High Blood Sugar Treatment : मधुमेह किंवा रक्तातील साखरेची पातळी वाढणे हे खरंतर आरोग्यासाठी फारच धोकादायक आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने प्री-डायबेटिक किंवा मधुमेह यांसारखी लक्षणं दिसू लागतात, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी सतत नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं असतं. अशात तुमच्या रक्तातील साखरेची पातळी ३७० मिलीग्राम/डीएल किंवा त्याहून अधिक वाढल्यास हे आरोग्यासाठी फार धोकादायक मानले जाते. अशावेळी तातडीने काळजी घेण्याची गरज असते.

रक्तातील साखरेची उच्च पातळी हे मधुमेह नियंत्रणात नसल्याचे एक संकेत असू शकते. परंतु, ही आरोग्यस्थिती काहींसाठी जीवघेणी ठरू शकते. यात जर तुम्हाला थकलेले, गोंधळलेले किंवा मळमळ जाणवत असेल तर स्ट्रोक, डायबेटिक केटोअ‍ॅसिडोसिस (डीकेए) यांसारख्या आजारांचा धोका वाढतो, असे परेलमधील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सचे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे वरिष्ठ सल्लागार आणि थोरॅसिक सर्जन डॉ. स्वरूप स्वराज पाल म्हणाले.

रक्तातील साखरेची पातळी उच्च राहिल्यास त्याचा तुमचे डोळे, मूत्रपिंड आणि हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनचे प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंगला म्हणाले की, २५० मिलीग्राम/डीएलपेक्षा जास्त पातळीमुळे हायपरग्लाइसेमिया होऊ शकतो, अशावेळी तातडीने डॉक्टरांच्या उपचारांची आवश्यकता असते. तसेच ही पातळी ३०० मिलीग्राम/डीएलपेक्षा जास्त वाढल्यास डायबेटिक केटोअ‍ॅसिडोसिस होऊ शकतो, पण ही एक संभाव्य जीवघेणी स्थिती आहे.

हृदयासंबंधित आजार असलेल्या रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, अशाने अकाली हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे डॉ. पाल म्हणाले.

पण, रक्तातील साखरेची पातळी वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. यावर डॉ. पाल पुढे म्हणाले की, अधिक ताण, वेळेवर औषधे न घेणे, संसर्ग होणे किंवा चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

औषधांच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येऊ शकते. पण दीर्घकालीन नियंत्रणासाठी, चांगल्या परिणामांसाठी निरोगी सवयी आणि जीवनशैली आवश्यक आहे. यासाठी संतुलित आहार घेणे, दररोज चालणे, चांगली झोप घेणे आणि तणाव पातळीचे व्यवस्थापन करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असे डॉ. पाल यांनी सुचवले.

अशा परिस्थितीत पहिले पाऊल म्हणजे हायड्रेटेड राहणे. भरपूर पाणी प्यायल्याने मूत्रमार्गे अतिरिक्त ग्लुकोज बाहेर काढण्यास मदत होते. मूत्रातील केटोन्सचे निरीक्षण करण्यासाठी तुम्ही युरिन केटोन टेस्ट करणे महत्त्वाचे आहे. मूत्रातील केटोन्सच्या पातळीवरून डायबेटिक केटोअ‍ॅसिडोसिसची सुरुवातीची लक्षण ओळखता येतात, अशावेळी व्यक्तीने ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी, असे डॉ. सिंघला म्हणाले.

जर तुम्ही मधुमेहावर विविध प्रकारच्या औषधांचे सेवन करत असाल तर ठराविक अंतराने डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने मधुमेहाची स्थिती जाणून घेत औषधाच्या प्रकारात बदल करणे आवश्यक आहे, असेही डॉ. सिंघला यांनी नमूद केले.

जर तुम्ही इन्सुलिन वापरत असाल तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा त्यांच्या आपत्कालीन सल्ल्याचे पालन करावे. हायड्रेटेड रहा, पुरेसे पाणी प्या; परंतु साखरयुक्त पेयांचे मर्यादित सेवन करण्याचा प्रयत्न करा.

डॉक्टरांच्या उपचारानंतर गंभीर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा डॉक्टरांना भेटून औषध आणि कोणते उपचार घेणं आवश्यक आहे याविषयी सल्ला घ्या, असे डॉ. पाल म्हणाले.

काय लक्षात घ्यावे?

जर योग्य उपचार घेऊनही रक्तातील साखरेची पातळी ३७० mg/dL पेक्षा जास्त राहिली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. अशा परिस्थितीत रुग्णास इन्सुलिन किंवा औषधोपचारांची मोठी गरज असते,” असे डॉ. सिंघला म्हणाले.

याव्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीला जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, अंधूक दृष्टी किंवा तीव्र पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवत असतील तर त्यांनीही विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा तुम्हाला गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो, असेही डॉ. सिंघला पुढे म्हणाले.

जर रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल तर नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधे घ्या आणि नियमितपणे डायबेटिकची तपासणी करा.