पावसाळ्यात काही जणांच्या, विशेषतः वात व कफ प्रकृतीच्या शरीरामध्ये शीतत्व म्हणजे थंडावा वाढतो. पावसाळ्यामध्ये वेगाने वाहणारे गार वारे, पाण्याचा वर्षाव, हवेतला ओलावा या कारणांमुळे शरीरामध्ये थंडी वाढते, जी अनेक तक्रारींना कारणीभूत होते. पोटात थंडी झाल्याने होणारी पोटफुगी-पोटदुखी-अपचन-जुलाब, सर्दी-खोकला-थंडीताप-दमा हे श्वसनविकार व सांधे धरणे-आखडणे,स्नायूंमध्ये पेटके येणे, पाठदुखी-कंबरदुखी, खांदा धरणे, हाताची बोटे वळणे, टाच दुखणे, वगैरे तक्रारींमागे थंडी हे मूळ कारण असते. त्यामुळे शरीरामध्ये वाढलेल्या या थंडीला कमी कसे करता येईल यासाठी उपाय करणे क्रमप्राप्त. इथे समजून घेऊ एक सहज करण्याजोगा उपचार,तो म्हणजे ‘पाद अवगाहन’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: मायग्रेनचा त्रास होतोय ? कशी कमी कराल डोकेदुखी

आयुर्वेदामध्ये अवगाहन चिकित्सा सांगितलेली आहे.सुश्रुतसंहितेचे भाष्यकार डल्हण सांगतात “अवगाहनमं मज्जन‌म्‌” अर्थात अवगाहन म्हणजे मज्जन म्हणजे बुडवणे. (सुश्रुतसंहिता४.२४.३१-डल्हणकृत्‌ निबंधसंग्रह व्याख्या) शरीराचा एखादा भाग द्रवामध्ये बुडवणे म्हणजे अवगाहन. याचं आधुनिक जगातलं उदाहरण म्हणजे टबबाथ. टबमध्ये सुखावह वाटेल असे कोमट पाणी घेऊन डोके तेवढे वर राहील असे झोपून शक्य होईल तितके शरीर त्या पाण्यामध्ये बुडवणे, म्हणजे अवगाहनच आहे. आजच्या जगात त्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, सुगंधी अत्तर वगैरे मिसळतात, इतकाच फरक. हा उपचार आधुनिक जगात सर्रास आचरणात आणला जातो, त्याची मुळं आयुर्वेदातील प्राचीन संहितेमध्ये आढळतात हे विशेष.

आणखी वाचा: Health Special: तांबे, पितळ, स्टील-कशातून खावंप्यावं?

वास्तवात आयुर्वेदीय संहितांमध्ये स्नेह अवगाहन सांगितलेले आहे, म्हणजे तेल, तूप वगैरे स्निग्ध द्रवपदार्थामध्ये मज्जन. मात्र सोसेल इतपत गरम पाण्यात सुद्धा हा विधी करता येतो, ज्याचा उपयोग पाय बुडवण्यासाठी करणे पावसाळ्यात निश्चित हितकर होते.

पाद अवगाहन करण्यासाठी एका टबमध्ये किंवा बादलीमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये थोडे खडे मीठ टाकावे व त्यामध्ये १० मिनिटे आपले पाय बुडवून बसावे. त्यातही कृश-अशक्त शरीराच्या व्यक्तींनी व पाय,कंबरेमध्ये वा शरीरामध्ये वेदना अधिक असल्यास त्या गरम पाण्यात चार चमचे तीळ तेल मिसळावे. सहच्र तेल,नारायण तेल अशी वातनाशक औषधी तेलं मिसळणे योग्य.

पाण्याच्या उष्ण स्पर्शामुळे व मीठाच्या उष्ण गुणधर्मामुळे शरीरामधली थंडी शोषली जाऊन उष्णता वाढते. ही उष्णता थंडीचा परिणाम कमी करते व संबंधित तक्रारींना प्रतिबंधही करते. वातनाशक तेलामुळे (तीळ तेलामुळे सुद्धा) वात कमी होतो. रोज दिवसातून एकदा शक्यतो सायंकाळी केलेले हे पाद-अवगाहन उपयोगी आहे. विशेषतः पावसामध्ये भिजून आल्यानंतर हा उपचार केल्यास शीतजन्य आजार टाळता येतील. ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसातून दोन वेळा पाद-अवगाहन करण्यास हरकत नाही. फक्त गरम पाण्यातून पाय बाहेर काढल्यानंतर गरम मोजे घालण्यास विसरु नये. अतिशय साध्या अशा या उपचाराचा गुण मात्र चांगला येतो, अनुभव घेऊन बघा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hot water leg soak helpful during rainy season hldc psp
Show comments