बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि प्रदूषित वातावरण यांमुळे केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. केस पांढरे होणे आजकाल सामान्य झाले आहे. आपल्यापैकी बरेच जण केस पांढरे होण्याच्या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी इंटरनेटवर उपाय शोधत असतात. अशा वेळी काही जण आवळा, भृंगराज पावडर, खोबरेल तेलासह अनेक उपाय सुचवतात; पण त्यामुळे अकाली केस पांढरे किंवा राखाडी होण्याची समस्या खरेच दूर होते का? या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना खारमधील नानावटी मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील त्वचारोग तज्ज्ञ व ट्रायकोलॉजिस्ट डॉ. वंदना पंजाबी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, हेअरमीगुड या इन्स्टाग्राम पेजवरून भावना मेहरा या युजर्सने केस पांढरे आणि राखाडी होण्याच्या समस्यावर एक हेअर पॅक सुचवला आहे; तसेच तो वापरायचा कसा याबाबतही माहिती दिली आहे.

केस पांढरे आणि राखाडी न होण्यासाठी हेअर पॅक

१) भृंगराज पावडर – २ टीस्पून
२) आवळा पावडर – १ टीस्पून
३) तांदळाचे पाणी किंवा रोझमेरी
४) खोबरेल तेल – १ टीस्पून

हेअर पॅक वापरण्याची पद्धत

१) सर्व साहित्य आवश्यक प्रमाणात घेऊन मिक्स करा.
२) केस धुण्याच्या एक तास आधी हा हेअर पॅक वापरा. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा तो केसांवर वापरा.

मेहरा यांच्या म्हणण्यानुसार- हा हेअर पॅक नियमित वापरल्यास तुम्ही केस पांढरे किंवा राखाडी होण्याची समस्या रोखू शकता.

हेही वाचा – इंजेक्शन हातावर किंवा कंबरेवरच का दिले जाते? इंजेक्शनचे प्रकार कोणते? जाणून घ्या डॉक्टरांकडून….

केस पांढेर किंवा राखाडी कशामुळे होतात?

अॅनाजेन (केसांच्या वाढीचा टप्पा) दरम्यान मेलानोसाइट्सच्या संख्येत लक्षणीय घट होते; ज्यामुळे केसांच्या वाढीतील रंगद्रव्य कमी होते. अशाने केस पांढरे किंवा राखाडी दिसू लागतात. असे खारमधील नानावटी मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील त्वचारोग तज्ज्ञ व ट्रायकोलॉजिस्ट डॉ. वंदना पंजाबी म्हणाल्या.

केस पांढरे होणे याला ‘कॅनिटीज’ किंवा ‘ऍक्रोमोट्रिचिया’ असेही म्हणतात. जर हे वय २५ वर्ष पूर्ण होण्याआधीच होत असेल, तर त्याला अकाली केस पांढरे होणे असे म्हणतात, असेही डॉ पंजाबी म्हणाल्या.

केस अकाली पांढरे किंवा राखाडी होण्यामागची कारणे काय?

अल्ट्राव्हायोलेट (UV) किरण, प्रदूषण, शारीरिक बदल, मद्यपान, धूम्रपान आणि जुनाट आजार यांचा परिणाम म्हणून ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण होतो; जो केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरू शकतो.

व्हिटॅमिन बी 12 आणि डी 3, कॉपर, लोह व कॅल्शियमची कमतरता, थायरॉईड , केमोथेरप्युटिक औषधे, बैठी जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यांसारख्या इतर कारणांमुळे केस अकाली पांढरे होतात, असे डॉ. पंजाबी यांनी नमूद केले.

केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येवर वरील हेअर पॅक उपयुक्त ठरतो का?

आवळा, भृंगराज पावडर, खोबरेल तेलासह काही घटक मिक्स करून बनवलेला हेअर पॅक केसांच्या आरोग्यासाठी चांगला असतो. तसेच केसांचा रंग टिकवून ठेवण्यातही त्यातील प्रत्येक घटक अद्वितीय गुणधर्म प्रदान करतात, असे द अॅस्थेटिक क्लिनिक्स स्किन स्पेशालिस्ट, कॉस्मेटिक स्किन-सर्जन डॉ. रिंकी कपूर यांनी सांगितले. त्यातील भृंगराज; ज्याला आयुर्वेदात ‘औषधींचा राजा’ म्हणून ओळखले जाते; जे केसांच्या वाढीस मदत करते. ते केस अकाली पांढरे होण्यापासून रोखते आणि केसांच्या मुळांना पोषण देते, याशिवाय टाळूमध्ये रक्तप्रवाहाचे कार्य सुधारते, असेही डॉ. कपूर म्हणाल्या.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे सर्वाधिक प्रमाण आहे; जे कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते आणि केस मजबूत करते. त्याचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह तणाव टाळण्यास मदत करु शकते; ज्यामुळे केस अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येपासून दूर राहता येते.

रोझमेरी तेलाचा वापर अनेकदा रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, केसांच्या मुळांचे पोषण वाढवण्यासाठी आणि केस पातळ होण्यापासून रोखण्यासाठी केला जातो. त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म मुक्त रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करू शकतात, असे डॉ. कपूर म्हणाल्या.

डॉ. कपूर यांच्या मते, तांदळाच्या पाण्यात केसांच्या वाढीस प्रोत्साहन देणारे अनेक नैसर्गिक घटक आहेत. त्यातील इनोसिटॉल, कर्बोदके खराब झालेले केस मजबूत आणि दुरुस्त करण्यास मदत करतात. तांदळाच्या पाण्यातील अॅमिनो अॅसिड केस आणि टाळूचे पोषण करू शकतात.

खोबरेल तेल हे एक लोकप्रिय नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे; जे केसांमधील प्रथिने कमी होण्यास प्रतिबंध करते, केस मजबूत आणि निरोगी ठेवते. त्यामुळे पर्यावरणीय घटकांमुळे होणारे नुकसानही कमी होऊ शकते, असे डॉ. कपूर म्हणाल्या.

डॉ. कपूर म्हणाल्या की, वरील हेअर पॅक नियमितपणे वापरल्याने केसांना योग्य पोषण मिळू शकते, केस मजबूत होतात आणि अकाली पांढरे होण्याची शक्यता कमी होत; ज्यामुळे केस चमकदार आणि दाट होतात.

डॉ. पंजाबी यांच्या मते, वैज्ञानिक पुराव्यांवरून हे सिद्ध होते की, केस अकाली पांढरे होण्यामागील प्राथमिक कारण प्रामुख्याने आनुवंशिक असले तरी इतर परिस्थितीही यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे कोणतेही तेल किंवा हेअर पॅक वापरण्यापूर्वी हेअर एक्स्पर्ट किंवा स्किन स्पेशलिस्टचा सल्ला घ्या. त्यानंतर केसांवर विविध उपाय ट्राय करा.

यावर डॉ. कपूर यांनी असेही सांगितले की, प्रत्येकाच्या केसांची रचना आणि उपचारांना प्रतिसाद देण्याची क्षमता भिन्न असू शकते. त्यामुळे योग्य हेअर एक्स्पर्ट किंवा स्किन स्पेशलिस्टचा सल्ला घेऊन मगच उपाय करा. त्याशिवाय संतुलित आहार आणि केसांची योग्य निगा राखा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homemade diy ayurvedic hair masks amla bhringraj coconut oil rice water effective for premature greying hair white hair sjr