ghee water on an empty stomach : भारतीय स्वयंपाकघरात तुपाचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. त्याशिवाय धार्मिक विधींमध्ये तुपाचा वापर करतात. तूप खाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आणि गुणकारी आहे. सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी नियमितपणे एक चमचा तूप खाल्यामुळे आरोग्यासह त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतील. तूप खाल्यामुळे शरीराला आतून पोषण मिळते. आयुर्वेदामध्ये तुपाला अमृतासमान मानले जाते. डॉक्टरांकडे गेल्यानंतरसुद्धा निरोगी आरोग्यासाठी तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तुम्हाला माहितीये का, रोज रिकाम्या पोटी पाण्यात तूप टाकून प्यायल्यास काय होते? चला जाणून घेऊयात. या संदर्भात मुंबईच्या जिनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे आहारतज्ज्ञ जिनल पटेल आणि हैदराबाद येथील ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलचे मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. बिराली स्वेथा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
मुंबईच्या जिनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी सांगितले की, तुपाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या जसे की गॅस, अपचन, सूज येणे किंवा बद्धकोष्ठता सुधारण्यास मदत होते. “वजन कमी करणाऱ्यांमध्ये तूप खूप लोकप्रिय आहे. त्वचेसह प्रतिकारशक्ती आणि ऊर्जा वाढविण्यासाठीही तूप महत्त्वाचे आहे. तूप फायदेशीर असले तरी ते माफक प्रमाणात घ्या,”असा सावधगिरीचा सल्लाही आहारतज्ज्ञ पटेल यांनी दिला आहे.
हैदराबाद येथील ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलचे मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. बिराली स्वेथा सांगतात की, रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत तूप सेवन करणे ही एक लोकप्रिय आयुर्वेदिक पद्धत आहे आणि त्याचे वैज्ञानिक पुरावेही आहेत.
पचनक्रिया सुधारते
पारंपरिकपणे तूपसेवनामुळे पचन सुधारते, आतड्यांचे आरोग्य वाढवते आणि नियमित आतड्यांसंबंधीच्या हालचालींना समर्थन देते, असे मानले जाते; मुख्यत्वे तुपातील ब्युटीरिक अॅसिड आणि निरोगी चरबीमुळे. ब्युटीरिक अॅसिड आतड्याच्या पेशींना समर्थन देण्यासाठी ओळखले जाते आणि ते दाहकविरोधी फायदे देऊ शकते. तर क्लिनिकल संशोधनानुसार, कोमट पाण्यासोबत तूप सेवन केल्याने पचनशक्ती वाढवते किंवा रिकाम्या पोटी सेवन केल्यास ते फायदेशीर ठरते. तसेच, तुपामध्ये संतृप्त चरबी असते, ज्याचे सेवन काळजीपूर्वक केले पाहिजे; विशेषत: उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीची चिंता असलेल्या व्यक्तींनी. कारण- तुपाच्या अतिसेवनामुळे वजन वाढू शकते. थोडक्यात कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
हाडे मजबूत होतात
कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्याशिवाय यामध्ये असलेले गुणधर्म हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. त्यामधील कॅल्शियम हाडे निरोगी ठेवते. तसेच ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांपासून संरक्षण होते. तुपाचे सेवन केल्यामुळे जळजळ कमी होते. त्यामुळे कोमट पाण्यात तूप टाकून प्यावे.
त्वचेसाठी फायदेशीर
कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. तुपामध्ये असलेले गुणधर्म त्वचेला आतून पोषण देण्यासाठी मदत करतात. त्याशिवाय नियमित सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात तूप टाकून प्यावे. त्यामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देण्याचे काम करतात. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन, त्वचा चमकदार आणि उजळ दिसते. त्यामुळे नियमित तुपाच्या पाण्याचे सेवन करावे.
रिकाम्या पोटी तुपाचे सेवन कसे करावे?
तुपाचे सेवन शरीराला फायदेशीर असले तरी ते प्रमाणाबाहेर खाणे नुकसानदायक ठरू शकते. एक टीस्पून तूप हे सकाळी खाता येऊ शकते. काही जण काळी मिरपूड टाकूनही तुपाचे सेवन करतात. त्यामुळे आम्लपित्ताच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. त्याशिवाय कोमट पाण्यात एक चमचा तूप घालून प्यायल्याससुद्धा पचनास मदत मिळू शकते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे; यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)