मधुमेह हा शब्द आता बहुतेक सर्वांच्या ओळखीचा झालेला आहे. रक्तामधील साखरेची पातळी एका मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यामुळे मधुमेह ही आयुष्यभर चालू राहणारी स्थिती तयार होते. आजकाल मधुमेह, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होणे ही सामान्य बाब झाली आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल, तर इतर अवयवांसह एकंदरीत आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
जीवनशैलीत बदल करून, खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवले आणि व्यायाम केला, तर व्यक्ती आपल्या आजारावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवू शकते. व्यायाम करणे प्रत्येकासाठी चांगले आहे. पण, जर एखाद्याला मधुमेहाची तक्रार असेल, तर त्याच्यासाठी व्यायाम करणे अधिक महत्त्वाचे ठरते. जर कोणाला मधुमेह असेल आणि तो व्यायाम करीत असेल, तर त्याचे त्याला मोठे फायदे मिळू शकतात.
डायबिटीस ही शरीरात अतिशय हळूवारपणे पसरणारी समस्या आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर विविध अवयवांवर त्याचा परिणाम होतो आणि शरीरिक गुंतागुंत वाढत जाते. म्हणूनच साखर नियंत्रणात ठेवणे हे एक मोठे आव्हान असते. मधुमेह रुग्णांनी आहाराची काळजी घेण्यासोबतच नियमित व्यायाम करणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. दररोज व्यायाम केल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. अॅरोबिक व्यायाम केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते, असे सांगितले जाते. मग रक्तातील साखर कमी करण्यासाठी पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम असू शकतो का, याच विषयावर चेन्नईतील स्पेशॅलिटी सेंटरचे डायबिटीज अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला बोलताना माहिती दिली आहे.
(हे ही वाचा : ओरल सेक्समुळे घशाचा कॅन्सर होतो का? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले ‘हे’ खबरदारीचे उपाय! )
डाॅक्टर सांगतात, काही दिवसांपूर्वी, BMJ ओपन स्पोर्ट अॅण्ड एक्सरसाइज मेडिसिनमधील अभ्यास पाहिला असता, त्यामध्ये असे आढळून आले की, पाण्यातील उच्च तीव्रतेचे अंतराल प्रशिक्षण; ज्याला बर्याचदा जलीय उच्च तीव्रता अंतराल प्रशिक्षण (AHIIT) म्हणतात. त्यामुळे तीव्र परिस्थिती असलेल्या प्रौढांमध्ये व्यायाम क्षमता सुधारते. साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी नियमित व्यायाम करणे अतिशय फायदेशीर आहे. कारण- यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. खरे तर फेब्रुवारी २०२० जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन अॅण्ड फिजिकल फिटनेसमधील अभ्यासात असे आढळून आले की, पोहणे रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारू शकते.
डाॅक्टर म्हणतात, “रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा व्यायाम हा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता वाढते; ज्यामुळे स्नायूंना ग्लुकोज अधिक प्रभावीपणे शोषून घेता येते. पोहण्यासारख्या क्रिया रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत करू शकतात. शारीरिक हालचालींचे तीन प्रकार आहेत; जे आपण केले पाहिजेत.”
पोहणे हा अॅरोबिक व्यायाम आहे. त्यामुळे शरीराच्या सांध्यांवर भार पडत नाही. शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागासाठी हा खूप चांगला व्यायाम आहे. पोहण्याने मधुमेह कमी होण्यास मदत होते. आजकाल आरोग्यविषयक समस्या दूर व्हाव्यात यासाठी व्यायाम, योग, मेडिटेशन आदी गोष्टींवर भर दिला जात आहे. निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते; मात्र व्यग्र जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाली कमी होत आहेत. त्यामळे व्यायाम करणे फार गरजेचे आहे. व्यायाम केल्याने लवचिकता आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होते.
(हे ही वाचा : कोणती आसन स्नायू बळकट अन् झपाट्याने वजन कमी करण्यास मदत करू शकतात? योग तज्ज्ञांनी दिलं उत्तर… )
१. लवचिकता
लवचिकता निर्माण करण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. चांगले संतुलन व लवचिकता यांसाठी चालणे, पोहणे, सायकलिंग आणि योगासने अशा क्रिया करता येऊ शकतात.
२. अॅरोबिक व्यायाम
नियमित अॅरोबिक व्यायाम केल्याने हृदयाचे स्नायू मजबूत होऊन, त्याची कार्यक्षमता सुधारते आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत होते.
३. प्रतिकार प्रशिक्षण
याचे उदाहरण म्हणजे लहान वजन उचलणे. त्यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळू शकते. जर एखाद्याने त्याच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये सामर्थ्य प्रशिक्षण समाविष्ट केले, तर त्याच्या रक्तातील साखर कमी निश्चितच होऊ शकते.
तज्ज्ञ सांगतात की, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी योगासने मदत करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या आहाराकडेही लक्ष दिले पाहिजे. जर रक्तातील साखर मर्यादेपलीकडे वाढली, तर ती घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत या गोष्टीवर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.