High Uric Acid Pain Areas In Body: युरिक ऍसिड हे शरीरातील टाकाऊ घटकांपैकी एक आहे. जेव्हा शरीरातील प्युरीनचे प्रमाण वाढते तेव्हा किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. किडनीचे फिल्टर हळूहळू काम करणे थांबवून शरीरात युरिक ऍसिड पसरू लागते. युरिक ऍसिड जेव्हा रक्तात मिसळते तेव्हा त्यातून हृदय, मेंदू, किडनी एकूणच शरीरावर वाईट परिणाम होतो. युरिक ऍसिड वाढणे हे मुख्यतः असंतुलित आहार, खराब जीवनशैली, अतिवजन, अनुवंशिकता याचा परिणाम आहे. युरिक ऍसिड वाढताच सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, सूज व हालचालीत वेदना होणे हे त्रास सुद्धा वाढू लागतात. युरिक ऍसिड वाढल्याने शरीरात नेमक्या कुठे वेदना होतात हे आज आपण पाहणार आहोत..
युरिक ऍसिड वाढल्यास ‘या’ अवयवांना होतात वेदना (High Uric Acid Pain Areas In Body)
मान दुखी (Neck Pain)
शरीरात युरिक ऍसिड वाढल्यास तुम्हाला सर्वाधिक वेदना मानेत जाणवू शकतात. मानेतील स्नायु कडक झाल्याने मान दुखी सुरु होते, काहीवेळा या वेदना इतक्या अधिक होतात की तुम्हाला मान वळवण्यातही त्रास होऊ शकतो. अशावेळी तुम्ही कोणतीही औषधे स्वतः घेण्यापेक्षा वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसेच तुमच्या झोपण्याची पद्धतही बदलून पाहा. मानेखाली फार उंच उशी घेऊ नका.
पाठ व कंबरदुखी (Back Pain)
युरिक ऍसिड वाढल्यास पाठीच्या मध्यभागी व कंबरेच्या दोन्ही बाजूंना वेदना जाणवू शकतात. अनेकदा तुमच्या बैठ्या जीवनशैलीमुळे सुद्धा या वेदना होतात. पण तुम्हाला वारंवार हा त्रास होत असल्यास हे युरिक ऍसिड वाढल्याचे लक्षण असू शकते. तुमच्या शरीराच्या सांध्यांना विशेष दुखणी जाणवू शकतात.
पायाच्या घोट्यांना वेदना (Ankle Pain)
शरीरात युरिक ऍसिड वाढल्यास हाडांमध्ये छोट्या क्रिस्टलच्या रूपात खडे तयार होऊ लागतात. यामुळे सांधेदुखी सुरु होते. विशेषतः हे क्रिस्टल्स पायाच्या घोट्यांच्या हाडांमध्ये जमा झाल्याने चालताना वेदना होऊ शकतात. तुमचे पाय सतत सुजत असतील तर हे सुद्धा शरीरात युरिक ऍसिड वाढल्याचे लक्षण असू शकते.
हे ही वाचा << किडनी स्टोन झाल्यास शरीरात सर्वात आधी दिसतात ‘ही’ लक्षणे; नेमका धोका कशाने वाढतो?
महत्त्वाची बाब म्हणजे युरिक ऍसिड वाढल्याचा सर्वात मोठा परिणाम हा किडनीवर होत असतो. त्यामुळे वर नमूद केलेल्या वेदना या किडनीच्या बिघाडाचे सुद्धा लक्षण असू शकतात. तुम्हाला अशावेळी त्वरित आहारात व जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे सर्वात सुज्ञपणाचे ठरेल.