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ फिजिशियन सल्लागार डॉक्टर दिलीप गुडे यांनी चवदार चाटचा आस्वाद घेताना लक्षात ठेवण्याच्या काही टिप्स शेअर केल्या आहेत.
१. पोर्शन कंट्रोल (Portion control) : चाटचा आस्वाद घेणे उत्तम आहे. पण, चाटमध्ये कॅलरी आणि फॅट्स जास्त असतील तर त्याकडे लक्ष द्या. तुम्ही चाटचे सेवन जास्त प्रमाणात तर करत नाही आहात, यावर तुमचे नियंत्रण असले पाहिजे.
२. पौष्टिक संतुलन (Nutrient balance) : चाटमध्ये अनेकदा चणे, बटाटे, दही आणि विविध मसाले आदींचा समावेश असतो. हे लक्षात ठेवून तुमच्या एकूण आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके, हेल्दी फॅट्स (चरबी), जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसह पोषक तत्त्वांचा समावेश आहे का याची एकदा खात्री करून घ्या.
३. काही प्रकारचे चाट आरोग्यदायी असू शकतात. स्प्राउट्स, भाज्या आणि दही यांसारख्या पौष्टिक घटकांचा समावेश असलेल्या चाट प्रकारांची निवड करा. जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा व ताजे आणि पौष्टिक घटक समाविष्ट असलेल्या पर्यायांवर लक्ष केंद्रित करा, असे डॉक्टर म्हणाले आहेत.
४. घरगुती चाट बनवा (Homemade chaat) : घरच्या घरी चाट बनवण्याचा एक फायदा असा होईल, तुम्ही तुमच्या सोयीनुसार यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थ वापरू शकता आणि चाटमध्ये तेल आणि मिठाचे प्रमाण कमी करू शकता.
५. मन लावून खाणे (Mindful eating) : कोणताही पदार्थ खाताना हळूवारपणे सावकाश चावून खा. तसेच जेवढी भूक असेल तितकेच खा, जास्त खाणे टाळा.
६. निरोगी जीवनशैली राखण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. तुमच्या आवडत्या चाटमध्ये वापरल्या जाणार्या कॅलरी संतुलित करण्यासाठी तुम्हाला आवडेल आणि जमेल असा व्यायाम करा.
७. हायड्रेशन (Hydration) : दिवसभर भरपूर पाणी प्या. हायड्रेटेड राहिल्याने अनावश्यक स्नॅक्सवर (Snacks) नियंत्रण ठेवता येते.
८. आवडीचे चाट खाण्याबरोबरच अधूनमधून स्वतःवर उपचार किंवा स्वतःचे चेकअप करून घ्या.
९. तुमचे शरीर कशाप्रकारे चाट किंवा इतर कोणत्याही पदार्थांना कसा प्रतिसाद देते ते पाहा आणि त्यानुसार आहारात बदल करा.
तसेच डॉक्टर दिलीप गुडे पुढे म्हणाले की, चाट आणि इतर आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेणे हा निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा एक भाग आहे. असे असले तरीही या चाट पदार्थांचे सेवन संयमाने केले पाहिजे.
(टीप : अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)