Homemade Cough Syrups : तुम्हाला सर्दी, खोकला किंवा हवामानात बदल होताच संसर्ग होत असेल, तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकार शक्ती खूपच कमकुवत झाली आहे. साहजिकच खोकल्यामुळे तुमच्या दैनंदिन कामावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय सारखा खोकला होतो किंवा संसर्ग होतो म्हणून त्यासाठी तुम्ही सारखी औषधे घेत असाल, तर त्यामुळेही शरीरावर विविध दुष्परिणाम होऊ शकतात. अशा वेळी तुम्हाला औषधांपेक्षा घरगुती उपायांची जास्त गरज असते; ज्यांचे अॅलोपॅथिक औषधांप्रमाणे दुष्परिणाम नसतात. त्यामुळे तुम्ही सर्दी आणि खोकल्यासाठी अनेक घरगुती उपाय करून पाहू शकता. अलीकडेच मास्टर शेफ नेहा दीपक शाह यांनी अलीकडेच संत्र आणि स्वयंपाकघरातील काही गरम मसाल्यांच्या आधारे बनवलेले घरगुती कफ सिरपचं सेवन केलं आणि त्यानंतर त्यांना चांगला आराम मिळत असल्याचा अनुभव शेअर केला. “गेल्या आठवड्यात मला फारसं बरं वाटत नव्हतं आणि मी घरी हे सिरप तयार करून, त्याचं सेवन केलं. त्यामुळे मला त्वरित बरं होण्यास मदत झाली,” असं त्यांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीच्या सी. के. बिर्ला हॉस्पिटलचे मुख्य सल्लागार डॉ. नरेंद्र सिंगला यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. नरेंद्र सिंगला म्हणाले की, हळद आणि इतर मसाल्यांसोबत बनविलेला संत्र्याचा रस हा खोकल्यासाठी प्रभावी नैसर्गिक उपाय असू शकतो. “हळदीमध्ये कर्क्युमिन असतं. त्यात एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स आणि दाहकविरोधी गुणधर्म असलेले एक संयुग असतं, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतं. संत्र्याच्या रसातील रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे व्हिटॅमिन सी त्यासोबत असल्यास हळद घशाची जळजळ कमी करण्यास आणि संसर्गाशी लढण्यास मदत करते. खोकल्याची लक्षणे दूर करते,” असे डॉ. सिंगला म्हणाले. ते पुढे म्हणाले की, त्या सिरपमध्ये तुम्ही आलेसुद्धा टाकू शकता. आल्यामध्ये नैसर्गिक दाहकविरोधी गुणधर्म आहेत, जे जळजळ होण्यापासून आराम देतात आणि घसा शांत करतात. या सिरपमध्ये गरम मसाल्याचे प्रमाण चव आणि संवेदनशीलतेनुसार ठरवा. या पेयाचं गरमागरम सेवन करा, असे डॉ. सिंगला यांनी सुचवले.

कसं बनवायचं घरच्या घरी खोकल्याचं सिरप

साहित्य

१ संत्रे
१ टीस्पून – मीठ
१/२ टीस्पून – हळद
काळी मिरी एक चिमूटभर
चिमूटभर दालचिनी
मध

कृती

अख्ख्या संत्र्याचा फक्त वरचा भाग कापून घ्या. आता त्याच्या आतली थोडी संत्री काढा आणि त्यामध्ये हळद, काळी मिरी व मीठ घाला. आता हे संत्र गॅसवर ठेवा आणि सुरुवातीला संत्र्याचा कापलेला वरचा भाग संत्र्यावर ठेवून, ते झाकून ठेवा. आता चमच्यानं संत्र्याच्या आतला रस हलवत राहा. आता गॅस बंद करा आणि संत्र्याच्या आतमध्ये तयार झालेलं सिरप एकेक चमचा दिवसातून दोन ते तीन वेळा घ्या.

हेही वाचा >> मुंबई पुण्यात तुम्हीही उंच इमारतीत राहता का? मग डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती एकदा वाचा

दरम्यान, मुंबईच्या झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी सांगितले, ”हे सिरप प्रत्येकालाच फायदेशीर ठरेल, असं नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्याचं सेवन करणं गरजेचं आहे. काहींना या सिरपचा फायदा होईल; तर काहींचा खोकला आणि लक्षणे आणखी वाढू शकतात. संत्री हे लिंबूवर्गीय फळ आहे आणि त्यामध्ये सामान्यतः आम्लता जास्त असते. सतत खोकला असताना संत्री खाल्ल्यानं घशात जळजळ होऊ शकते आणि संवेदनशीलता वाढते. मग त्यामुळे बरे होणे कठीण होते. संत्र्यामध्ये काळी मिरी आणि दालचिनीसारखे गरम मसाले टाकल्याने तुमचा खोकला वाढू शकतो. त्यामुळे हे जास्त प्रमाणात किंवा वारंवार खाल्ल्यास जळजळ होऊ शकते. हळद व मधाची त्यांच्या आरोग्याच्या फायद्यांच्या श्रेणीसाठी अनेकदा प्रशंसा केली जाते आणि त्यामुळे हे पदार्थ खोकल्याशी लढण्यासाठी योग्य आहेत. पण जेव्हा हे घटक आम्लयुक्त आणि काळी मिरी यांसारख्या गरम मसाल्यांसोबत एकत्र केले जातात, तेव्हा ते प्रत्येकासाठी योग्य असेल, असे नाही.”

त्यामुळे खोकला कायम राहिल्यास किंवा कालांतराने तीव्र होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. हळद आणि मसाल्यांसोबत संत्र्याचा रस हा खात्रीशीर उपचार नसला तरी, “हा तुमच्या हलक्या खोकल्याला आराम आणि संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. सततच्या खोकल्याच्या उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.“

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homemade cough syrups chef neha deepak shahs homemade cough syrup is easy to make but experts are divided over its effectiveness srk