हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) कंपनीची हॉर्लिक्स, बुस्ट यासारखे अनेक उत्पादने बाजारात आहेत. या उत्पादनांना आता ‘आरोग्यदायी पेय’ या श्रेणीतून कंपनीने बाहेर काढले आहे. ही पेये यापुढे फंक्शनल न्युट्रिशनल ड्रिंक्स’ या श्रेणीत मोडले जाणार आहेत. त्यांच्या नावापुढील ‘आरोग्यदायी’ असा उल्लेख सरकारच्या आदेशानंतर काढून टाकण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने इ कॉमर्स कंपन्यांना निर्देश दिले होते की, त्यांच्या साइट्सवरून कोणतीही सामान्य पेये ही ‘आरोग्यदायी’ पेये म्हणून विकू नयेत. त्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हरने हा निर्णय घेतला.
हिंदुस्तान युनिलिव्हरचे मुख्य वित्तीय अधिकारी रितेश तिवारी यांनी २४ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले, या बदलामुळे आता सदर उत्पादनाचे अधिक अचूक आणि पारदर्शक वर्ण करणे सोपे होणार आहे.
‘आरोग्यदायी’ लेबल लावून विकता येणार नाहीत चवदार पेये?
फंक्शनल न्युट्रिशनल ड्रिंक्स म्हणजे काय?
कंपनीच्या मतानुसार फंक्शनल न्युट्रिशनल ड्रिंक्स (FND) म्हणजे प्रोटीन आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढणारे पेये. एफएनडी हे अल्कोहोल विरहीत पेय म्हणून ओळखले जाऊ शकते. ज्यामध्ये वनस्पती, प्राणी, सागरी किंवा सूक्ष्मजीव स्त्रोतामधील बायोॲक्टिव्ह घटकांचा वापर केला गेला आहे. यामुळे आरोग्यास अतिरिक्त फायदे मिळतात.
हा बदल करण्यामागे कारण काय?
सोशल मीडियावर आरोग्याशी संबंधित व्हिडिओ तयार करणाऱ्या एका व्यक्तीने हॉर्लिक्स, बोर्नव्हिटा सारख्या पेयामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे असे पेय मुलांना देणे अयोग्य असल्याचा मुद्दा या व्हिडिओत मांडण्यात आला होता. कोट्यवधी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स म्हणजेच एनसीपीसीआरने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस पाठवून ही पेये खरोखरच आरोग्यासाठी उपयुक्त आहेत का? असा प्रश्न विचारला होता.
या व्हायरल व्हिडिओनंतर माल्ट-आधारित पेयांच्या आरोग्य फायद्यांवर जोरदार चर्चा सुरू झाली. हिंदुस्तान युनिलिव्हरसारख्या माल्ट-आधारित पेयांसाठी आघाडीवर असलेल्या कंपनीनेही सांगितले की ते तांत्रिक गरजा आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार साखरेचा वापर जबाबदारीने करतात. मात्र बालरोगतज्ज्ञांनी कंपन्यांचे दावे खोडून काढत या पेयामधील अतिरिक्त साखर मुलांच्या आरोग्यास अयोग्य असल्याचे सिद्ध केले.