रोजच्या आहारात आपण अनेक भाज्यांचा समावेश करत असतो. यात फळभाज्यांपासून ते पालेभाज्यांपर्यंत अनेक भाज्यांचा समावेश असतो. सर्वांनाच माहीत आहे की, हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तोंडली एक लोकप्रिय भाजीचा प्रकार आहे. तसं तर कच्ची तोंडलीदेखील खाल्ली जातात. या तोंडल्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. परवलसारखी दिसणारी ही फळभाजी किंचित लहान आणि मऊ असते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आपल्याला मोठ्या आजारांशी लढण्यास मदत करतात. १०० ग्रॅम तोंडलीच्या सेवनाने तुमच्या शरीरात कोणते बदल घडून येऊ शकतात, याच विषयावर हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ जी. सुषमा यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ…
आहारतज्ज्ञ जी. सुषमा म्हणतात, “आपण तोंडलीची भाजी दररोज खात नाही, परंतु तोंडलीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तोंडलीच्या भाजीच्या चवीपेक्षाही त्यात जीवनसत्त्वाचे खनिज खूप मोठ्या प्रमाणात आहे. १०० ग्रॅम तोंडलीमध्ये सुमारे १.४ मिलीग्राम लोह, ०/०८ मिलीग्राम व्हिटॅमिन बी -२ , ०.०७ मिलीग्राम व्हिटॅमिन-बी १, १.६ ग्रॅम फायबर आणि ४० मिलीग्राम कॅल्शियम असते. तोंडलीमध्ये व्हिटॅमिन ए, बी १, बी २, सी, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम यांसारखे अनेक पोषक घटक आहेत. तोंडलीचा आकार जेवढा छोटा आहे, तेवढीच तोंडलीची भाजी चवीला खूप चविष्ट असते. तोंडली अनेक आजारांवर फायदेशीर आहे, त्यामुळे आठवड्यातून काही वेळा ते तुमच्या जेवणात समाविष्ट करण्याचे ध्येय ठेवा.”
(हे ही वाचा : तुम्ही उन्हाळ्यात रोज ताक किंवा लस्सी प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…)
तोंडली खाण्याचे फायदे
१. पचनप्रक्रिया सुधारते
तोंडलीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे ते आपली पचनप्रक्रिया सुधारते, त्यामुळे तोंडली अपल्यासाठी फायदेशीर आहे. रोज तोंडली खाल्ल्याने ॲसिडिटीची समस्या होत नाही, यामुळे आपल्या आहारात तोंडलीचा समावेश करणे खूप गरजेचे आहे.
२. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी तोंडली फायदेशीर आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हे प्रमाण वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. तोंडली खाल्ल्याने भूकेवर नियंत्रण येण्यास मदत होते.
३. हृदय राहते निरोगी
तोंडलीमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. तोंडली हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या वाढवणारे फ्री-रॅडिकल्सदेखील कमी करते. तोंडलीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आढळतात, जे अँटी-इम्फेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असतात. ते हृदयाचे संरक्षण करतात.
४. डोळ्यांसाठी फायदेशीर
यातील व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन डोळ्यांसाठी फायदेशीर आहे आणि ते मोतीबिंदूपासून संरक्षण देतात.
मधुमेहाची औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी संभाव्य परस्पर संवादामुळे मोठ्या प्रमाणात तोंडली सेवन करण्यापूर्वी आरोग्यसेवा प्रदात्याचा सल्ला घ्यावा.