Acidity Treatment : अ‍ॅसिडिटी ही अनेकांना सातत्याने जाणवणारी एक समस्या आहे. पोटात गॅस्ट्रिक ग्लँड अ‍ॅसिडचे उत्पादन वाढल्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरू होतो. ज्यामुळे अपचन, छातीत जळजळणे, अन्ननलिकेत वेदना, पोटात अल्सर व जळजळ अशी लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं फारच त्रासदायक असतात, ज्यामुळे कामात मन लागत नाही. अशा वेळी अ‍ॅसिडिटीचा त्रास रोखण्यासाठी दर वेळी तुम्हीदेखील अँटासिड घेत असाल, तर ही सवय आजच थांबवा. कारण- त्यामुळे तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होत असतात. हे परिणाम नेमके काय? आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास रोखायचा कसा, यावर डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊ…

आम्लपित्त म्हणजेच अ‍ॅसिडिटीचा त्रास का होतो?

युटोपियन ड्रिंक्सच्या मुख्य आहार तज्ज्ञ डॉ. नंदिनी सरवटे यांनी सांगितले की, मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ, कॅफिन व अल्कोहोल, अधिक खाणं, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, धूम्रपान, ताण यांसारख्या अनेक कारणांमुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. अ‍ॅसिडिटीशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.

जेवणानंतर लगेच झोपल्याने त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पोटातील अन्न अन्ननलिकेत जाऊ शकते, ज्यामुळे छातीत जळजळ, अपचन, बद्धकोष्ठता व गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स रोग (GERD) यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

अ‍ॅसिडिटीचा त्रास झाल्यास अँटासिड घ्यावी का?

अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळावा म्हणून अँटासिड घेतल्याने तत्काळ आराम मिळू शकतो. परंतु, हे समजून घेणे आवश्यक आहे की, हा दीर्घकालीन उपाय असू शकत नाही. तुम्हाला त्यामुळे तात्पुरत्या प्रमाणात बरं वाटेल. त्याबाबत आहारतज्ज्ञ व डायबिटीज एज्युकेटर कनिका मल्होत्रा म्हणाल्या की, अँटासिड्स पोटातील आम्ल (अ‍ॅसिड) तात्पुरत्या प्रमाणात निष्क्रिय करते, ज्यामुळे छातीत जळजळणे व अस्वस्थता यांसारख्या लक्षणांपासून तात्पुरता आराम मिळतो. पण, अ‍ॅसिडिटी होण्यामागच्या मूळ कारणांवर आपण लक्ष देत नाही. या कारणांमध्ये आहाराबाबतच्या चुकीच्या सवयी, ताण, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स रोग (GERD) किंवा पेप्टिक अल्सर यासारखे गॅस्ट्रोइंटेस्टायनल विकार यांचा समावेश आहे,.

आहारतज्ज्ञ व डायबिटीज एज्युकेटर कनिका मल्होत्रा यांनी पुढे सांगितले की, अ‍ॅसिडिटी झाल्यानंतर तुम्ही दर वेळी अँटासिड्सवर अवलंबून राहत असाल, तर त्याचे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात, ज्यामध्ये रिबाउंड अ‍ॅसिडिटी व संभाव्य पोषक घटकांचा अभाव या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे लक्षणे ओळखून तुम्ही जीवनशैलीतील बदल करणे आणि संतुलित आहार वेळेवर घेणे गरजेचे आहे. अ‍ॅसिडचे उत्पादन कमी करणाऱ्या योग्य औषधांद्वारे तुम्ही अ‍ॅसिडिटीची मूळ कारणे ओळखून, त्यावर उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

अ‍ॅसिटीडिटीचा त्रास रोखण्यासाठी काय उपाय करावेत?

दिल्लीच्या अपोलो स्पेक्ट्राच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रीती जैन म्हणाल्या की, पचनक्रिया सुधारण्यासाठी झोपण्यापूर्वी दोन ते तीन तास ​​आधी जेवा. जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी थोडे चाला. या सकारात्मक सवयींमुळे तुम्हाला पोटफुगी, गॅस व गॅस्ट्रोइंटेस्टायनल (GI) त्रासांपासून कमी-अधिक प्रमाणात आराम मिळेल.

Story img Loader