देशात अनेक भागांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी सतत वाढत असल्याने, लहान मुलांना विशेषत: ५ वर्षे वयोगटातील मुलांना याचा धोका जास्त असतो. वाढत्या वायू प्रदूषणामुळे त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचत आहे, त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. या लहान मुलांना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी, आपण त्यांच्या घरातील प्रदूषणाचा संपर्क कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. लहान मुलांना प्रदूषणाचा त्रास अधिक का होतो हे समजून घेणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाय शोधणेदेखील आवश्यक आहे. वरिष्ठ डॉ. निखिल मोदी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, पालकांनी त्यांच्या मुलांची कशी काळजी घेतली पाहिजे, यावर सविस्तर माहिती दिली आहे.
मुले अधिक असुरक्षित का आहेत?
लहान मुले, विशेषत: पाच वर्षांखालील मुले अधिक संवेदनशील असतात. त्यांची विकसित होणारी श्वसन प्रणाली आणि श्वसन संक्रमण यामुळे त्यांना फुफ्फुसाच्या समस्यां उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी असते. त्यामुळे लहान मुलांना प्रदूषणाचा धोका अधिक असतो. बाहेरच नाही तर घरातही धोका निर्माण होतो. हवेत असणारे विषारी कण श्वास घेताना फुफ्फुसात पोहोचू शकतात आणि मुलांचे फुफ्फुसाचे नुकसान होऊ शकते. विशेषत: मुलं वाढत्या अवस्थेत असल्यामुळे भविष्यात फुफ्फुसांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
प्रदूषणामुळे लहान मुलांच्या फुफ्फुसांचं नुकसान
वायू प्रदूषणामुळे लहान मुलांना दम्याचा त्रास निर्माण होतो. तसेच त्यांच्या फुफ्फुसाच्या कार्यामध्येदेखील समस्या उद्भवतात. तसेच लहान मुलांमध्ये ब्रॉन्कायटिससारखे श्वसनाचे आजार निर्माण होतात. संसर्ग होण्याचा धोका वाढतो आणि वायू प्रदूषणामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
वायू प्रदूषणापासून मुलांचे संरक्षण कसे करावे?
- व्हेंटिलेशन : योग्य व्हेंटिलेशन सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. जेव्हा प्रदूषण पातळी कमी असते तेव्हा खिडक्या उघडा, घरातील दमट हवा घराबाहोर जाऊद्यात. हे घरातील प्रदूषण पातळी कमी करण्यात मदत करू शकतात.
- लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळा. तसेच कमी प्रदूषण असेल, अशा नैसर्गिक ठिकाणी त्यांना नेण्याचा प्रयत्न करा.
- मुलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणं गरजेचं आहे. घरातील विशिष्ट जागा स्वच्छ करून तिथे मुलांना ठेवलं पाहिजे.
- घरातील प्रदूषण कमी करणे : घरातील हवेची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी तंबाखू, सिगारेट, सुगंधित मेणबत्त्या आणि काही साफसफाईची उत्पादने यांसारख्या प्रदूषणाचे साहित्य घरात ठेऊ नका.
- लहान मुलांच्या श्वासोच्छ्वासासाठी नियमित योगासने करणे खूप गरजेचे आहे. यामुळे श्वसनाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते. प्रदूषणाचे धोकादायक परिणाम टाळण्यासाठी तुमच्या मुलांना दररोज रात्री वाफ द्या.
हेही वाचा >> आरोग्य वार्ता : स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी नव्या प्रतिपिंडाची निर्मिती
दिल्लीत प्रदूषणामुळे शाळाही बंद
राजधानी दिल्लीत काही क्षेत्रामध्ये प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. अनावश्यक बांधकाम आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, अद्याप दिल्ली आणि NCR राज्यांमधून सर्व आपत्कालीन उपायांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. अनेक भागांत हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने ४०० चा टप्पा ओलांडला आहे. याच पार्श्वभूमीवर काही भांगांमध्ये शाळाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धोकादायक प्रदूषणापासून मुलांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात दिल्ली सरकारने सर्व प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.