Hina Khan’s Ramadan Tip: केमोथेरपी पूर्ण केल्यानंतर सध्या इम्युनोथेरपी घेत असलेल्या हीना खानने अलीकडेच रमजानच्या महिन्यात उपवास करणाऱ्या तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना सल्ला दिला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले होते, “अॅसिडिटी टाळण्यासाठी शक्य असल्यास एका अजवा खजूरने सेहरीची (सूर्योदयापूर्वी जेवण करणे) सुरुवात करावी.” अजवा खजूर (Ajwa Dates) हा सौदी अरेबियामध्ये पिकवीलेल्या खजुराचा एक खास प्रकार आहे, जो अत्यंत पौष्टिक मानला जातो. (Hina Khan suggested who is fasting during Ramadan eat one Ajwa date to avoid acidity really is it beneficial for health experts weigh in)
याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी माहिती जाणून घेतली. आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा (Kanikka Malhotra) सांगतात, “अजवा खजुराने ‘सेहरी’ सुरू करणे उपवास सुरू करण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो; पण अॅसिडिटीसाठी हा जादूचा उपाय नाही.” त्या पुढे सांगतात, “खजूर हे पोटातील अॅसिड निष्क्रिय करून, पचनासाठी फायदेशीर असे फायबर शरीराला पुरवतात आणि पोटाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. संतुलित जेवणाचा भाग म्हणून ते चांगले कार्य करतात.”
हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर दिलीप गुडे सांगतात की, सुमारे १६ तास किंवा त्याहून अधिक उपवास केल्यानंतर आणि एक थेंबही पाणी न प्यायल्यानं शरीर फ्लाइट मोडवर जाते.
डॉ. गुडे सांगतात, “पोटात भरपूर अॅसिड तयार होते, त्यावेळी अॅसिडिटी वाढते. जास्त वजन असलेल्या लोकांना हायटस हर्नियाचा त्रास होतो. हायटस हर्नियामुळे छातीत जळजळ, अन्न गिळायला त्रास, पोटात दुखणे, ढेकर येणे व अपचन यांसारखी लक्षणे जाणवू शकतात आणि त्यामुळे अॅसिडिटी वाढते. अॅसिडिटीच्या बाबतीत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. खजूर खाल्ल्याने हायपोग्लायसेमिया म्हणजेच रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत मिळू शकते. पण, अॅसिडिटीवरील उपचाराचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पोटात साचलेल्या अॅसिडिटीला निष्क्रिय करण्यासाठी ताक प्यावे.”
अॅसिडिटी कमी करण्यासाठी, धान्यांसारखे कार्ब्स, अंडी, टोफू किंवा दही यांसारख्या चांगल्या प्रोटीन्सचे स्रोत आणि सुक्या मेव्यातील चांगल्या फॅट्सवर लक्ष केंद्रित करा, असे मल्होत्रा सांगतात. सोया, ब्रोकोली, चीज इत्यादी पदार्थदेखील फायदेशीर ठरू शकतात, असे डॉ. गुडे सांगतात.
“ज्यांना आधीच एसोफॅगिटिसचा त्रास आणि पोटाचा अल्सर व ड्युओडेनल अल्सर आहेत, त्यांनी ओमेप्राझोल, पॅन्टोप्राझोल इत्यादी प्रोटॉन पंप इनहिबिटर यांसारखी औषधे घ्यावीत. पोटातील अॅसिड कमी करण्यासाठी ही औषधे फायदेशीर ठरू शकतात. तसेच, ऑक्सेटाकेनसह सुक्राल्फेट (Sucralfate+oxetacaine) चा वापर पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल अल्सरवर उपचार करण्यासाठी केला जातो.”, डॉ. गुडे पुढे सांगतात.
मसालेदार, तेलकट पदार्थ, कार्बोनेटेड पेये व जास्त कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. कारण- यामुळे पित्ताचा त्रास वाढू शकतो, असे मल्होत्रा सांगतात. “भरपूर पाणी पिण्यास विसरू नका. एकाच वेळी पाणी पिण्याऐवजी सतत थोडे थोडे पाणी प्या. हळूहळू खा. फक्त एक खजूर नाही, तर संपूर्ण सेहरी तुम्हाला उपवासासाठी ऊर्जा देऊ शकते”, असे मल्होत्रा सांगतात.