Summer Eye Care Tips : उन्हाळ्यात वाढत्या तापमानासोबत आरोग्याच्या अनेक समस्या सुरू होतात. काही वेळा एसीच्या थंडाव्यात बसून राहावेसे वाटते. पण काही ना काही कारणामुळे उन्हाळ्यात दुपारी घराबाहेर पडावेच लागते. काहींना कामासाठी दुपारी घराबाहेर पडण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नसतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात डोळ्यांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांच्या बुबुळांना धोका निर्माण होतो. यामुळे डोळ्यांच्या आजाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढतात.
डोळे हा खूप नाजूक अवयव असल्याने तो सूर्याची अतिनील किरणे जास्तवेळ सोसू शकत नाही. उन्हाळ्यात डोळे अतिनील किरणांच्या संपर्कात जास्त वेळ आल्यास लेन्स प्रोटीनमध्ये बदल होतो. ज्यामुळे मोतीबिंदू आणि दृष्टी खराब होणे यांसारख्या विविध समस्या उद्भवतात. तसेच बेसल सेल कार्सिनोमा आणि स्क्वॅमस सेल कार्सिनोमासारख्या कर्करोगाचा धोका वाढतो आणि यूव्ही रेटिनाचेही नुकसान होऊ शकते.
यावर कोचीमधील अमृता हॉस्पिटलमधील नेत्ररोग विभागाचे प्रमुख आणि क्लिनिकल प्रोफेसर डॉ. गोपाल एस पिल्लई यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले की, उन्हाळ्यात घराबाहेर पडताना लोकांनी त्यांच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी UV सनग्लासेस वापरावेत. यामुळे डोळ्यांतील कोरडेपणा, तसेच अधिक स्क्रीन एक्सपोजरमुळे डोळ्यांना होणारा त्रास टाळता येईल.
आजकाल डोळे कोरडे पडणे ही एक मोठी समस्या आहे, विशेषत: बराच वेळ अभ्यास करणार्या मुलांमध्ये आणि जे सतत मोबाइल किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसतात त्यांना ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. बरेच लोक दिवसातील ८-१५ तास स्क्रीनसमोर असतात ज्यामुळे डोळ्यांमध्ये जास्त कोरडेपणा येऊ शकतो. यामुळे डोळ्यांमधून सतत घाण येते, तसेच तुम्ही सतत डोळे चोळू लागता. अशा परिस्थितीत डोळे खूप लाल दिसतात आणि त्यांतून पाणी येते, असे डॉ. गोपाल पिल्लई म्हणाले.
वाईट स्वप्ने मुलांच्या आरोग्यासाठी ठरतायत धोकादायक; वाढतोय ‘या’ आजारांचा धोका
डोळे कोरडे होऊ नयेत म्हणून काय करावे?
डॉ. पिल्लई यांच्या माहितीनुसार, डोळे कोरडे पडून नयेत म्हणून ते वारंवार धुवावेत. दिवसा दर दहा मिनिटांनंतर डोळ्यांवर पाणी मारा, यानंतर डोळे घट्ट बंद करून पुन्हा उघडा. डोळ्यांची सतत उघडझाप करा, यामुळे डोळ्यातील कोरडेपणा कमी होईल. डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही आय ड्रॉप्सचाही वापर करू शकता.
यावर आयु हेल्थ नेटवर्क ऑफ हॉस्पिटल्सचे वैद्यकीय संचालक डॉ. सारंग गोयल यांनी सांगितले की, डोळ्यांच्या आरोग्यासाठी शरीर हायड्रेट असणे महत्त्वाचे आहे. कारण डिहायड्रेशनमुळे डोळ्यांवर परिणाम होतो. मॉइश्चरायझर लावतानाही ते डोळ्यांच्या भोवती चोळा, उन्हात बाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळे सतत चोळू नका.
उन्हाळ्यात डोळ्यांची आणखी एक प्रमुख समस्या जाणवते ती म्हणजे डोळ्यांच्या बुबुळांच्या पुढच्या भागात दाह निर्माण होतो. यामुळे केराटायटिस, एंडोफ्थाल्मायटिस, सेल्युलायटिस आणि स्टाय यांसारखे आजार होण्याचा धोका असतो. यात उन्हाळ्यात अनेकांना डोळे येतात. डोळे येणे हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो मानवी स्पर्शाने पसरतो. डोळे आलेल्या व्यक्तीचा टॉवेल किंवा रुमाल वापरल्यास हा आजार तुम्हालाही होतो. एका वर्गात एका मुलाला डोळे आले तर दुसऱ्या मुलांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. हा एक विषाणुजन्य संसर्ग असून तो लगेच पसरतो, असे डॉक्टरांचे मत आहे.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी खा हे पदार्थ
डोळ्यांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. त्यासोबत आहारात बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि ई, ओमेगा-३ आणि झिंक यांसारख्या अँटिऑक्सिडंट घटकांचाही समावेश असणे गरजेचे आहे. यामुळे डोळ्यांचे गंभीर आजार रोखण्यास मदत होते. यात बाहेरचे प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे, असा सल्ला नवी दिल्लीतील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ ज्योती खानियोज यांनी दिला आहे.
सफरचंद, गाजर हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जातात, कारण यात बीटा-कॅरोटीन आणि जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांना विविध संसर्गांपासून दूर ठेवते. याशिवाय व्हिटॅमिन सीच्या सेवनासाठी लिंबू आणि आंबट फळांचा आहारात समावेश करा. तसेच व्हिटॅमिन ईने समृद्ध ड्रायफ्रुट्सचे सेवन करा. यामुळे तुम्ही मोतीबिंदू आणि वाढत्या वयासोबत डोळ्यांसंबंधित होणाऱ्या आजारांपासून दूर राहू शकता.
ओमेगा-३ ने समृद्ध सॅल्मन फिश हादेखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो, ज्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यात मदत होते. तसेच अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन ए, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन आणि झिंक असते, जे वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांपासून दूर ठेवते, तसेच रातांधळेपणाची समस्या रोखण्यासही मदत करते.